सांडपाण्याचा होणार पुनर्वापर, कासारवाडी, चिखलीत प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 02:13 AM2018-12-24T02:13:35+5:302018-12-24T02:13:57+5:30

महापालिका हद्दीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पुनर्चक्रीकरण व पुनर्वापर प्रकल्प उभारण्याचा आराखडा तयार केला आहे.

 Wastewater reuse, Kasarwadi, Chikhaliat project | सांडपाण्याचा होणार पुनर्वापर, कासारवाडी, चिखलीत प्रकल्प

सांडपाण्याचा होणार पुनर्वापर, कासारवाडी, चिखलीत प्रकल्प

googlenewsNext

पिंपरी : महापालिका हद्दीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पुनर्चक्रीकरण व पुनर्वापर प्रकल्प उभारण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कासारवाडी व चिखलीत प्रकल्प प्रस्तावित असून, सहा ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून रोज ३१२ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे. या आराखड्यानुसार संपूर्ण शहरासाठी प्रतिदिन १२० दशलक्ष लिटर प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर केला जाणार आहे. या धोरणाला नुकतीच महापालिकेच्या सभेत मान्यता देण्यात आली.
सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने उभारण्याच्या प्रस्तावावर सर्वसाधारण सभेने शिक्कामोर्तब केले. महापालिका हद्दीत प्रतिदिन ३१२ दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते. महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर एका प्रभागात २०१६ मध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविला आहे. भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन शाश्वत जलस्रोतनिर्मिती, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन आणि नियोजनपूर्ण वापर करण्यासंदर्भात आता राज्य सरकारने धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, पुनर्चक्रीकरण व पुनर्वापरासाठी महापालिकेने आराखडा तयार केला आहे.
हर्डीकर म्हणाले, ‘‘महापालिका हद्दीत होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या ३० ते ५० टक्क्यांपर्यंत पाणीवापर हा सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याने पुनर्चक्रीकरण आणि पुनर्वापर माध्यमातून करण्यात
येणार आहे. शहरातील औद्योगिक भाग तसेच हिंजवडी, चाकण,
तळवडे येथील एमआयडीसीच्या भागात प्राधान्याने हा पाणीपुरवठा करून बचत होणारे पाणी
पिण्याचे पाणी म्हणून वापरण्यात येणार आहे. प्रक्रियायुक्त
पाण्याच्या वितरणाकरिता संपूर्णपणे नवीन जाळे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याने ६०७ किलोमीटरचे प्राथमिक जाळे उभारणे आवश्यक आहे. चºहोली मैलाशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी या भागात नव्याने विकसित होत असलेल्या बांधकाम व्यवसायासाठी आणि सोसायट्यांसाठी पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी करण्याचे प्रस्तावित आहे.’’

आयआयटी किंवा नॅशनल इंजिनिअरिंग रीसर्च इन्स्टिट्यूट (निरी) यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. त्यामध्ये औष्णिक विद्युत कें्रद्र, एमआयडीसी, रेल्वे किंवा अन्य मोठ्या प्रमाणावरील खरेदीदार यांना प्रक्रियायुक्त पाणी पुरविण्यात येणार आहे. प्रक्रियायुक्त पाणी नवीन बांधकामे, सर्व्हिस सेंटर, लॉँड्री, कुलिंग टॉवर, हौसिंग सोसायट्या, उद्याने, क्रीडांगणे, स्वच्छतागृहे आदी ठिकाणीही वापरण्यात येणार आहे.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त

४०० कोटींचा पहिला टप्पा
१पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी - एमआयडीसी या भागाकरिता कासारवाडी येथे प्रतिदिन ७५ दशलक्ष लिटर केंद्राची उभारणी करणे, पंपिंग केंद्र उभारणे आणि चिखली येथे प्रतिदिन पाच दशलक्ष लिटर प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. प्रक्रियायुक्त पाणीवापराकरिता २८५ किलोमीटरची पाणी वितरण व्यवस्था उभारण्यात येणार आहे. कासारवाडी येथे पाच दशलक्ष लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात येणार आहे. वाकड आणि पिंपळे सौदागर येथे एक दशलक्ष लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ, हिंजवडी टप्पा एक येथे ०.७ दशलक्ष लिटर क्षमतेचे एक, टप्पा दोन येथे ०.५५ दशलक्ष लिटर क्षमतेचे दोन आणि टप्पा तीन येथे १.९ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात येणार आहे. या योजनेचा एकूण अंदाजित खर्च ४०० कोटी इतका असणार आहे.

प्रकल्पासाठी मुदत २ वर्षे
२पहिल्या टप्प्यातील खर्च केवळ महापालिकेच्या स्वनिधीतून करणे शक्य नाही. प्रकल्पातील तंत्रज्ञानाची जोखीम उचलण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यासाठी हा प्रकल्प खासगी लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. ४० टक्के भांडवली खर्च ठेकेदारास प्रकल्प उभारणीच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने देण्यात येणार असून, उर्वरित ६० टक्के हिस्सा प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून सात वर्षांत त्रैमासिक पद्धतीने वितरित करण्यात येईल. प्रकल्प उभारणीचा कालावधी दोन वर्षे असून देखभाल - दुरुस्ती कालावधी २० वर्षे असणार आहे.

हिंजवडी, तळेगाव परिसरासाठी पुरविणार पाणी
३ प्रक्रियायुक्त पाणीपुरवठा करण्यासाठी लाल रंगाची वाहिनी असणार आहे. पिण्याच्या पाण्याची वाहिनी आणि प्रक्रियायुक्त पाण्याची वाहिनी चुकीने एकत्र होऊ नये, यासाठी वेळोवेळी पाहणी करण्यात येणार आहे. प्रक्रियायुक्त पाण्यासाठी स्वतंत्र पाणीमीटर प्रत्येक जोडणीसाठी असेल. स्वतंत्र मीटर रीडिंगची दर महिन्याला पडताळणी घेऊन प्रचलित पाणी दरानुसार बिल वितरित करण्यात येईल.
 

Web Title:  Wastewater reuse, Kasarwadi, Chikhaliat project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.