Lok Sabha Election 2019: मनसेची भूमिका उरणार का फक्त भाषणापुरती?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 06:01 AM2019-03-15T06:01:23+5:302019-03-15T06:02:01+5:30

महाआघाडीत स्थान नाही; राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीवरून चित्र झाले स्पष्ट

Lok Sabha Election 2019: Will the speech of the MNS be left over? | Lok Sabha Election 2019: मनसेची भूमिका उरणार का फक्त भाषणापुरती?

Lok Sabha Election 2019: मनसेची भूमिका उरणार का फक्त भाषणापुरती?

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात ईशान्य मुंबई, ठाणे आणि कल्याण मतदारसंघातील उमेदवारांचीही नावे आहेत. महाआघाडीतील वाटाघाटीदरम्यान मनसेने यापैकी एखादी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. त्या जागांवर राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केल्याने महाआघाडीत मनसेला स्थान नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मनसे स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की फक्त भाषणे करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी विरोधी मतांमधील फूट टाळावी, यासाठी मनसेला आघाडीत घ्यावे, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाठीभेटींमुळे मनसे यंदा आघाडीत सामील होणार अशीच चर्चा होती. त्यातच, अजित पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे या चर्चेला बळकटी मिळाली होती. मात्र, काँग्रेसने मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने महाआघाडीचे घोडे अडले होते. मनसे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. महाआघाडीत केवळ समविचारी पक्षांनाच स्थान असेल, अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी आणि मनसेकडून अन्य पर्यायांची चाचपणी सुरू होती. थेट महाआघाडीत समाविष्ट होता येत नसेल तर राष्ट्रवादी आणि मनसेने स्वतंत्र गणित जुळवावे. राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील एखादी जागा सोडावी आणि स्वतंत्रपणे भाजपावर हल्लाबोल करावा, अशीही एक मांडणी करण्यात येत होती. मात्र, आता मनसेने दावा केलेल्या मतदारसंघांवर राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केल्याने तीही आशा मावळल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज ठाकरे यांनी अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर सातत्याने टीकेची झोड उठविण्याचे धोरण स्वीकारले आहे. १३व्या वर्धापन दिनाच्या भाषणातही त्यांचा सारा रोख भाजपावरच होता. या वेळी लोकसभा निवडणुकांबाबत मात्र भाष्य करण्याचे त्यांनी टाळले होते. त्यामुळे आता मनसे आपले उमेदवार उतरविणार की फक्त भाजपावर टीकेची झोड उठवित राहणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

आघाडी, युतीपासून समान अंतर राखणार का?
२०१४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपासोबत युती झालेली नसतानाही मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेनेला विरोध म्हणून मुंबईत तीन उमेदवारही उभे केले होते. आता आघाडीनेही राज यांना जवळ करण्याचे टाळले आहे. त्यामुळे ते उमेदवार न देताच मोदींविरोधात रान उठविणार की निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अथवा आघाडी, युतीपासून समान अंतर राखत विधानसभेच्या तयारीला लागणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

 

Web Title: Lok Sabha Election 2019: Will the speech of the MNS be left over?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.