पिंपरी महापालिेकेच्या पावसाळापूर्वी विकास कामांचे वाजले तीन तेरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 05:25 PM2019-07-10T17:25:23+5:302019-07-10T17:28:48+5:30

कामांचा बेसुमार दर्जा असल्याने पावसाळा सुरू होताच विकासकामांचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे़.

very bad condition development work of road in the pimpri | पिंपरी महापालिेकेच्या पावसाळापूर्वी विकास कामांचे वाजले तीन तेरा 

पिंपरी महापालिेकेच्या पावसाळापूर्वी विकास कामांचे वाजले तीन तेरा 

Next
ठळक मुद्देचेंंबर उचकटल्याने अपघाताची शक्यताशालेय विद्यार्थ्यांचे होतात हाल

उमेश अनारसे-  
पिंपरी : महापालिकेकडून पावसाळापूर्व कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला़. त्याअंतर्गत विविध प्रभाग व वॉर्डांमध्ये पाईपलाईन, ड्रेनेज लाईन, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण असे विविध कामे करण्यात आली़. मात्र, कामांचा बेसुमार दर्जा असल्याने पावसाळा सुरू होताच विकासकामांचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे़. 
अंगणवाडी ते अष्टविनायक चौक रस्त्याचे डांबरीकरण ठेकदाराकडून साधारण मे महिन्यात करण्यात आले़. जून महिन्यात पाऊस सुरू होतो़. परंतु मॉन्सून येण्यास उशीर झाला़. पहिल्याच पावसात दोन महिन्यांपूर्वी तयार केलेल्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे़. त्यामुळे वाहनचालक, पादचारी, सायकलस्वार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे़.
चिंचेचा मळा, विठ्ठलनगर, साई हौसिंग सोसायटी, अष्टविनायक चौक, तुळजाभवानी मंदिर अष्टविनायक चौकापासून खालच्या बाजूला निर्माण होत असलेल्या नवनवीन सोसायट्यांना रहदारीसाठी हा सर्वांत महत्त्वाचा रस्ता आहे़. परंतु, याच रस्त्याची दोनच महिन्यात बिकट अवस्था झाली आहे़. त्यामुळे नागरिकांना रस्त्याने प्रवास करणे अवघड होत आहे़. या रस्त्याच्या पादचारी मार्गावर दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने पादचारी मार्गच राहिला नाही़. फुटपाथ नसणारा रस्ता अशीच आता याची ओळख झाली आहे़. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना, वृद्धांना, शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रहदारीच्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे़.त्यातच रस्त्यात खड्डे पडल्याने तसेच ठिकठिकाणी पाणी साचते. वाहनांमुळे रस्त्यातील पाणी अंगावर येत असल्याने पादचाऱ्यांचे हाल होत आहेत़. खड्डे, पाण्याचे डबके चुकवताना अपघात होत आहेत़. लहान मुले घसरून पडत आहेत़. 

महापालिका ठेकेदाराने पावसाळापूर्व या रस्त्याचे काम केले़. परंतु, रस्ता व्यवस्थित न केल्याने पाण्याचा निचरा होत नाही़ त्यामुळे जागोजागी छोटी छोटी तळी साचत आहेत़. त्यामुळे दुचाकीचालकांना व पादचाºयांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़. रस्त्याचे डांबरीकरण करून दोन महिने पूर्ण होत नाहीत तोवरच सर्व रस्त्यात खड्डे पडले आहेत़ संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करून घ्यावी, महापालिकेच्या संबंधित विभागाने याची चौकशी करून ठेकेदाराला दंड करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़.

दुरवस्था : अंगणवाडी रोडवरील रस्त्याचे डांबरीकरण मागील दोन महिन्यांपूर्वी झाले आहे. परंतु, पहिल्याच पावसात या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

........................

चेंंबर उचकटल्याने अपघाताची शक्यता
रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर चेंबर रस्त्याच्या समपातळीत घेणे अपेक्षित होते़. परंतु रस्त्यापेक्षा चेंबर खाली गेल्याने पावसाचे पाणी साचत आहे़. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही़. परिणामी अपघात घडत आहेत़ तसेच काही चेंबरमधून पाणी जात नसल्याने स्थानिक नागरिकांनी चेंबर उखडून टाकले आहेत़. त्यामुळे तेथे खड्डा तयार झाला आहे़. तसेच चेंबरचे झाकण वरती आल्याने पावसात पादचारी, लहान मुले, वाहनचालक धडकून अपघात होऊ शकतो़. त्याठिकाणी कोणताही सूचनाफ लक अथवा धोक्याची सूचना लावण्यात आली नाही़. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने याची दखल घेणे गरजेचे आहे़.

शालेय विद्यार्थ्यांचे होतात हाल
या रस्त्याच्या बाजूलाच अंगणवाडी आहे़. तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर रहदारी असते़. या रस्त्याला पादचारी मार्ग नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यातून चालावे लागत आहे़. तसेच शाळेचा गणवेश, स्कूल बॅग घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यात पाणी साचल्याने प्रवास करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे़. चालताना समोरून तसेच पाठीमागून वाहन तर येत नाही ना त्या वाहनामुळे अंगावरती पाणी उडणार नाही याची दक्षता घ्यावी लागत आहे़. त्यातच एखाद्या विद्यार्थ्याच्या अंगावरती हे दूषित पाणी उडाले तर त्याचा गणवेश खराब होत आहे़. विद्यार्थ्यांकडून प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे़. आम्हाला काही नको; पण जाण्यायेण्यासाठी असणारा रस्ता मात्र चांगला करा, अशी मागणी चिमुकले करत आहेत़.
वाहनांचे होतेय मोठे नुकसान
वाहनचालकांच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे़. गाडीचे स्पेअरपार्ट खराब होत असल्याने वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे़. तसेच गाडी खड्डयांत गेल्याने वाहनचालकांना मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे़. काही वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज आला नाही तर अपघात घडत आहेत़. त्यामुळे चूक प्रशासनाची आणि भोगावी लागत आहे जनतेला़, अशी परिस्थिती सद्या आहे़.

Web Title: very bad condition development work of road in the pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.