विकासकामांना परवानगीची प्रतीक्षा, संरक्षण विभागाकडून ग्रीन सिग्नल मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 01:23 AM2018-12-24T01:23:58+5:302018-12-24T01:24:14+5:30

देहूरोड येथील बुद्धविहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्यांनी ब्रह्मदेशातील रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या ऐतिहासिक घटनेला मंगळवारी (ता २५) ६४ वर्षे पूर्ण होत आहेत.

 Waiting for permission for development work, green signal from Defense Department? | विकासकामांना परवानगीची प्रतीक्षा, संरक्षण विभागाकडून ग्रीन सिग्नल मिळणार कधी?

विकासकामांना परवानगीची प्रतीक्षा, संरक्षण विभागाकडून ग्रीन सिग्नल मिळणार कधी?

googlenewsNext

- देवराम भेगडे
देहूरोड : येथील बुद्धविहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्यांनी ब्रह्मदेशातील रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या ऐतिहासिक घटनेला मंगळवारी (ता २५) ६४ वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या दोन वर्षांत येथील बुद्धविहार परिसरात विकासकामे करण्यासाठी देहूरोड दारुगोळा कोठाराच्या प्रतिबंधित क्षेत्र असल्याने संरक्षण विभागाकडून विशेष बाब म्हणून परवानगीबाबत सकारात्मक भूमिका घेत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापही परवानगी मिळाली नसल्याने बुद्धविहाराची विविध विकासकामे सुरु झालेली नाहीत. त्यामुळे बौद्ध बांधवांमध्ये विकासाची प्रतीक्षा कायम आहे .
गेल्या वर्षी या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी ऐतिहासिक बुद्धाविहाराचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा विस्तार व विकास करण्यात केंद्र शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे सरकारमधील जबाबदार घटकांनी (राज्याचे मंत्री महोदय, खासदार, आमदार) धम्मभूमीत येऊन तसे वक्तव्य केल्याने बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र बुद्धविहार कृती समितीने कॅन्टोन्मेन्ट बोर्डाकडे बांधकामासाठी मागितलेली परवानगी रेडझोनमुळे मिळू शकलेली नाही . विशेष बाब म्हणून परवानगीबाबत संरक्षण मंत्रालयाकडे विविध घटकांमार्फत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे . कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या सदस्यांनीही बैठकीत मंजुरी दिलेली असून, परवानगीबाबत पाठपुरावा करीत आहेत.
दिल्लीला जाऊन संरक्षण मंत्र्यांचीही सर्वांनी भेट घेतली आहे. मात्र अद्यापही परवानगी मिळाली नसल्याने बुद्धविहाराची कामे सुरु करण्यात आलेली नाहीत, असे संबंधितांकडून सांगितले जात आहे, तर देहूरोड दारुगोळा कोठाराचा रेडझोन असतानाही परिसरात इतर धार्मिक स्थळांची बांधकामे होत असताना बुद्धविहाराचे बांधकाम का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत: बुद्ध मूर्तीची स्थापना केली असल्याने दर वर्षी राज्यातून येथील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला लाखो बौद्ध बांधव येत असतात. वर्षभर भेट देणाऱ्या समाजबांधवांची व अभ्यासकांची संख्याही मोठी आहे, मात्र असे असतानाही या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी राज्य शासनाने आजतागायत मोठ्या निधीच्या घोषणा करण्याव्यतिरिक्त काहीही प्रयत्न केले नव्हते.
येथील बुद्धविहाराचा व धम्मभूमीचा जीर्णोद्धार व्हावा, येथे धम्मपीठ व्हावे, देशोदेशीच्या बौद्ध उपासकांनी येथील पवित्र भूमीला भेट द्यावी आणि देहूरोड धम्मभूमीचे नाव अजरामर व्हावे अशी सर्व बौद्धबांधवांची इच्छा आहे.

धम्मभूमी-बाबत बौद्ध बांधवांच्या प्रमुख मागण्या

देहूरोड येथील बुद्धविहार सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावे.
देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीचा सर्वांगीण विकास करण्यास सरकारने प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे.
धम्मभूमीतून तरुणांना तसेच भावी पिढीला सतत प्रेरणा मिळण्यासाठी भव्य ग्रंथालय उभे राहणे गरजेचे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, वचने व साहित्याचा अभ्यास करण्यासाठी सर्व सोईसुविधांनी युक्त अभ्यासिका झाल्यास सर्वांना त्याचा लाभ घेणे शक्य होऊ शकते.
देहूरोड कॅन्टोन्मेन्टच्या हद्दीत देहूरोड धम्मभूमी येत असल्याने प्रशासनाने मूलभूत समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊन परिसरात नेहमी स्वच्छता राहील याची दक्षता घ्यायला हवी.
महाराष्ट्र शासनातील संबंधित मंत्रिमहोदयांनी विकासासाठी ३ कोटी रुपये देण्याची केलेली घोषणा पूर्ण करून बुद्धविहाराच्या विकासाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यास डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी भव्य वास्तू उभी राहणे शक्य आहे.

रंगरंगोटी, रोषणाई, दर्शनव्यवस्थेसह कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात

चोख पोलीस बंदोबस्त
१देहूरोड : देहूरोड येथील बुद्धविहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्यांनी ब्रह्मदेशातील रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या
मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या ऐतिहासिक घटनेला मंगळवारी ६४ वर्षे
पूर्ण होत आहेत. वर्धापन दिनानिमित्त बुद्धविहार कृती समिती, बुद्धविहार ट्रस्ट , भारतीय बौद्ध महासभा, धम्मभूमी सुरक्षा समितीसह विविध संस्था व संघटनांच्या वतीने वर्धापन दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बुद्धविहार वास्तूची रंगरंगोटी, बुद्धविहार, अस्थिस्तूपाची रंगरंगोटी, रोषणाई ,दर्शनव्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या वतीने दिवसभर पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, तसेच रुग्णवाहिका व अग्निशमन सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या वेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे
पुरस्काराचे वितरण
२धम्मभूमी सुरक्षा समितीमार्फत तयारी पूर्ण करण्यात आली आहे यंदाचा प्रबुद्ध साहित्यरत्न पुरस्कार डॉ. आ. ह. साळुंखे यांना व भदन्त डॉ उपगुप्त महाथेरो यांना त्रिरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच महाउपासक प्रा डॉ एस पी गायकवाड यांना प्रबुद्धरत्न पुरस्कार देण्यात येणार असून, जी एस ऊर्फ दादा कांबळे यांना क्रांतिरत्न पुरस्कार, अ‍ॅड बी. जी. बनसोडे यांना न्यायरत्न पुरस्कार, ज्येष्ठ उपासक सुदाम पवार व सुधाकर खांबे, शरद उपरवट यांना भीमरत्न पुरस्कार व माजी न्यायमूर्ती अ‍ॅड. संतोष डोंगरे याना सेवारत्न पुरस्कार देऊन धम्मभूमीचे अनुवर्तक सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते
सन्मानित करण्यात येणार आहे, असे कृती समितीचे अध्यक्ष टेक्सास गायकवाड यांनी सांगितले. या वेळी योग्य नियोजन करण्यात आले आहे.
स्वागत फलक
३ शहर व परिसरातील विविध पक्ष, विविध संस्था, संघटना, व्यक्ती यांनी बुद्धविहार परिसर व देहूरोड मुख्य रस्त्यालगत तसेच पुणे मुंबई महामार्गालगत स्वागताचे फलक लावण्यात येत आहेत . देहूरोड वाहतूक विभागाच्या वतीने महामार्ग व इतर रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलीस नेमण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, प्रथमोचार, रुग्णवाहिका व अग्निशमन सुविधा उपलब्धअसंल्याचे बोर्ड सदस्य विशाल खंडेलवाल, गोपाळराव तंतरपाळे व हाजीमलंग मारीमुत्तू यांनी सांगितले. मंगळवारी सकाळपासून राज्यातील विविध भागासह पुणे जिल्हा , पुणे शहर , पिंपरी-चिंचवड शहर तसेच मावळ परिसरातून लाखो बांधव दर्शनासाठी येणार असल्याने योग्य ती व्यवस्था केली आहे.
विविध कार्यक्रम
४ बुद्धविहार ट्रस्टच्या वतीने बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त होणाºया कार्यक्रमांचीमाहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ट्रस्टचे सचिव गुलाब चोपडे, अशोक रूपवते, सुनील कडलक, संजय ओव्हाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. बुद्धविहार ट्रस्ट, भारतीय बौद्ध महासभा व भारिप बहुजन महासंघ यांच्यामार्फत धम्मभूमी येथे सकाळी आठला धम्म ध्वजारोहण होणार असून, त्यानंतर भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस व स्तुपास पुष्पमाला अर्पण करण्यात येणार आहे. भन्तेगण बुद्धवंदना घेणार आहेत. सकाळी कलापथकामार्फत धम्मगीतांचा कार्यक्रम होईल. दुपारी बारा ते दोन या वेळेत धम्मभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, देहूरोड बाजारपेठ ते धम्मभूमी भागातून धम्म रॅली होईल.
बुद्धविहार कृती समिती
५ सकाळी सातला ज्येष्ठ उपासक एम. एफ. गडलिंगकर यांच्या हस्ते बुद्धरूप वंदन होणार आहे. त्यानंतर त्रिसरण पंचशील होईल. सकाळी आठला संघपाल सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील भीमसैनिकांची अभिवादन रॅली, उत्तम सावंत यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण, भीमसैनिकांचे स्वागत , सकाळी दहाला रंजना सोनवणे यांचे प्रवचन होणार असून अकराला ज्येष्ठ उपासक संघाचे स्वागत करण्यात येणार आहे. या वेळी यशवंत गायकवाड यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी १२ला मान्यवरांचा सत्कार होणार आहे. या वेळी गणेश पगारे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी एकला कुमार यांचे एकपात्री तुकोबाराय सादर करतील. दुपारी दोनला धम्मभूमी अभिवादन सभा व पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत. शंकर तायडे हे स्वागताध्यक्ष राहणार आहेत.

Web Title:  Waiting for permission for development work, green signal from Defense Department?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.