सुरक्षेचा प्रश्न : हॉटेल टेरेसचा बेकायदा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 03:34 AM2018-03-06T03:34:48+5:302018-03-06T03:34:48+5:30

शहरात अनेक हॉटेलवाल्यांनी त्यांच्या हॉटेलच्या रचनेत बदल करून रूफ टॉप हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. दोन महिन्यांपूर्वी मुंबईतील लोअर परळ भागातील कमला मिल येथील हॉटेलच्या टेरेसला (रूफ टॉप) आग लागून १५ नागरिकांना जीव गमवावा लागला.

 Security Question: Illegal use of the hotel terrace | सुरक्षेचा प्रश्न : हॉटेल टेरेसचा बेकायदा वापर

सुरक्षेचा प्रश्न : हॉटेल टेरेसचा बेकायदा वापर

googlenewsNext

रहाटणी - शहरात अनेक हॉटेलवाल्यांनी त्यांच्या हॉटेलच्या रचनेत बदल करून रूफ टॉप हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. दोन महिन्यांपूर्वी मुंबईतील लोअर परळ भागातील कमला मिल येथील हॉटेलच्या टेरेसला (रूफ टॉप) आग लागून १५ नागरिकांना जीव गमवावा लागला. अशा दुर्घटना घडल्यानंतर त्यातून दक्षतेचा धडा घेण्याऐवजी अनुकरण केले जात दिसून येत आहे.
शहरात रूफ टॉप हॉटेलांना परवानगी आहे का, याबाबत माहिती ग्राहक हक्क संघर्ष समिती व पिंपरी-चिंचवड ग्राहक सेवा संस्था यांनी माहितीच्या अधिकारात मागितली होती. या वेळी रहाटणी व पिंपळे सौदागर भागात असे अनेक हॉटेल आहेत. मात्र, त्या हॉटेल चालकांना टेरेसचा व्यावसायिक वापर सुरू ठेवण्याबाबत महापालिकेने अथवा अग्निशामक विभागाने कोणत्याही स्वरूपाची परवानगी दिली नसल्याचे माहिती मिळाली आहे.
टेरेसवर हॉटेल सुरू करणे उचित नसल्याने परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बांंधकाम नियमावलीतसुद्धा अशा पद्धतीच्या वाढीव स्ट्रक्चरला परवानगी देण्याची तरतूद नाही. शहरातील बहुतांश हॉटेलचालकांनी सर्रासपणे टेरेसवर हॉटेल सुरू केली आहेत. हे बेकायदा असून, सुरक्षेसाठी धोकादायक ठरणारे आहे. इमारतीच्या शेडवर पत्राशेड उभारण्यास परवानगी दिली जाते. इमारतीच्या बांधकामाला नुकसान पाहोचू नये, उन्हाच्या तीव्रतेमुळे स्लॅबला तडे जाऊ नयेत, या उद्देशाने पत्राशेड उभारण्यास मुभा दिली जाते. मात्र त्या शेडला बंदिस्त करून त्याचा कोणताही व्यावसायिक वापर करण्यास परवानगी दिली जात नाही.

असा वापर टाळणे हिताचे : किरण गावडे
विशेष म्हणजे मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना रूफ टॉप हॉटेल सुरू करण्याचा मोह आवरत नाही. छोट्या हॉटेल व्यावसायिकांकडे जागा अपुरी असते. ते गरजेनुसार टेबल, खुर्च्या मूळ स्ट्रक्चरच्या बाहेर ठेवतात. परंतु पुन्हा रोज हॉटेल बंद करताना आत घेतात. त्यांच्यामुळे काही विपरीत परिणाम होत नाही. मात्र, मोठ्या हॉटेलांमध्ये सर्रास टेरेसचा वापर होतो. मोठ्या संख्येने तेथे ग्राहक बसलेले असतात. दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित, वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे टेरेसचा असा वापर टाळणे हिताचे ठरेल, असे मत महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे प्रमुख अधिकारी किरण गावडे यांनी व्यक्त केले.

शहरातील सुमारे ४०० हॉटेल व्यावसायिक पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यांच्यापैकी कोणाचेही रूफ टॉप
हॉटेल नाही. या असोसिएशनचे सदस्य असलेल्या हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेऊन सुरक्षिततेच्या उपाययोजनांविषयी वेळोेवेळी मार्गदर्शन केले जाते. शहरात हॉटेल व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. सर्वच हॉटेल व्यावसायिक असोसिएशनचे सदस्य नाहीत. त्यामुळे इतरांचे माहिती नाही, मात्र सदस्यांना अशी बेकायदा रूफ टॉप हॉटेल बनवू नयेत, असे सूचित केले आहे. दुर्घटनेस निमंत्रण देणारी शेडही उभारू नये, असे आवाहन सर्वांना केले आहे.
- पद्मनाभ शेट्टी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशन

Web Title:  Security Question: Illegal use of the hotel terrace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.