Pune: बनावट कागदपत्रांद्वारे कर्जप्रकरणात बांधकाम व्यावसायिकाची साडेपाच कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 10:39 AM2024-01-19T10:39:27+5:302024-01-19T10:41:29+5:30

कोट्यवधी रुपयांच्या सदनिका खरेदी व्यवहारात बनावट कर्ज प्रकरण तसेच दस्त नोंदणी करून बांधकाम व्यावसायिक सुभाष सणस यांची साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे....

5 Crore defrauding of a builder in a loan case through forged documents | Pune: बनावट कागदपत्रांद्वारे कर्जप्रकरणात बांधकाम व्यावसायिकाची साडेपाच कोटींची फसवणूक

Pune: बनावट कागदपत्रांद्वारे कर्जप्रकरणात बांधकाम व्यावसायिकाची साडेपाच कोटींची फसवणूक

पुणे : बनावट कागदपत्रांसह साडेपाच कोटी रुपयांचा संपूर्ण व्यवहार जागा मालक, बिल्डर यांना कोणताच थांगपत्ता लागू न देता फसवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बँक अधिकारी, दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोट्यवधी रुपयांच्या सदनिका खरेदी व्यवहारात बनावट कर्ज प्रकरण तसेच दस्त नोंदणी करून बांधकाम व्यावसायिक सुभाष सणस यांची साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

लुल्ला नगर येथील संबंधित जागा सणस यांनी १९९७ साली अभिनेते शम्मी कपूर यांच्याकडून विकत घेतली होती. त्यानंतर त्या जागेवर कोट्यवधी रुपयांचा गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार येताच नितीन राजाराम पाटणकर (३५, रा. हातकणंगले, इचलकरंजी, जि. कोल्हापूर), पुरुषोत्तम गजानन पाटणकर (३८, रा. चिंचवड), मिलिंद गोसावी (वय ५०, रा. कात्रज), प्राची पाटणकर (रा. कोल्हापूर), विवेक शाम शुक्ला (रा. बिबवेवाडी) व एका अनाेळखी व्यक्तीसह हवेली दुय्यम निबंध कार्यालयातील निबंधक, डीबीएस बँकेतील अधिकारी, कर्मचारी, बँक ऑफ महाराष्ट्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुभाष बाबूराव सणस (६७, रा. सणस रेसिडन्सी, नाॅर्थ मेन रस्ता, कोरेगाव पार्क) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सणस बिल्डर्सकडून बांधण्यात येणाऱ्या लुल्ला नगर येथील बेव्हरली हिल्स या गृहप्रकल्पाचे कुलमुखत्यारधारक विठ्ठल नारायण भोरे यांच्या नावाने दोन सदनिका खरेदीसाठी अनोळखी आरोपीसह नितीन पाटणकर यांनी बनावट करारनामा केला. दस्त करून देणाऱ्या व्यक्तीस ओळखताे म्हणून आरोपी मिलिंद गोसावी, प्राची पाटणकर, विवेक शुक्ला यांनी स्वाक्षरी केल्याचे सणस यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवेली (क्रमांक २०) दस्त नोंदणी कार्यालयातील निबंधकांनी कागदपत्रांची पडताळणी न करता दस्त नाेंदणीची प्रक्रिया केली. डीबीएस बँकेत कर्ज प्रकरण सादर करण्यात आले. बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्ज प्रकरणाची पडताळणी न करता सणस बिल्डर्सच्या नावे साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. सणस बिल्डर्सच्या नावाने बनावट खाते बँक ऑफ महाराष्ट्रात उघडण्यात आले. खात्यात जमा झालेली चार कोटी ३३ लाख ९८ हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली.

सणस बिल्डर्सचे कुलमुखत्यारधारक विठ्ठल भोरे यांच्या नावाने दुसरीच व्यक्ती उभी करून बनावट करारनामा केल्याचे सणस यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सणस यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी अर्जाची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी करत आहेत.

Web Title: 5 Crore defrauding of a builder in a loan case through forged documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.