शिवसेनेच्या गडावर भाजपाची संघ‘नीती’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 03:07 AM2018-10-29T03:07:31+5:302018-10-29T03:08:14+5:30

गेल्या निवडणुकीत मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होते. येत्या निवडणुकीसाठी हे गड मिळविण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे.

Shivsena's fort ' | शिवसेनेच्या गडावर भाजपाची संघ‘नीती’

शिवसेनेच्या गडावर भाजपाची संघ‘नीती’

googlenewsNext

- विश्वास मोरे

गेल्या निवडणुकीत मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होते. येत्या निवडणुकीसाठी हे गड मिळविण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. ‘संघ’नीतीने नियोजन सुरू केले आहे. पक्षांतर्गत संघटना बांधणीची रणनीती आखली आहे. दोन्ही गडांवर दावा केल्याने शिवसेनेची अडचण वाढणार आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ युती झाल्यामुळे शिवसेनेकडे होते. मोदी लाटेचा प्रभाव आजही दिसून येत आहे. त्यामुळे आगामी लोकसभेची रणधुमाळी सुरू झाल्याने भारतीय जनता पक्षाने संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. शिवसेनेचे गड मिळविण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. या मतदारसंघात भाजपाचाच खासदार निवडून यावा यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे. परिणामी शिवसेनेची अडचण वाढणार आहे.
महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. ताकत वाढल्यानंतर स्वप्नही वाढतात. वाढायला हवीत, यात शंकाच नाही. सन २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार असल्याने त्याचे पडघम वाजू लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे भारतीय जनता पक्षाची मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची भाजपा कार्यकर्त्यांची बैठक काही दिवसांपूर्वी चिंचवडला झाली. निवडणुकीच्या निमित्ताने विचारमंथन आणि कार्यकर्त्यांची उमेद वाढविण्याचे, त्यांच्यात चैतन्य भरण्याचे काम नेत्यांनी केले. मतदारसंघनिहाय बूथ कमिट्या, सीएम चषक, उपक्रमांची माहिती घेतली. त्याचबरोबर ३ नोव्हेंबरला प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदान येथे होणाऱ्या अटल कार्यकर्ता महासंमेलनाची घोषणाही करण्यात आली. भाजपाची बैठक स्पर्धक पक्ष शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये धडकी भरविणारी आहे. शिवसेना-भाजपा युतीचे गुºहाळ सुरू असतानाच या दोन्ही मतदारसंघांतील कार्यकर्त्यांनी पुढील खासदार भाजपाचाच करण्याचा निर्धार केला आहे. ‘पिंपरी-चिंचवडमध्ये जे घडते त्याची हवा राज्यभर असते.’ त्यामुळे अटल महासंमेलन आणि लोकसभा निवडणूक प्रचार याची सुरुवात उद्योगनगरीतूनच व्हावी, असा आग्रह धरला आहे, अशी भूमिका भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी मांडली. तसेच हे दोन्ही मतदारसंघ भाजपालाच मिळावेत, अशी आग्रही मागणीही केली. अर्थात यावरून दोन्ही मतदारसघांतील भाजपा कार्यकर्ते कामाला लागले आहेत, हे दिसून येते.खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आमदार संजय भेगडे या स्थानिक नेत्यांनाही कानपिचक्या दिल्या. मोदी लाटेचा आजवर झालेला परिणाम, विरोधकाकडून होत असलेल्या टीकेचा समाचार घेण्याबरोबरच ‘आपल्या बुडाखालची हवा तपासून पाहा’ असा सल्लाही नेत्यांनी दिला.

बूथ कमिट्या स्थापन करण्याचे काम समाधानकारक नसल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीनंतरच्या औपचारिक पत्रकार परिषदेत समविचारांशी युतीस प्राधान्य दिले जाईल, संघटनात्मक ताकत वाढविण्यासाठी बैठक होती, अशीही भूमिका नेत्यांनी मांडली. येत्या शनिवारी होणाºया अटल महासंमेलनास होणाºया गर्दीवरून दोन्ही मतदारसंघांत भाजपाची हवा काय आहे, हे लक्षात येणार आहे. या मतदारसंघांवर पक्षाच्या बैठकीत दावा केल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील नेत्यांना संधी मिळू शकते. भाजपाकडून मावळसाठी आमदार लक्ष्मण जगताप आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार महेश लांडगे यांचे नाव पुढे येऊ शकते.

लोकसभेचे बिगुल वाजण्यापूर्वी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेकडून मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, राष्टÑवादीकडून भाऊसाहेब भोईर, पार्थ पवार, संजोग वाघेरे अशी नावे चर्चेत आहेत, तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादीकडून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, विलास लांडे अशी नावे चर्चेत आहेत. शिवसेनेने कार्यकर्ता संवाद, खासदार आपल्या दारी असे उपक्रम सुरू केले आहेत. मात्र, राष्टÑवादी काँग्रेस किंवा काँग्रेसकडून अद्यापही फारसे परिणामकारक उपक्रम सुरू नसल्याचे दिसून येत आहेत. युती आणि आघाडी झाल्यास दुरंगी लढती या मतदारसंघात दिसून येतील. मात्र, भाजपा, शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा लढती झाल्यावर विद्यमान खासदारांची दमछाक झाल्याशिवाय राहणार नाही.

एकीकडे युतीची चर्चा होत असताना युतीचे भागीदार असणाºया शिवसेनेचे गड पोखरण्यास भाजपाने सुरुवात केली आहे. त्याचे प्रतीक मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ होते. मित्रपक्षाच्या गडात जाऊन लोकसभा प्रचाराचा नारळ फोडणे ही शिवसेनेसाठी धोक्याची घंटा तर नाही ना, याचे आत्मपरिक्षण शिवसेनेने करण्याची गरज आहे.

 

Web Title: Shivsena's fort '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.