Helicopter, booking for small aircrafts | हेलिकॉप्टर, छोट्या विमानांचे प्रचारासाठी बुकिंग फुल्ल
हेलिकॉप्टर, छोट्या विमानांचे प्रचारासाठी बुकिंग फुल्ल

- खलील गिरकर 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांना जास्त मागणी असल्याने विविध मतदारसंघांत जाण्यासाठी हवाई प्रवासालाच ते प्राधान्य देत आहेत. मात्र, राजकीय नेत्यांकडून मागणी जास्त व हेलिकॉप्टर, लहान विमानांची संख्या कमी असल्याने प्रचारासाठी अनेकांवर रस्ते मार्गाने प्रवास करण्याची वेळ आली आहे.
देशभरात सुमारे २०० खासगी हेलिकॉप्टर वापरात आहेत. त्यापैकी प्रचारासाठी सुमारे १२५ हेलिकॉप्टर सेवेत आहेत. त्यांचे आरक्षण
पूर्वीच झाल्याने आता हेलिकॉप्टर व विमाने मिळवणे अवघड जात आहे. राज्यात सुमारे १८ हेलिकॉप्टर
आहेत; त्यांचे आरक्षणही फुल्ल झालेले आहे.
एमएबी एव्हिएशनचे मंदार भारदे म्हणाले, एन्ट्री लेव्हल हेलिकॉप्टरचा दर प्रति तास १ लाख रुपये आहे, तर अत्याधुनिक सुविधा असलेल्या हेलिकॉप्टरचा दर तासाला साडेचार लाख रुपयांपर्यंत आहे. हेलिकॉप्टरचा वेग, जास्त केबिन कम्फर्ट अशा विविध सुविधांमुळे हेलिकॉप्टरच्या भाड्यामध्ये वाढ होते. हेलिकॉप्टर व विमाने आरक्षित करण्यामध्ये भाजपचा प्रथम क्रमांक आहे. त्याखालोखाल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांनी आरक्षण केले आहे.
जवळच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर व लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमान असा प्राधान्यक्रम असल्याची माहिती एलॉफ्ट एव्हिएशनच्या संचालिका निशा शर्मा यांनी दिली. २६ एप्रिलपर्यंत हेलिकॉप्टरचे आरक्षण फुल्ल झाले असून त्यानंतर राज्याबाहेरील प्रचारासाठी छोटी विमाने आरक्षित करण्यात आलेली आहेत. आमच्या ताफ्यातील ३ हेलिकॉप्टर व ३ विमाने आरक्षित आहेत. त्यामुळे कॉर्पोरेट ग्राहकांचे आरक्षण सध्या घेतले जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
>ग्रामीण भागात जाण्यासाठी हेलिकॉप्टरला पसंती
हेलिकॉप्टरसोबत प्रचारामध्ये छोट्या विमानांचाही समावेश आहे. छोट्या विमानांचे उड्डाणाचे दर प्रति तास साधारण एक लाख ते साडेचार लाख इतके आहेत. महाराष्ट्रात अशा प्रकारची
८ ते १० छोटी विमाने वापरात आहेत.
विमानांचे उड्डाण व लँडिंगसाठी
धावपट्टी व इतर अनुषंगिक बाबींचा विचार करता तुलनेने तात्पुरते हेलिपॅड उभारणे सहज शक्य असल्याने ग्रामीण भागात जाण्यासाठी नेत्यांचा ओढा हेलिकॉप्टरकडेच असल्याचे भारदे यांनी सांगितले.


Web Title: Helicopter, booking for small aircrafts
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.