PCMC: आम्हाला महापालिकेची नोकरी नको; दहा जणांनी नोकरी नाकारली

By प्रकाश गायकर | Published: March 9, 2024 05:48 PM2024-03-09T17:48:58+5:302024-03-09T17:50:01+5:30

महापालिकेत लिपिक पदासाठी निवड होऊनही महापालिकेपेक्षा अन्य शासकीय विभागातील पदाच्या नोकरीला उमेदवारांनी प्राधान्य दिले आहे....

PCMC: We don't want municipal jobs; Ten people refused the job | PCMC: आम्हाला महापालिकेची नोकरी नको; दहा जणांनी नोकरी नाकारली

PCMC: आम्हाला महापालिकेची नोकरी नको; दहा जणांनी नोकरी नाकारली

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरीसाठी निवड होऊनही अनेक तरुण रुजू होत नाहीत. तर दहा जणांनी चक्क अर्ज देत नोकरीच नाकारली असल्याचे समोर आले आहे. महापालिकेत लिपिक पदासाठी निवड होऊनही महापालिकेपेक्षा अन्य शासकीय विभागातील पदाच्या नोकरीला उमेदवारांनी प्राधान्य दिले आहे.

महापालिकेच्या लिपिक पदाच्या परीक्षेत १७७ जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत १२४ जणांनी महापालिकेची नोकरी स्वीकारली आहे. तर, १० जणांनी नोकरी नाकारली असून, ४३ जण अद्याप नोकरीवर रुजू झालेले नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासन विभाग अद्याप लिपिक पदावरील त्या ४३ उमेदवारांची रुजू होण्यासाठी वाट पाहात आहे.

महापालिकेच्या वतीने विविध १५ पदांसाठी एकूण ३८७ जागांसाठी मे २०२३ मध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत रुजू करून घेतले जात आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. दरम्यान, या नोकर भरतीसाठी परीक्षा देणाऱ्या अनेक उमेदवारांनी शासनाच्या महसूलसह अन्य विभागाच्या पदांसाठी विविध परीक्षा दिल्या. महापालिकेच्या लिपिक पदासाठी उत्तीर्ण झालेल्या १७७ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना रुजू करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, दरम्यानच्या काळात तलाठी भरतीसह इतर परीक्षांचाही निकाल जाहीर झाला. यामध्ये अनेक उमेदवार महापालिकेची लिपिक आणि तलाठी परीक्षेसह शासनाच्या इतर विभागातील परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समोर आले. त्यामुळे निवड झालेल्या १७७ लिपिकांपैकी आत्तापर्यंत १२४ लिपिक महापालिका सेवेत रुजू झाले आहेत. तर, त्यातील १० तरुण-तरुणींनी ई-मेल व लेखी अर्जाद्वारे आम्हाला नोकरी नकोय, म्हणून महापालिका प्रशासनाला कळविले आहे. तर ४३ जण पात्र असून अद्याप नोकरीवर रुजू झालेले नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी महापालिकेच्या लिपिक पदापेक्षा शासनाच्या अन्य नोकरीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

अन्यथा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी

त्या उमेदवारांना महापालिकेकडून आणखी एक संधी दिली जाईल, अन्यथा वेटिंग लिस्टमधील पात्र केलेल्या उमेदवारांना त्या जागेवर संधी देण्यात येणार असल्याचे प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दहा उमेदवारांनी नोकरी नाकारली आहे. तर ४३ जण अद्यापही महापालिकेच्या लिपिक पदावर रुजू झाले नाहीत. विद्यार्थी महापालिकेसह शासनाच्या विविध विभागातील पदासाठी परीक्षा देतात. या परीक्षांचाही निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे अनेकांमध्ये संभ्रम असल्याने ते रुजू होण्यास येत नाही.

- विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग

Web Title: PCMC: We don't want municipal jobs; Ten people refused the job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.