समाविष्ट गावांचा विकास कधी? कर आकारूनही मिळेना सोयी-सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 01:10 AM2018-11-14T01:10:52+5:302018-11-14T01:11:20+5:30

किवळे-विकासनगर : कर आकारूनही सोयी-सुविधा मिळत नसल्याने वाढतेय नाराजी

Where is the development of the villages? Tax-free facilities | समाविष्ट गावांचा विकास कधी? कर आकारूनही मिळेना सोयी-सुविधा

समाविष्ट गावांचा विकास कधी? कर आकारूनही मिळेना सोयी-सुविधा

googlenewsNext

किवळे : किवळे-विकासनगर व मामुर्डीतील साईनगर भाग वीस वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झाला. मात्र बेस्ट सिटीप्रमाणे या भागाचा विकास झाला नाही. परिणामी नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा भाग पिंपरी-चिंचवड महापालिकेत आहे का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. महापालिका कर इतर भागाप्रमाणे घेते मग इतर भागाप्रमाणे विकास कधी करणार, असा सवाल करदाते व नागरिक करीत आहेत.

विकास आराखड्यानुसार पाण्याची टाकी, बसस्थानक व रस्त्याची काही मोजकी आरक्षणे ताब्यात मिळाल्याचा अपवाद वगळता इतर बहुतांशी आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन विकसित करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने दवाखाना, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, खेळाचे मैदान, उद्यान, वाचनालय, सांस्कृतिक भवन, भाजी मंडई, व्यायामशाळा, दळणवळण साधने आदी प्राथमिक सुविधादेखील नागरिकांना उपलब्ध झालेल्या नाहीत. काही आरक्षणावर अतिक्रमणे झाली आहेत. महापालिकेची आरक्षणे ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेबाबत क्लिष्टता अधिक असल्याने व प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची ओरड संबंधित जागामालक व शेतकरी करीत आहेत. प्रशासन समाविष्ट गावांच्या विकासाबाबत ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे विकास ठप्प झाला आहे.

विकासनगरमध्ये प्राथमिक शाळा इमारत महापालिकेने बांधली आहे़ मात्र खेळाचे मैदान नसल्याने मुलांनी खेळायचे कुठे, असा सवाल पालक विचारित आहेत. मराठी माध्यमिक शाळा नसल्याने माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना देहूरोड, निगडी, आकुर्डी, प्राधिकरणात जावे लागत आहे. एवढ्या वर्षात एकही दवाखाना अगर बाह्य रुग्ण विभाग सुरू करणे महापालिकेला शक्य झालेले नाही. त्यामुळे खासगी डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. नागरिकांसाठी एकही वाचनालय नाही. सांस्कृतिक भवन, अगर हॉल नसल्याने घरगुती कार्यक्रम करण्यासाठी मर्यादा येत आहेत. सुविधायुक्त बगीचा व खेळाची मैदाने नाहीत. याबाबत २० वर्षांत महापालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी महापालिकेचे विविध व भरमसाठ कर आम्ही का भरावेत, असा सवाल केला आहे. गेल्या २० वर्षांतील महापालिकेने आकारलेल्या सर्व करांत मोठी सवलत देण्यासाठी प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे़

वीस वर्षांपूर्वी ११ सप्टेंबर १९९७ ला महापालिका हद्दीलगतची अठरा गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली होती. किवळे गावठाण परिसरापेक्षा विकासनगर भागात १९९७ पूर्वीच गुंठा-दोन गुंठे जागा घेऊन अनेकांनी घरे बांधली होती. देहूरोड बाजारपेठ, पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग व देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ असल्याने विकासनगरला स्थायिक होणारांची संख्या वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. समविष्ट गावात २००२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर थोड्या प्रमाणात कामे सुरू झाली़ काही गटारी बांधण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांची संमती मिळवून जागा ताब्यात घेऊन किवळे -विकासनगर, उत्तमनगर, दत्तनगर व साईनगर येथील पाच डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. पाण्याची टाकी, नाला बांधणी कामे झाली़ मात्र विविध आरक्षणे ताब्यात नसल्याने विकास करण्यास अडचण येत आहे.
- बाळासाहेब तरस,
माजी नगरसेवक

गेल्या दीड वर्षात अनेकदा पाठपुरावा करूनही महापालिकेने विविध आरक्षणे ताब्यात घेतली नसल्याने नागरिकांना आधुनिक नागरी सुविधा पुरविताना अडचणी येत आहेत. उद्यान, दवाखाना, सांस्कृतिक भवन, भाजीमंडई व खेळाचे मैदानासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- संगीता भोंडवे, नगरसेविका

आरक्षणे ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेबाबत क्लिष्टता अधिक असल्याने व प्रशासनाने योग्य माहिती भूखंडधारक व शेतकरी यांना देणे गरजेचे आहे. विश्वासात घेतल्यास व निश्चित परतावा आदी बाबत मुदत दिल्यास आरक्षित भूखंड ताब्यात देताना जागामालक लवकर तयार होतील. प्रशासनाने त्यासाठी वेगळा विभाग स्थापन करावा.
- सुदाम तरस,
माजी सरपंच, किवळे़
 

Web Title: Where is the development of the villages? Tax-free facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.