महावितरणचा लघुउद्योजकांना ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:49 AM2017-12-29T01:49:20+5:302017-12-29T01:49:29+5:30

भोसरी : नोटाबंदी, जीएसटीमुळे आलेल्या मंदीच्या सावटातून सावरत असतानाच खंडित वीजपुरवठ्याने औद्योगिक परिसरातील उद्योजकांना हैराण केले आहे.

MSEDCL's 'Shock' | महावितरणचा लघुउद्योजकांना ‘शॉक’

महावितरणचा लघुउद्योजकांना ‘शॉक’

googlenewsNext

भोसरी : नोटाबंदी, जीएसटीमुळे आलेल्या मंदीच्या सावटातून सावरत असतानाच खंडित वीजपुरवठ्याने औद्योगिक परिसरातील उद्योजकांना हैराण केले आहे. जुन्या ओव्हरहेड वायर तुटल्याने, तसेच कमी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरवर जादा भार दिल्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. त्याचा थेट परिणाम लघुउद्योगांमधील उत्पादनावर होत असल्याच्या तक्रारी उद्योजक करीत आहेत.
भोसरी, पिंपरी, चिंचवड, चिखली, तळवडे आदी भागात सुमारे साडेसात हजार लघुउद्योजक आहेत. मोठ्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनासाठी लागणाºया सुट्या भागांचा पुरवठा ते करतात. गेल्या काही दिवसांमध्ये विद्युतरोहित्र नादुरुस्त होणे, डीपी बॉक्स जळणे, केबल जळणे यांसारख्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे विस्कळीत वीज पुरवठ्याचा सामना करावा लागतो. त्याचा थेट परिणाम लघुउद्योजकांच्या उत्पादनावर होत आहे. मोठ्या कंपन्यांकडून मिळालेल्या आॅर्डर अनेक लघुउद्योगांना वेळेत पूर्ण करता येत नाहीत. वीजपुरवठा बंद झाल्यानंतर कामगारांना बसून पगार द्यावा लागतो. वीज आल्यानंतर काम करवून घ्यायचे म्हटल्यास ओव्हर टाइमसाठी जादा पैसे मोजावे लागतात. विजेच्या समस्येमुळे जनरेटरच्या डिझेलचा खर्च वाढला आहे.
पावसाळ्यात सुरू झालेला हा त्रास सहा महिन्यांपासून कायम असल्याचे उद्योजक सांगतात. हार्डनिंगसारखी कामे चालणाºया उद्योगांना २४ तास वीजपुरवठा लागतो. वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यास या कामासाठी जनरेटरही निरुपयोगी ठरतात. गुरुवारी अघोषित भारनियमन सुरूआहे. त्यामुळे औद्योगिक सुटीच्या दिवशी कामगारांना जादा वेतन देऊनही बोलवता येत नाही. उत्पादन आणि वीजपुरवठा याची सांगड घालत काम करवून घेताना उद्योजकांच्या नाकी नऊ येत आहे. लघुउद्योगांमधून सुट्या भागांचा पुरवठा करण्यास विलंब झाल्यास मोठ्या उद्योगांमधील उत्पादनावरहीत्याचा परिणाम होतो. त्यांनाही वेळेत आॅर्डर पूर्ण करण्यात अडचणी येतात. लघुउद्योग व मोठ्या उद्योगांमधील उत्पादनाच्या साखळीवर विजेच्या लपंडावाचा परिणाम होत आहे. चिखली, कुदळवाडी परिसरास २२ केडब्ल्यू या फीडरने वीजपुरवठा होतो. या फीडरवरून खेड तालुक्यातील मोई या गावाला वीजपुरवठा केला जातो. या परिसरात खडी मशिन आहेत. त्याचा ताण एकूण विद्युत पुरवठ्यावर येतो. त्यामुळे चिखली, कुदळवाडी भागाची वीज समस्या तीव्र बनत चालली आहे.
रात्री-अपरात्री गायब होणाºया विजेमुळे एमआयडीसी परिसरात चोºयांचे प्रमाण वाढले आहे. सायंकाळी उशिरा अथवा रात्र पाळीहून घरी परतणाºया कामगारांनाही अंधारातून वाट काढताना कसरत करावी लागते. औद्योगिक परिसरात निवासी क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनाही विस्कळीत वीजपुरवठ्याचा सामना करावा लागतो. दुसरीकडे निवासी भागात असलेल्या काही उद्योगांना रहिवासी फीडरमधून वीजपुरवठा होतो.
उद्योगांमध्ये विजेचा जादा वापर करावा लागत असल्याने या फीडरवर ताण येतो. परिणामी विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागते.
यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी उद्योजकांमधून होत आहे. औद्योगिक परिसराला स्वतंत्र फीडर देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. औद्योगिक परिसर आणि
वाढते नागरीकरण लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरालाच स्वतंत्र विभागाचा दर्जा (सर्कल) मिळण्याची गरज आहे.
इन्फ्रा-२ चे काम संथ गतीने
विद्युत वितरण कंपनी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातर्फे औद्योगिक परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘इन्फ्रा-२’चे काम हाती घेण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत वडमुखवाडी-अलंकापूरम्, तळवडे- देवी इंद्रायणी आणि भोसरी एमआयडीसी- पी-२०१ या तीन ठिकाणी नवीन सबस्टेशन आणि परिसरात ३०२ नवीन रोहित्र उभारण्यात येणार आहे. तसेच, १४५ रोहित्रांच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
उच्चदाब वाहिनी टाकणे, नवीन लघुदाब वाहिनी, नवीन फीडर पिलर बसविणे, जुने फीडर पिलर बदलणे, उपरी लघुदाब वाहिनी भूमिगत करणे, ए. बी. स्विच बदलणे, रोहित्रांना सुरक्षा भिंत उभारणे, जुन्या रोहित्रांना आर्थिंग करणे आदी कामे केली जाणार आहेत. त्यासाठी सुमारे ११० कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. औद्योगिक परिसरातील वीज पुरवठ्याचा मोठा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे. मात्र, हे काम संथ गतीने सुरू असून, त्याला गती देण्याची मागणी होत आहे.
>पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील अनियमित वीज पुरवठ्याचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या भोसरी विभागाचे विभाजन करून स्वतंत्र एमआयडीसी विद्युत विभागाची निर्मिती करण्याची मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. महावितरणच्या पायाभूत सुविधा जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे जुन्या ओव्हरहेड वायर तुटून किंवा कमी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरवर जादा भार दिल्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. अनेक फीडर बंद अवस्थेत आहेत. काही बिघाड झाल्यास महावितरणचे कर्मचारी वेळेवर येत नाहीत. मुळात त्यांच्याकडे मनुष्यबळ अपुरे आहे. विजेच्या एक ना अनेक समस्यांनी लघुउद्योजकांना ग्रासले आहे. ऊर्जामंत्र्यांपर्यंत तक्रारी करूनही त्यांची दखल घेतली जात नाही.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना

Web Title: MSEDCL's 'Shock'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.