वैकुंठगमन सोहळ्यासाठी तुकोबारायांची देहूनगरी सज्ज, राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 01:21 AM2019-03-22T01:21:27+5:302019-03-22T01:22:04+5:30

आज शुक्रवारी होणाऱ्या बीज सोहळ्यासाठी संस्थानातर्फे सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली. संस्थानाच्या वतीने पहाटे तीनला काकडारती, चारला श्रींची महापूजा संस्थानाचे अध्यक्ष, विश्वस्त व महाराजांचे वंशज यांच्या हस्ते होणार आहे.

Tukobaraya's Dehoonagari ready for Vaikunthagaman ceremony | वैकुंठगमन सोहळ्यासाठी तुकोबारायांची देहूनगरी सज्ज, राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल  

वैकुंठगमन सोहळ्यासाठी तुकोबारायांची देहूनगरी सज्ज, राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल  

Next

देहूगाव - आज शुक्रवारी होणाऱ्या बीज सोहळ्यासाठी संस्थानातर्फे सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली. संस्थानाच्या वतीने पहाटे तीनला काकडारती, चारला श्रींची महापूजा संस्थानाचे अध्यक्ष, विश्वस्त व महाराजांचे वंशज यांच्या हस्ते होणार आहे. पहाटे सहाला श्री संत तुकाराममहाराज मंदिरातील महापूजा होईल. साडेदहाला देऊळवाड्यातून पालखीचे वैकुंठगमन मंदिराकडे प्रस्थान होईल. वैकुंठगमन सोहळा प्रसंगावर सकाळी १० ते १२ या वेळेत देहूकर महाराजांचे कीर्तन होईल. दुपारी साडेबाराला पालखी परत मुख्य मंदिरात येईल. रात्री व सकाळी पारंपरिक फड आणि दिंड्या यांचे कीर्तन कार्यक्रम, मुख्य मंदिर, वैकुंठगमन मंदिर आणि जन्मस्थान मंदिर परिसरात होणार असल्याचे संस्थानाचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे यांनी सांगितले.

संस्थानाच्या वतीने सात ठिकाणी मंडप घातला आहे. दर्शनबारी, राम मंदिराच्या समोर, नारायणमहाराज समाधी, महाद्वार, शिळा मंदिर व वैकुंठगमन मंदिर परिसरात हे मंडप घातले आहेत. मंदिरात ३२ छुपे कॅमेरे लावण्यात आले असून, मंदिराच्या भिंतीला विशिष्ट प्रकारची रासायनिक प्रक्रिया करून मूळ रूपातील दगड संरक्षित केले आहेत. इंद्रायणी पात्रातील राडारोडा व दगड हटविण्याचे काम सुरू आहे. सध्या पाणी आल्याने ते तात्पुरते थांबविले आहे. मंदिरातील नैमित्तिक कामेही पूर्ण झाली आहेत. पालखी वैकुंठगमन मंदिराकडे नेत असताना गर्दीचा अडथळा होऊ नये यासाठी दोरखंडाचा वापर करून रस्ता मोकळा ठेवण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांसह सुमारे २०० स्वयंसेवक मदत करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गावात मिळेल त्या मोकळ्या जागेत आसरा घेतलेल्या विविध गावांच्या दिंड्या व फडांवर गाथा पारायण, भजन, कीर्तन आणि हरिपाठ कार्यक्रम सुरू आहे. संस्थानाच्या वतीने मुख्य मंदिरात अखंड हरिनाम सोहळ्यास सुरुवात झाली आहे. श्रीक्षेत्र येलवाडी येथे संत तुकाराममहाराज यांची कन्या श्री संत भागिरथी माता संस्थान, त्याचप्रमाणे येथील गाथा मंदिर, पालखीसोहळा दिंडी समाज, रामदासमहाराज जाधव (कैकाडीमहाराज) यांच्या फडासह इंद्रायणी तीरावर व देहूगाव, येलवाडी, सांगुर्डी हद्दीत अनेक लहान-मोठ्या स्वरूपात अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन भाविकांनी केले आहे. या सोहळ्यातून सामाजिक एकोप्याबरोबरच सांस्कृतिक वारसा व सामाजिक विकासाबरोबरच सांस्कृतिक विकास जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. सांस्कृतिक विकासाबरोबरच धार्मिक विकास साधण्याचा व लोकांचे प्रबोधन करण्याचे काम या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अखंडपणे संस्थानाच्या वतीने सुरू आहे.

यात्रा काळात पीएमपी बस व एसटीला देहू-आळंदी रस्त्यावर जकात नाक्याजवळ थांबविण्यात येणार असून, येथे जड वाहने थांबविण्यात येणार असून कॅनबे चौकातून वाहतूक तळवडे-चाकणमार्गे व निगडीमार्गे वळविण्यात येणार आहे. देहू-देहूरोड रस्त्यावरदेखील वाहने झेंडेमळा या भागात थांबविण्यात येणार असून, तेथील वाहतूक सकाळपासूनच थांबविण्यात येणार आहे. या रस्त्याने केवळ पीएमपी बसला सोडण्यात येणार आहेत. तळेगाव-चाकण रस्त्यावर येलवाडी येथे देहू फाट्यावरूनच मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी राहील. यात्रेसाठी आलेली वाहने बाह्यवळण रस्त्याच्या बाजूलाच थांबविण्यात येतील. दुपारी १२ वाजतानंतर यात्रा संपल्यानंतर वाहने बाह्यवळणमार्गे बाहेर काढण्यात येतील. भाविकांनी आपली वाहने गाथा मंदिराच्या बाजूने बाह्यवळणमार्गे तळवडे जकातनाका भागात न्यावी व कापूरओढा, देहूरोडकडून आलेली वाहने किंवा तळवडेकडून आलेली वाहने कापूरओढा बाह्यवळणमार्गे बाहेर न्यावीत, असे आवाहन केले आहे. यात्रा काळात यंदा प्रथमच हे रस्ते वाहतुकीसाठी सोयीचे ठरणार असल्याने वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. मात्र येलवाडी ते गाथा मंदिराजवळचा बाह्यवळण मार्ग अद्यापही सुरू न झाल्याने वाहतुकीची अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विद्युत विभागातर्फे २४ तास कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. धोकादायक ठिकाणी रोहित्र सुरक्षित केले असून, डीपीचे दरवाजे बसविण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता ए. एस. मुरदंडगौंडा यांनी दिली. पाटबंधारे विभागाच्या वतीने यात्रेसाठी नदीत पाणी सोडण्यात आले असून, मंदिराच्या बाजूच्या घाटावर मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असल्याची माहिती कालवा निरीक्षक आ. ना. गोसावी यांनी दिली.
गावात सर्वत्र विविध वस्तूंची दुकाने रस्त्यांच्या दुतर्फा थाटली आहेत. यामध्ये बांगड्या, पर्स, विविध वस्तूंबरोबरच पेढे, प्रसाद, तुळशीच्या माळा, खेळणी यांची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. ही दुकाने वाहतुकीला अडथळा ठरू नयेत यासाठी पोलीस दल विक्रेत्यांना मागे हटवीत होते. काही भाविक इंद्रायणी नदीच्या घाटावर आंघोळीचा आनंद घेत होते.

1तहसीलदार गीता गायकवाड यांनी घेतलेल्या बैठकीत विविध विभागांची माहिती घेतली. यात्रा कालावधीत भाविकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून, बोडकेवाडी जलउपसा केंद्रावर आरोग्य कर्मचारी देखरेखीसाठी स्वतंत्रपणे नेमण्यात आले आहेत. त्यामुळे यात्रा काळात पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे. पाणी शुद्धीकरण करण्यासाठी पुरेसा क्लोरिन व तुरटी उपलब्ध असल्याची माहिती शाखा अभियंता धनंजय जगधने यांनी दिली.

2प्राथमिक आरोग्य विभागाच्या वतीने गाथा मंदिर, मुख्य मंदिर, वैकुंठगमन मंदिर परिसरात बाह्यरुग्ण विभाग सुरू केला असून, भाविक मोठ्या संख्येने याचा लाभ घेत आहेत.

3एसटी महामंडळाच्या वतीने देहू-आळंदी मार्गावर एसटी सोडण्यात येणार असल्याची माहिती तळेगाव आगार व्यवस्थापक आरगडे यांनी दिली. यात्रा काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल सज्ज झाले असून, गावात मोक्याची ठिकाणे, इंद्रायणी नदीचा घाट या ठिकाणच्या बंदोबस्ताची पाहणीदेखील वरिष्ठ अधिकाºयाकडून करण्यात आलेली आहे.

वैकुंठगमन प्रसंगाच्या देखाव्याचे आकर्षण
संस्थानाच्या वतीने मुख्य मंदिर, चौदा टाळकरी कमान, वैकुंठगमन मंदिर, भक्त निवास यांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वार कमानीला येथील बाळासाहेब काळोखे यांनी उत्कृष्ट व नयनरम्य रोषणाई केली आहे. नदीकिनारा रात्री रंगांची उधळण करीत असल्याचे चित्र दिसत आहे. यात्रेनिमित्त गावात आलेले भाविक, यात्रेकरू आणि स्थानिक ग्रामस्थांना या मंदिरांवरील रंगांची मुक्त उधळण पाहण्याचा मोह आवरता येत नाही. असे चित्र इंद्रायणी नदीच्या पुलावर व देहू-आळंदी रस्ता व देहू-देहूरोड रस्त्यावर महाद्वार कमान, वैकुंठगमन मंदिर परिसर, चौदा टाळकरी प्रवेशद्वार कमान, महाद्वार आणि ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पहायला मिळत होते. ग्रामपंचायतीजवळ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने प्लायवूड व कापसाच्या साहाय्याने ७ फूट रुंद व १४ फूट उंचीच्या गरुडावर वैकुंठाला जाणाºया तुकाराममहाराजांचा जिवंत देखावा उभारण्यात आला आहे. ते भाविकांचे आकर्षण ठरत आहे.

औषधसाठा, रुग्णवाहिका उपलब्ध
गावातील २७ विंधन विहिरीचे पाणी नमुने तपासले व शुद्धीकरण करण्यात आले. यात्रेसाठी २४ कर्मचारीवर्ग प्रतिनियुक्तीवर आलेला आहे. आरोग्य सहायक, परिचारिका, आरोग्यसेवक आणि चार वैद्यकीय अधिकारी, ४ रुग्णवाहिका, एक कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध आहे. पुरेसा औषधसाठाही असल्याची माहिती डॉ. किशोर यादव यांनी दिली.

Web Title: Tukobaraya's Dehoonagari ready for Vaikunthagaman ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.