गतिरोधक उभारणीत नियमांना हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 02:06 AM2017-11-10T02:06:53+5:302017-11-10T02:06:57+5:30

पिंपरी-चिंचवड शहरासह खडकी परिसरातील विविध रस्त्यांवर उभारण्यात आलेले अनेक गतिरोधक नियमांना हरताळ फासत उभारण्यात आल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले

Staggered speed control rules | गतिरोधक उभारणीत नियमांना हरताळ

गतिरोधक उभारणीत नियमांना हरताळ

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह खडकी परिसरातील विविध रस्त्यांवर उभारण्यात आलेले अनेक गतिरोधक नियमांना हरताळ फासत उभारण्यात आल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. पांढरे पट्टे नसण्यासह लांबी-रुंदीचे कसलेही निकष पाळण्यात आलेले नाहीत. नियम पायदळी तुडवून सर्रासपणे शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या या गतिरोधकांमुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

रावेतला वाहनचालक त्रस्त
रावेत : अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि वेगावर नियंत्रण राहावे यासाठी रस्त्यावर गतिरोधक तयार केले जात असले तरी रावेत, वाल्हेकरवाडीमध्ये गतिरोधक बसविताना नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्याचा त्रास वाहनचालकांना व प्रवाशांना होत असून, अपघातांच्या प्रमाणातही वाढ झालेली आहे. त्यामुळे हे गतिरोधक बदलावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
गतिरोधक बसविताना इंडियन रोड काँग्रेसकडून नियमावली आखून दिली आहे. या नियमांचे पालन करूनच गतिरोधक तयार करायचे असतात. गतिरोधकांची उंची किती असावी? दोन्ही बाजूला उतार कसा असावा? याबाबतची माहिती या नियमांमध्ये असते. मात्र, रावेतसह शहरातील इतर उपनागरांमध्ये हे नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांना पाठ व कंबरदुखीचा त्रास होत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले़ त्याशिवाय वाहनांचेही नुकसान होत असल्याचे वाहनचालकांची तक्रार आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्या की प्रशासन जागे होते. शहरातील वाहनांची गर्दी आणि वाढलेले अपघात यावर काही अंशी नियंत्रण ठेवण्यासाठी या गतिरोधकांचा उपयोग होतो. यासाठी गतिरोधक अत्यावश्यकच आहेत. पण ते करताना नवीच संकटे ओढवून घेण्यात आल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. परिणामी या गतिरोधकांबद्दल वाहनचालकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
पादचाºयांच्या सुरक्षेसाठी व वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक उभारले जातात. मात्र, पालिका प्रशासनाने ‘इंडियन रोड काँग्रेस’चे नियम व उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे डोळेझाक करीत अनेक ठिकाणी गतिरोधक उभारल्याचे दिसून येते. पादचाºयांना रस्ता ओलांडण्यासाठीच्या उंचवट्यांना रावेत, वाल्हेकरवाडी परिसरातूूून नियमित प्रवास करणाºया वाहनचालकांना सामोरे जावे लागत असून, त्यावर पडलेले खड्डे व उखडलेले पेव्हिंग ब्लॉक्स यांमुळे वाहन घसरण्याच्या घटनाही घडत आहेत.

जाधववाडी परिसरात अशास्त्रीय बांधणी

जाधववाडी : येथील सावतामाळी मंदिर ते जाधववाडी अंतर्गत
रस्ते, शिव रस्ता ते पुन्हा सावतामाळी मंदिर, मातोश्री कमान ते
आहेरवाडी चौक वडाचा मळा कुदळवाडी चिखली अशा दोन किलोमीटरच्या अंतराकरिता
तब्बल ३५ ते ४० गतिरोधक आहेत. त्यांतील अनेक गतिरोधकांची उंची अशास्त्रीय असल्याने अनेक वाहनचालकांना पाठदुखीचा त्रास उद्भवू शकतो.
या भागात मोठ्या प्रमाणात शेतीव्यवसाय केला जातो. त्यामुळे शेतीकरिता वापरल्या जाणाºया वाहनांचाही या रस्त्यांवर वावर आहे. शालेय बस, तसेच इतर वाहनांचा वावर अधिक असल्यामुळे गतिरोधक टाकले गेले आहेत. मात्र, ते नियमाला धरून नसल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते.
दरम्यान, शाळेजवळील गतिरोधक योग्य प्रकारे आहेत. जाधववाडीतील बहुतांश गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारले गेलेले आहेत. जाधव सरकार चौकात गतिरोधक आवश्यक आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे . आहेरवाडी चौकात चढावर एक गतिरोधक आहे.
त्यामुळे पीएमपीची गती कमी
होऊन बसचालकाचा गोंधळ उडतो. वाहन मागे घेण्याशिवाय पर्याय
राहत नाही. वाहन मागे घेताना अपघाताचा धोका अधिक संभवतो. काही नागरिकांना कंबरदुखी व पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे. या गतिरोधकांमध्ये योग्य ते बदल करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कंत्राटदार करताहेत मनाप्रमाणे बांधणी
रावेत वाल्हेकरवाडीमधील अंतर्गत रस्त्यांवर बांधण्यात येणाºया गतिरोधकांवर महापालिका अधिकाºयांचे कोणतेही नियंत्रण नाही. कंत्राटदाराला गतिरोधक बांधण्याचे काम दिल्यानंतर तो नियमानुसार बांधत आहे की नाही यावर महापालिकेच्या अभियंत्यांनी देखरेख ठेवणे आवश्यक आहे. मात्र, अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदार आपल्या मनाने गतिरोधक बांधत आहेत. गतिरोधक दुरून नजरेत यावेत यासाठी अंधारातही चमकतील असे पांढरे पट्टे त्यावर मारणे गरजेचे आहे. परंतु कित्येक ठिकाणी हे पट्टे नसल्याने वाहनचालक गडबडून जात आहेत.
अपघात टाळावेत यासाठी सातत्याने तक्रारी करून हे गतिरोधक बसविण्यात आले आहेत़ पण ते नियमबाह्य असल्याच्या तक्रारी अलीकडच्या काळात वाढू लागल्या आहेत. गतिरोधक बांधताना त्यांची लांबी, रुंदी आणि उंची निश्चित करण्यात आली आहे का? आदी नियमांचे पालन न केल्याचे दिसते. चारचाकी वाहनांची खालची बाजू या गतिरोधकांना लागून वाहनांचे नुकसान होत असल्याचेही दिसून आले आहे़

 

Web Title: Staggered speed control rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.