पवनेचे झाले गटार : मैलामिश्रित पाण्याने नदीपात्र प्रदूषित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 01:12 AM2018-11-04T01:12:46+5:302018-11-04T01:13:49+5:30

वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात निर्माण होणारे सांडपाणी आणि मैलापाण्याच्या वाढलेल्या प्रमाणामुळे नद्यांची गुणवत्ता ढासळत आहे.

Pawan River pollinated by melting water | पवनेचे झाले गटार : मैलामिश्रित पाण्याने नदीपात्र प्रदूषित

पवनेचे झाले गटार : मैलामिश्रित पाण्याने नदीपात्र प्रदूषित

Next

रावेत  - वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात निर्माण होणारे सांडपाणी आणि मैलापाण्याच्या वाढलेल्या प्रमाणामुळे नद्यांची गुणवत्ता ढासळत आहे. मर्यादित शुद्धीकरण प्रकल्पांमुळे प्रक्रियेशिवाय नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले असून, रावेत येथील पवना नदीतील प्रदूषण चिंताजनक स्थितीपर्यंत पोहोचले आहे. रावेत परिसरात दिसणारी स्वच्छ व प्रेक्षणीय पवना काहीच अंतरावर अतिशय काळवंडलेली, दुर्गंधीत, प्रदूषित व गटारमय दिसते आणि याला एकमेव कारण म्हणजे पालिकेद्वारे नदीपात्रात प्रतिदिन सोडले जाणारे लाखो लिटर सांडपाणी व मैलापाणी.

करोडो रुपये खर्च करून परिसरातील रस्ते व उड्डाणपूल चकचकीत करणाºया महापालिकेडून नागरिकांनी दैवत मानलेल्या नदीचे असे प्रदूषण करणे हे असंवेदनशील आणि लाजीरवाणे आहे. पवना नदीपात्रामध्ये शहरातील काही झोपडपट्ट्यांचे थेट नाल्याद्वारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी मिसळत आहे.

चिंचवड, भोसरी औद्योगिक वसाहतीतील वाहून येणारे रसायनमिश्रित सांडपाणी त्याशिवाय, बोपखेल, ताथवडे, थेरगाव, पिंपरी येथील नाल्याचे पाणीदेखील थेट नदीपात्रात मिसळत असल्याने पवनेचे पाणी प्रदूषित होत आहे. रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातून २४.५ किलोमीटर अंतरात पवना नदी वाहते. पवना नदी किवळे, रावेत येथे शहरात प्रवेश करून चिंचवड, पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी मार्गे सांगवी, दापोडी-हॅरिस पुलाजवळ मुळा नदीला मिळते. वाल्हेकरवाडी येथील जाधव घाट लगत असणाºया नाल्यातून पवना नदीपात्रात थेट नाल्याचे पाणी मिसळत असल्याचे पाहणीत आढळले.
पवना नदीकाठच्या नाल्यांमध्ये विशेषत: झोपडपट्ट्यांतून थेट जमा होणारे सांडपाणी मिसळते. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सध्या शहरामध्ये ९ ठिकाणी १३ मैलाशुद्धीकरण केंद्र आहेत. शहरातील दरडोई पाणीपुरवठ्याचा दर, वाढती लोकसंख्या, यातून निर्माण होणारे सांडपाणी आणि मैलापाण्याच्या तुलनेत कार्यरत असलेली मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रे अपुरी आहेत. शहरात टाकलेल्या मलनिस्सारण नलिकांची लांबी १४७२ कि.मी. इतकी असून, सध्या प्रक्रिया करण्यात येणारे सांडपाणी दररोज जवळपास ३०० दशलक्ष लिटर इतके आहे. दररोज जवळपास ३०० दशलक्ष लिटर मैलापाणी निर्माण होते. शहरात सध्या प्रतिदिन २३० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करणारी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे कार्यरत आहेत. उरलेले पाणी थेट नदीत सोडले जाते. महापालिकेने उभारलेल्या प्रकल्पाच्या कार्यक्षमतेबद्दल वाद आहेत. शहरातून निर्माण होणाºया मैलापाण्यातील ५० टक्के पाणी थेट नदीत सोडले जात आहे.

उपाययोजना : घरगुती सांडपाणी थेट नदीत

शहरातून वाहणा-या नद्यांमध्ये थेट मिसळणाºया सांडपाण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी महापालिकेतर्फे उपाययोजना केली जात आहे. औद्योगिक क्षेत्राचे मैलापाणी नदीपात्रात मिसळत नाही. केवळ घरगुती वापराचे दूषित पाणी काही ठिकाणी नदीपात्रात मिसळत आहे. ज्या ठिकाणी नाल्यातून थेट नदीत पाणी मिसळले जात आहे असे सर्व नाले सिस्टीममध्ये घेण्याचे काम चालू आहे.
- मकरंद निकम, प्रभारी सहशहर अभियंता

पवना नदी किनारी असलेली गावे प्रक्रियाविना सांडपाणी नदीपात्रात सोडून प्रदूषण करीत आहेत. अशुद्ध पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. नागरिकांना आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. त्यावर तातडीने अटकाव करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. नदीकिनाºयावरून एसटीपीला जाणारे अनेक ड्रेनेज नलिका मोठ्या प्रमाणात गळती करत आहेत. त्याची तत्काळ दुरुस्ती करावी. सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी मोठ्या सोसायट्यांमध्ये एसटीपी कार्यान्वित केल्यास मालमत्ता करात सवलत द्यावी.
- गणेश बोरा, पर्यावरण प्रेमी

नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

अशुद्ध पाण्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे आणि नागरिकांना आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत
घरगुती सांडपाणी नदीत मिसळून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करून स्रोताच्या ठिकाणीच प्रदूषण नियंत्रण करणे आवश्यक
नदी घाटावरील छोट्या गावात शोषखड्ड्यावर आधारित सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा करणे
महापालिकास्तरावर एसटीपी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये बºयाच नवीन समाविष्ट गावात अजूनही एसटीपीची सुविधा नाहीये़ ती लवकर उभारण्यात यावी.
नदी किनाºयावरून एसटीपीला जाणा-या अनेक नलिकांना मोठ्या प्रमाणात गळती आहे. त्याची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक.
शहरातील मोठ्या सोसायट्यांमध्ये एसटीपी कार्यान्वित करण्यासाठी सक्ती करावी.
शहरातील २६ नदी घाटांवर ब-याच प्रमाणात निर्माल्य आणि कचरा टाकून नदी दूषित करण्यात येते. हे रोखण्यासाठी सीसीटीव्ही लावून आणि सुरक्षारक्षक नेमण्यात यावे.
नदीत मिश्रित होणाºया सांडपाणी नाल्यावर विविध उपाय करून ते पाणी शुद्ध करून नदीत सोडण्यात यावे.
सर्व एसटीपी प्रकल्पांना वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी जनरेटर बॅकअपची सुविधा करणे.

Web Title: Pawan River pollinated by melting water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.