दिघीत राष्ट्रीयीकृत बँक, टपाल कार्यालय नसल्याने होतेय गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 03:18 AM2018-12-11T03:18:14+5:302018-12-11T03:20:23+5:30

‘स्मार्ट सिटी’तील शोकांतिका; स्थानिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी

Marginalized nationalized bank, due to absence of post office, is inconvenient | दिघीत राष्ट्रीयीकृत बँक, टपाल कार्यालय नसल्याने होतेय गैरसोय

दिघीत राष्ट्रीयीकृत बँक, टपाल कार्यालय नसल्याने होतेय गैरसोय

Next

दिघी : डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारत असलेल्या केंद्र सरकारने जनधन योजना राबविली आणि बँकिंग क्षेत्राशी सर्वसामान्यांना जोडले. आदिवासी पाड्यापासून दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकास बँकेचे खाते उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, डिजिटल इंडियातील स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतले तब्बल चाळीस हजार लोकसंख्येच्या दिघीगावात कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेची एकही शाखा नाही. त्यामुळे जनधनसह विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी स्थानिकांना कसरत करावी लागत आहे. याचा आर्थिक व्यवहारांवर परिणाम होत आहे. त्यामुळे थेट केंद्र शासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना आणि उपक्रमांपासून दिघीकर वंचित राहत आहेत.

दिघीगावचा २० वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश झाला. चार हजार असलेली लोकसंख्या चाळीस हजारांच्या घरात पोहोचली आहे. परंतु, या भागात अजूनही अनेक नागरी सुविधा पोहोचलेल्या नाहीत. दोन्ही शहरांच्या मध्यवर्ती असलेल्या दिघी गावात आजही कोणत्याही बँकेची शाखा नाही. त्यामुळे येथील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शासनाने खेडोपाडी व गावागावांत तेथील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा याकरिता बँक उपलब्ध करून दिल्या आहेत. शासनाकडून काही ना काही उपक्रम व योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये बँकांचा थेट संबंध येतो. या योजनांचा फायदा मिळवण्यासाठी बँकेत खाते असावे लागते. परंतु दिघीत बँकच नसल्याने येथील नागरिक या योजनांचा फायदा घेऊ शकत नाहीत. जन-धन योजना, सुकन्या योजना किंवा गॅस सबसिडी अशा प्रत्येक योजनांचा थेट बँकांशी संबंध येतो.

दिघी परिसरातील गावठाण, आदर्शनगर, दत्तनगर, विठ्ठल मंदिर चौक या भागांत एकूण दोन ते अडीच हजार किराणा व व्यावसायिक दुकाने आहेत. येथील व्यापाºयांनाही बँक नसल्याने आपला वेळ व पैसा खर्च करून भोसरी किंवा विश्रांतवाडी या ठिकाणी जाऊन आपल्या दुकानातील रोजचा व्यवहार करावा लागतो. रोज दुकाने बंद करून जाणे शक्य होत नाही. त्यामुळे परिसरातील सहकारी बँकेचा आधार घेत छोटे व्यवहार केले जातात. या भागात पाच ते सहा एटीएम मशीन आहेत. परंतु या मशीनमध्ये रोकड नसते. एटीएममध्ये खडखडाट असतो.

मनी ट्रान्सफर सेंटरवर राहवे लागते अवलंबून
महापालिकेत गावाचा समावेश झाल्यापासून येथील लोकवस्ती वाढत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतील रहिवासी येथे व्यावसायानिमित्त तर काही लष्करी विभागात नोकरीनिमित्त दिघी गावात मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. कष्ट करून मिळविलेला पैसा जर गावी पाठवायचा असेल किंवा बाहेर परदेशात शिकणाºया मुलांना पाठवायचा असेल तर मनी ट्रान्सफर सेंटरचा आधार घ्यावा लागत आहे. परंतु तेथेही मोठ्या प्रमाणात त्यांची लूट होत आहे. दिघी परिसरात बँक नाही म्हणून अनेक मनी ट्रान्सफर सेंटर उभारले आहेत. त्याच्याकडून गरजू नागरिकांची मोठी लूट होताना दिसत आहे.

दिघीतील नागरिक, समाजसेवक व व्यापारी यांनी एकत्रित येऊन अनेक राष्ट्रीय बँकांना साकडे घातले होते. मात्र कोणीही या भागात येण्यास तयारी दर्शवली नाही. या भागात बँक सुरू व्हावी याकरिता नागरिक वारंवार बँकांशी संपर्क करत आहेत. बँक नसल्याने येथील नागरिकांना अनेक व्यावहारिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिक बँकेच्या प्रतीक्षेत आहेत.

चाकरमान्यांवर येतेय कामाला दांडी मारण्याची वेळ
दिघी परिसरातील हाउसिंग सोसायट्यांच्या दैनंदिन व्यवहारासाठी जसे मेन्टनन्स भरणे, वेंडरचे पैसे बँकेत जमा करण्यासाठी बँकेचा आधार घ्यावा लागतो. मात्र परिसरात सुविधा नसल्याने विश्रांतवाडी किंवा भोसरीला जावे लागते. सोसायटीतील रहिवासी नोकरदारवर्ग असल्यामुळे रविवारी सुटी असते मात्र या दिवशी बँकेला सुटी असते. इतर वेळी सुटी काढून कामे करावी लागतात़ यामुळे नोकरीच्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात.

दिघी परिसरात बरेच मोठे व्यापारी व व्यावसायिक दुकाने आहेत. दिवसाला जमा होणारी रक्कमसुद्धा मोठी असते. ही मोठी रक्कम विश्वासहर्ता असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करण्यात आमचा कल जास्त असतो. कारण भविष्यात व्यवसाय वृद्धीसाठी किंवा घरासाठी कर्ज घेण्यास सहज सोपे व व्याजदर कमी असतो. मात्र दिघीत राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा नसल्याने दररोजची जमा होणारी रक्कम परिसरातील सहकारी बँकेत भरावी लागते. नंतर वेळ काढून ही रक्कम परत भोसरीतील राष्ट्रीयीकृत बँकेत जाऊन खात्यावर जमा करतो. दररोज दुकान बंद करून जाणे शक्य होत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव सहकारी बँकेचा आधार घ्यावा लागत आहे.
- मुकेश चौधरी, व्यावसायिक दिघी

मी स्टेट बँकेच्या भोसरी ब्रँचला चकरा मारून थकलो; परंतु गर्दीमुळे मला शक्य न झाल्यामुळे विश्रांतवाडीतील, कळस या शाखेत खाते काढले़ परंतु घरापासून अंदाजे दहा किलोमीटर जाने होते तेही तेथे पासबुक प्रिंटिंग मशिन नाही भोसरीतील पण मशिन बरेचदा बंद असते. दिघीला कुठल्याही राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा झाल्यास भोसरी शाखेची गर्दी कमी होईल तसेच दिघीकरांचे हेलपाटे कमी होतील. व वेळ वाचेल.
- दामोदर गाडगे, आदर्शनगर दिघी

दिघी पोस्ट आॅफिसच्या अंतराचा विचार केला तर दिघीपासून खूप लांब आहे. येथील गर्दीमुळे तर छोट्या कामाकरिता दिवस वायाला जातो. दिघीतील रहिवाशांना याचा नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. शासनाच्या संबंधित यंत्रणांनी यावर त्वरित उपाययोजना करावी.
- सुधीर पाटील, पोलाइट पॅनोरमा दिघी

Web Title: Marginalized nationalized bank, due to absence of post office, is inconvenient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.