महाराष्ट्रातच संस्कृत भाषेची दुर्दशा - परशुराम परांजपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:32 AM2018-07-14T01:32:25+5:302018-07-14T01:33:21+5:30

संस्कृत साहित्याच्या अभ्यासाचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. शिक्षणपद्धतीची इतकी दुरवस्था पाहायला मिळत आहे, की शिक्षकवर्गामध्येही ज्ञानाचा अभाव जाणवत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत साहित्याची गोडी निर्माण होऊ शकलेली नाही.

Sanskrit language in Maharashtra news | महाराष्ट्रातच संस्कृत भाषेची दुर्दशा - परशुराम परांजपे

महाराष्ट्रातच संस्कृत भाषेची दुर्दशा - परशुराम परांजपे

googlenewsNext

संस्कृत साहित्याच्या अभ्यासाचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. शिक्षणपद्धतीची इतकी दुरवस्था पाहायला मिळत आहे, की शिक्षकवर्गामध्येही ज्ञानाचा अभाव जाणवत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत साहित्याची गोडी निर्माण होऊ शकलेली नाही. दाक्षिणात्य भागात संस्कृत भाषेचे अभ्यासक आहेत; पण जसे पाहिजेत तसे अभ्यासक आपल्याकडे सापडत नाहीत. महाराष्ट्रातच संस्कृत भाषेची दुर्दशा आहे, अशी खंत संस्कृत अभ्यासक परशुराम परांजपे यांनी कालिदास दिनानिमित्त ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

ते म्हणाले, कालिदासाला संस्कृत साहित्यात कविकुलगुरू असे म्हटले आहे. जी पाच महाकाव्ये आहेत, त्यांना संस्कृत साहित्यात विशेष दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामध्ये रघुवंश, कुमारसंभव, किरातार्जुनीय, शिशुपालवध, नैषधीय महाचरित यांचा समावेश आहे. यामधली रघुवंश, कुमारसंभव ही दोन महाकाव्ये कालिदास याचीच आहे. यातून संस्कृत साहित्यातील त्याचे महत्त्व विशद होते. या दोन्हींच्या तुलनेत किरातार्जुनीय, शिशुपालवध, नैषधीय महाचरित ही काव्ये समजायला काहीसे अवघड आहे. काव्य हे मनोरंजनासाठी वाचन करायची अशी एक संकल्पना आहे. पण या तीन काव्यांचा अभ्यास करताना मनोरंजन राहते बाजूला; शब्दकोश घेऊन त्याचे अर्थ शोधावे लागतात. त्या तुलनेत कालिदासाचे काव्य अत्यंत रम्य आहे. शब्दश: अर्थ कळला नाही तरी त्याला काय म्हणायचे आहे हे गवसते. कालिदासाचे लेखन हे लालित्यपूर्ण आहे. श्लोकातून जे सांगायचे आहे ते सहजपणे पोहोचते. त्यातून एक निर्मळ आनंद मिळतो. कालिदासाने एकूण सात काव्यरचना लिहिल्या आहेत, त्यातील दोन महाकाव्ये, दोन खंडकाव्ये आणि तीन नाटके आहेत. त्यामध्ये रघुवंश, कुमारसंभव ही महाकाव्ये, मेघदूत आणि ॠतुसंहार खंडकाव्ये आणि मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, अभिज्ञान शाकुंतल अशा तीन नाटकांचा समावेश आहे. संस्कृत साहित्यात कालिदासाचे प्रत्येक काव्य हे शिरोधार्य मानले गेले आहे. ते प्रमाणभूत मानले गेले आहे. प्रसिद्ध जर्मन कवी गटे याने ‘स्वर्ग आणि पृथ्वी यांचे मधुर मिलन जर कुठे पाहायचे असेल तर कालिदासाचे ‘शाकुंतल’ पाहावे’ असा उल्लेख केला होता. पाश्चात्य कवी आणि अभ्यासकांनाही कालिदासाच्या काव्याने भुरळ पाडली होती. त्यांच्या काव्याचे परकीय भाषांमध्येच अधिक अनुवाद झाले आहेत.
‘मेघदूत’ हा एक विरहशृंगार आहे. कुबेराचा सेवक यक्ष मालकाचे काम करीत नाही, पत्नीसोबत असल्याने तू ते करू शकला नाहीस. कर्तव्यच्युत राहिलास असे म्हणून कुबेर त्या यक्षाला वर्षभर पत्नीपासून लांब राहण्याचा शाप देतो. आषाढ महिना जवळ आला की त्याला पत्नीची प्रकर्षाने आठवण येते. ती सहन होत नाही. म्हणून मेघदूतामध्ये ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ असा उल्लेख करण्यात आला आहे. पत्नीच्या विरहाने दु:खी झालेला तो ढगाला दूत समजून पत्नीला संदेश पाठवतो. मिलनाच्या विरहाने व्याकुळ झालेल्या यक्षाला समोरचा ढग निर्जीव आहे याचे भान राहिलेले नाही, त्यालाच तो आपली व्यथा आणि वेदना सांगत आहे. यात उज्जैनीचे वर्णन कालिदासाने इतके सुंदर केले आहे, की अभ्यासकांना ते कालिदासाचे जन्मगावच आहे की काय अशी शंका येते. तिथे क्षिप्रा नावाची नदी आहे. त्याचे वर्णन करताना नदी वेडवाकडे वळण घेते, ती हत्तीच्या गंडस्थळाप्रमाणे असल्यासारखे भासते. त्यावर पुण्याच्या एस. व्ही. भावे यांनी अलंकापुरीच्या मार्गाने विमानाने प्रवास केला होता. कालिदासाने सांगितलेल्या मार्गाप्रमाणेच सर्व दिसते. त्या काळात हे सगळे कालिदासाला कसे कळले, याचे सर्वांना आश्चर्य वाटते. यातून कालिदासाची सर्वश्रेष्ठता सिद्ध होते. यक्षाच्या नावाचा उल्लेख कालिदासाने केलेला नाही, याबाबत अभ्यासकांना थोडे खटकते. इतके बारीकसारीक वर्णन करणारा त्याने यक्षाच्या नावाला समोर आणले नाही. धर्मशास्त्रानुसार त्याने जे केले ते योग्यच आहे असे वाटते. जो आपल्या मालकाच्या आज्ञेचे पालन करीत नाही, अशा विश्वासघातक्याचा उल्लेख कधीच काव्यात करू नये, असा धर्मशास्त्राचा पायंडा आहे. संस्कृत साहित्यात दर्जेदार काव्य पाहायला मिळते. मात्र दिवसेंदिवस संस्कृत भाषेच्या अभ्यासाचे प्रमाण हे कमी होत चालले आहे. महाराष्ट्रात संस्कृत साहित्याचे अभ्यासक कमी सापडतात.

Web Title: Sanskrit language in Maharashtra news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.