प्रवाशांवर बारा तासांचे ‘एअर स्ट्राईक’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 07:46 PM2019-04-29T19:46:47+5:302019-04-29T20:01:19+5:30

सुमारे १९० प्रवाशांनी रविवारी रात्री दुबईला जाण्यासाठी एसजी ५१ या विमानाची तिकीटे काढली होती. हे विमान रात्री ८ वाजता सुटणे अपेक्षित होते

12-hour air strike on passenger | प्रवाशांवर बारा तासांचे ‘एअर स्ट्राईक’ 

प्रवाशांवर बारा तासांचे ‘एअर स्ट्राईक’ 

Next
ठळक मुद्देतांत्रिक कारणांमुळे दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दुबईकडे रवाना

पुणे : दुबईला जाणाऱ्या विमानाने एक-दोन तास नव्हे तर तब्बल १२ तास विलंबाने उड्डाण केल्याचा प्रकार पुणेविमानतळावर घडला. यावेळेत सुमारे १९० प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला. विमानतळावरील अपुरी सुविधा तसेच विमान कंपनीकडून पुरेसे सहकार्य न मिळाल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी कंपनीविरोधात विमानतळावरच जोरदार घोषणाबाजी करून निषेध केला. 
पुणे विमानतळावरून दररोज स्पाईस जेट कंपनीकडून रात्री ८ वाजता दुबईसाठी विमान सोडले जाते. त्यानुसार सुमारे १९० प्रवाशांनी रविवारी रात्री दुबईला जाण्यासाठी एसजी ५१ या विमानाची तिकीटे काढली होती. हे विमान रात्री ८ वाजता सुटणे अपेक्षित होते. पण तांत्रिक कारणांमुळे दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दुबईकडे रवाना झाले. हे विमान सव्वा एक वाजण्याच्या सुमारास दुबई विमानतळावर पोहचले. तब्बल चौदा तास प्रवासी विमान आणि विमानतळावरील सुरक्षा कक्षामध्ये अडकले होते. 
दुबईमध्ये नोकरीनिमित्त स्थायिक झालेले विजय वडघरे हे पत्ती व दोन मुलींसह सोमवारी या विमानाने दुबईत पोहचले. त्यांनी लोकमत शी या घटनाक्रमाविषयी माहिती दिली. विमानाचे उड्डाण होण्याची नियोजित वेळ रात्री ८ ची होती. पण विमान तीन तास उशिराने उड्डाण करणार असल्याचे कंपनीने शनिवारीच सर्व प्रवाशांना ई-मेलद्वारे कळविले होते. त्यानुसार रविवारी ८ - ८.३० वाजण्याच्या सुमारास बहुतेक प्रवासी विमानतळावर दाखल झाले. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर ११ वाजण्याच्या सुमारास प्रवाशांना विमानात सोडण्यात आले. त्यानंतर विमानातील प्रवाशांची परीक्षा सुरू झाली. काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानाला विलंब होईल, असे सातत्याने सांगण्यात आले. पण नेमकी वेळ सांगितली जात नव्हती. एकाच जागी बसल्याने काही प्रवाशांना त्रास होऊ लागला. प्रवाशांचा संयम सुटत चालला होता. त्यामुळे प्रवाशांनी एकत्रित येऊन कंपनीविरोधात घोषणाबाजी केली. तसेच विमानतळ प्रशासनाकडे तक्रारही नोंदविली. पण त्यानंतरही काही फरक पडला नाही. दरम्यान, विमान कंपनीने तांत्रिक बिघाडामुळे विमानाला उशीर झाल्याचे म्हटले आहे. तसेच प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल खेदही व्यक्त केला आहे.

.................
पायलटची ड्युटी संपली
दुबईला जाणारे विमान पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास दुरूस्त झाले. पण पायलटची ड्युटी संपल्याने तो निघून गेला होता. त्यातच सकाळी ८ ते १० यावेळेत नागरी वाहतुकीला धावपट्टी बंद असते. त्यामुळे उड्डाण आणखी रेंगाळत गेले. अखेर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विमानाचे उड्डाण झाले. या सुमारे १४ तासांच्या कालावधीत कंपनी व विमानतळ प्रशासनाकडून सहकार्य मिळाले नाही. हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करावी, ही प्रवाशांची विनंतीही अमान्य करण्यात आली. कंपनीने केवळ पाणी व खाण्याची व्यवस्था केली. एवढ्या प्रवाशांसाठी तिथे एकच स्वच्छतागृह होेते. आतापर्यंत अनेकदा या विमानाने प्रवास केला आहे. पण पहिल्यांदाच असा वाईट अनुभव आल्याचे वडघरे यांनी सांगितले.पुण्यातून दुबईला जाणारे विमान पुन्हा परतीच्या प्रवासात दुबईतून दररोज रात्री साडे अकरा वाजता उड्डाण करते. पण पुण्यातूनच तब्बल १४ तास उशीर झाल्याने दुबई विमानतळावर थांबलेल्या प्रवाशांचेही हाल झाले. काही प्रवाशांनी याबाबत टिष्ट्वटरवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: 12-hour air strike on passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.