नोटाबंदीमुळे 4 कोटी लोक बेरोजगार झाले- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 08:59 PM2019-04-06T20:59:39+5:302019-04-06T21:11:49+5:30

नोटाबंदीमुळे 4 कोटी नोकऱ्या गेल्या, शेकडो लोकांचा रांगेत मृत्यू झाला

4 crore people were unemployed due to note ban: Raj Thackeray | नोटाबंदीमुळे 4 कोटी लोक बेरोजगार झाले- राज ठाकरे

नोटाबंदीमुळे 4 कोटी लोक बेरोजगार झाले- राज ठाकरे

googlenewsNext

मुंबई- मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मोदी आणि भाजपा सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. नोटाबंदीमुळे 4 कोटी नोकऱ्या गेल्या, शेकडो लोकांचा रांगेत मृत्यू झाला, पण माध्यमांवर दबाव टाकून त्यांना ह्या सगळ्या बातम्या दडपायला लावल्या.  त्यामुळे प्रसारमाध्यम आणि लोकांपर्यंत बातम्या पोहोचत नव्हत्या. संपादकांचं, चॅनेलचं स्वातंत्र्य काढून घेतलं. हे कोणाचं सरकार आहे. ही भीषण परिस्थिती सध्या आहे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. नोटाबंदीनंतर देशात 4 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, 99.3%पैसे बँकेत परत आले. म्हणजे नोटबंदी ही अपयशी ठरली. त्यावेळी मोदी म्हणाले होते की, जर 50 दिवसांत सगळं सुरळीत नाही झालं तर मला कोणत्याही चौकात उभं करा आणि मला हवी त्या शिक्षा द्या. मोदी तुम्ही चौक ठरवा आता, शिक्षा द्यायला आम्ही येतो, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

मला कोणाच्या खासगी आयुष्यात जायचं नाही, पण नरेंद्र मोदी वर्षातून एकदा आईला भेटायला जातात, त्यावेळी मीडियाला घेऊन का जायचं? नोटाबंदीच्या वेळेला स्वतःच्या आईला रांगेत उभं केलं. भावनिक राजकारण करायचं म्हणून कुठल्या थरापर्यंत जाणार तुम्ही? ह्यातून मोदींचा दृष्टिकोन कळतो, अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी केली आहे.  काँग्रेसच्या जुन्या योजनांची नावं बदलून त्यांनी भाजपाच्या स्वतःच्या योजना म्हणून त्या घोषित केल्या. काँग्रेसला नेहरू गांधींच्या पलीकडे नावं देता येत नाहीत, भाजपला पंतप्रधान किंवा भाजपा हीच का नावं सुचतात. आपल्या देशात इतकी कर्तृत्ववान माणसं जन्माला आली, पण त्यांची नावं प्रकल्पांना का देत नाही, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
 
नमामि गंगेसाठी 20 हजार कोटी खर्च करू म्हणाले, गंगा साफ झाली नाही पण पैसे कुठे गेले हे कळलं नाही. जी. डी. अग्रवाल गंगा स्वच्छ व्हावी म्हणून उपोषणाला बसले होते, पण त्यांना एकदाही भेटायला पंतप्रधान गेले नाहीत. शेवटी 111 दिवस उपोषण करून ते वारले. गंगा स्वच्छतेसाठी नेमलेल्या कमिटीच्या बैठकीला आजपर्यंत मोदी एकदाही उपस्थित राहिलेले नाहीत, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. मोदींनी सत्तेत आल्यावर आधार कार्ड योजनेचं जोरदार समर्थन केलं, पण हेच मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की, आधार कार्डचा कोणीही गैरवापर करू शकेल, घुसखोरांचं फावेल, लोकांना मिळणारे फायदे स्वतः लुबाडतील. एवढा विरोध होता मग आधार कार्ड योजना का राबवली?, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मी काही वर्षांपूर्वी बोललो होतो की नरेंद्र मोदी निवडणुका जिंकण्यासाठी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. तेच त्यांनी केलं.

पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी युद्धसदृश्य परिस्थती निर्माण केली. सैनिकांच्या हौतात्म्याचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न मोदींनी केला. जवान अत्यंत खडतर परिस्थितीत देशाच्या सीमेचं रक्षण करत असतात, पण त्यांच्यासाठी काही करायला मोदींना गेल्या 5 वर्षांत सुचलं नाही. पण त्यांच्या शौर्यावर नरेंद्र मोदी निवडणुका जिंकण्याची स्वप्न बघत आहेत. ह्याची लाज कशी वाटत नाही, असंही राज ठाकरेंनी सांगितलं. आमच्या जवानांवरती काश्मीरमध्ये हल्ले होत होते, स्थानिक लोकं त्यांच्यावर हल्ले करत होते, पण जवान काही करू शकत नाही कारण त्यांना माहीत आहे, आपल्यावर कारवाई होणार आहे. नरेंद्र मोदी नवाज शरीफांना भेटायला, केक भरवायला गेले आणि त्यानंतर लगेच पठाणकोट हल्ला झाला, उरी झालं. अमित शाहांनी एअरस्ट्राईक झाल्यावर घोषित केलं की, आम्ही 250 माणसं मारली. अमित शाह गेले होते का को पायलट म्हणून? एअर चीफ मार्शल म्हणतात की आम्हाला किती माणसं गेली ह्याचा आकडा देता येणार नाही, मग भाजपाने कुठून हा शोध लावला, असं म्हणत राज ठाकरेंनी अमित शाहांवरही निशाणा साधला.

Web Title: 4 crore people were unemployed due to note ban: Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.