... त्या इमारतीकडे वळल्या संशयित नजरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 08:06 PM2018-06-02T20:06:39+5:302018-06-02T20:06:39+5:30

पिंपरी चिंचवडशी लंकेश हत्याप्रकरणाचा संबंध आल्यावरच पिंपरी चिंचवड शहरवासियांच्या नजरा चक्रावल्या.

... turn and saw the suspect flash on building | ... त्या इमारतीकडे वळल्या संशयित नजरा 

... त्या इमारतीकडे वळल्या संशयित नजरा 

googlenewsNext
ठळक मुद्दे घराच्या दारावर श्रीगणेशाच्या चित्राचा स्टिकर चिटकविलेले आहे़ त्याखाली सनातन संस्थेचा उल्लेख पोलीस अथवा माध्यमाचे प्रतिनिधी यांना कोणतीही माहिती देण्यास संशियत आरोपीच्या पत्नीचा नकार हिंसक कारवायांचे पिंपरी चिंचवडमध्ये धागेदोरे

पिंपरी : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमुळे सर्व देशभरात एकच खळबळ उडाली होती. या हत्येचे धागेदोरे पहिल्यादिवसापासून हिंदुत्ववादी संस्थांशी जोडले गेले. परंतु, कर्नाटकच्या विशेष पोलीस पथकाने लंकेश हत्याप्रकरणातील एका संशयित आरोपीला अत्यंत गुप्तपणे गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. पिंपरी चिंचवडशी लंकेश हत्याप्रकरणाचा संबंध आल्यावरच शहरवासियांच्या नजरा चक्रावल्या. हा संशयित आरोपी चिंचवडच्या ज्या माणिक कॉलनीतील अक्षय प्लाझा इमारतीत वास्तव्यास आहे. त्या इमारतीभोवती जणू येणारा जाणारा प्रत्येकजण संशयाच्या नजरेने पाहतो आहे.  
या कारवाईचे वृत्त शनिवारी पसरताच स्थानिक पोलीस तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याठिकाणी धाव घेतली. उत्सुकतेपोटी विविध संघटनांचे कार्यकर्तेही जमा झाले. अचानक वाहने येऊ लागली, नागरिक जमा होऊ लागले. माणिक कॉलनी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही नेमके काय घडले आहे, याची कल्पना नसल्याने त्यांचीही कुजबुज सुरू झाली. येथे राहणारा सनातन संस्थेचा कार्यकर्ता अमोल काळे हा पत्रकार लंकेश हत्याप्रकरणाशी संबंधित संशयित आरोपी असल्याची माहिती समजताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील माणिक कॉलनीजवळ पवना नदीला लागून असलेल्या मोकळ्या जागेलगतची इमारत. इमारतीत एकूण १९ सदनिका आहेत. पहिल्या मजल्यावरील तिसऱ्या क्रमांकाच्या सदनिकेत संशयित आरोपी अमोल काळे राहतो. वडिलांची पिंपरीत पान टपरी आहे. इंजिनिअरिंग कंपन्यांना सुटे भाग पुरविण्याचा अमोलचा व्यवसाय आहे. पत्नी जागृती हिच्याबरोबर तो या सदनिकेत राहतो. स्वत:च्या मालकीची सदनिका आहे़ परंतु तो आजूबाजूच्या कोणाशी फारसा बोलत नाही, इतरांबरोबर मिसळत नाही. कधीतरी घरी आलाच तर एक, दोन सहकाऱ्यांना बरोबर घेऊन येताना दिसतो. त्याच्या घराच्या दारावर श्रीगणेशाच्या चित्राचा स्टिकर चिटकविलेले आहे़ त्याखाली सनातन संस्थेचा उल्लेख आहे. सनातन संस्थेचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचे तेथील नागरिक सांगतात. धार्मिक ग्रंथ आणि पूजा साहित्याचे वाहन घेऊन अनेकदा या परिसरात तो आल्याचेही रहिवासी आवर्जून सांगतात. 
दहा ते बारा वर्षांपासून अक्षय प्लाझा इमारतीत राहत असलेल्या अमोल काळे यास तेथील रहिवाशांपैकी कोणी ओळखत नाही. आजूबाजूला राहणारे रहिवासी तसेच या परिसरात कायम वावर असणारे तरुणही त्यास ओळखत नसल्याचे सांगतात. काळे याची पत्नी जागृती यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता, आपण कोण? असा प्रश्न विचारून समोरून पोलीस अथवा माध्यमाचे प्रतिनिधी असे उत्तर येताच माफ करा, मी काही सांगू शकत नाही, असे म्हणून त्या दरवाजा बंद करतात. असे अनुभव शनिवारी दिवसभर पोलीस आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना आले. सनातन संस्थचे कार्यकर्तेसुद्धा संस्थेचा सक्रिय सदस्य असल्याचे सांगतात.  बंगळुरू येथील पत्रकार लंकेश हत्याप्रकरणातील संशयित आरोपी म्हणून त्याला पोलिसांनी पकडल्याचे समजल्यानंतर सर्वजण अक्षय प्लाझा या इमारतीकडे संशयित नजरेने पाहू लागले आहेत. 
......................
हिंसक कारवायांचे पिंपरी चिंचवडमध्ये धागेदोरे
बंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणाशी संबंधित संशयित आरोपी अमोल काळे याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली. हा आरोपी चिंचवडच्या माणिक कॉलनीतील अक्षय प्लाझा इमारतीतील रहिवासी असल्याच्या वृत्ताने शहरात खळबळ उडाली आहे. २९ सप्टेंबर २००८ ला नाशिक, मालेगाव येथे बॉम्ब स्फोटाची घटना घडली होती. त्यात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना अटक झाली होती. या बॉम्बस्फोट प्रकरणात चिंचवड, बिजलीनगर येथील समीर कुलकर्णी यास संशयित आरोपी म्हणून अटक केली होती. जामिनावर सुटका झालेला समीर कुलकर्णी चिंचवडच्या बिजलीनगरचा रहिवासी आहे. बॉम्ब स्फोटासारख्या हिंसक आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या कारणावरून संशयित म्हणून पकडलेल्या समीर कुलकर्णी याच्यानंतर अशाच कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून अटक केलेला काळे हा पिंपरी चिंचवडमधील दुसरा आरोपी आहे. दोघेही सनातन संस्थेचे कार्यकर्ते असल्याचे निदशार्नास आले असून पोलिसांनी तसेच तपास यंत्रणेने पिंपरी-चिंचवड परिसराकडे लक्ष केंद्रीत केले आहे. 
  

Web Title: ... turn and saw the suspect flash on building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.