ठेकेदाराच्या मद्यपी पर्यवेक्षकाने अरेरावी केल्याने महापालिका अभियंत्यास नागरिकांचा घेराव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 07:34 PM2019-01-18T19:34:53+5:302019-01-18T19:49:08+5:30

बहिरट ब्रदर्स या ठेकेदाराच्या मद्यपी पर्यवेक्षकाने या वेळी तक्रार करणाऱ्या स्थानिक नागरिकांना अरेरावी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ब प्रभागाच्या स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांना घेराव घातला. 

Citizen gherao municipal engineer due to contractor's Alcohol Supervisor | ठेकेदाराच्या मद्यपी पर्यवेक्षकाने अरेरावी केल्याने महापालिका अभियंत्यास नागरिकांचा घेराव

ठेकेदाराच्या मद्यपी पर्यवेक्षकाने अरेरावी केल्याने महापालिका अभियंत्यास नागरिकांचा घेराव

Next

रावेत : वाल्हेकरवाडी येथील भोंडवे वस्तीतील शिवतीर्थ कॉलनीतील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र रस्ता स्वच्छ न करता, तसेच कमी प्रमाणात डांबर वापरून रस्त्याचे काम सुरू आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली. संबंधित बहिरट ब्रदर्स या ठेकेदाराच्या मद्यपी पर्यवेक्षकाने या वेळी तक्रार करणाऱ्या स्थानिक नागरिकांना अरेरावी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ब प्रभागाच्या स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांना घेराव घातला. 

वाल्हेकरवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे गेल्या दहा वर्षांपासून डांबरीकरण झाले नव्हते, अशा रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. रस्ता स्वच्छ करून त्यावर डांबर ओतून खडीकरण करणे आवश्यक असते. मात्र शिवतीर्थ कॉलनीत रस्ता स्वच्छ न करताच कमी प्रमाणात डांबराचा वापर करून डांबरीकरण केले जात असल्याची तक्रार काही स्थानिक नागरिकांनी केली. त्यामुळे उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी या कामाची पाहणी केली. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत त्यांनी काम बंद करण्याच्या सूचना केल्या. काम बंद झाल्याने संबंधित ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी  शिवतीर्थ कॉलनीतील रस्त्याच्या कामाची पाहणी केली. रस्त्याचे काम नव्याने करण्यात यावे, अशा सूचना कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांनी संबंधित ठेकेदारास केल्या.

ठेकेदाराच्या पर्यवेक्षकाकडून उडवाउडवीची उत्तरे 
ठेकेदाराने महापालिकेचे नियम धाब्यावर बसवून काम सुरू केले आहे. या कामासाठीचे डांबर हलक्या दर्जाचे आहे. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी निकृष्ट कामे करून केली जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. संबंधित अधिकारीही या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. या रस्त्याचे काम निकृष्ट होत आहे. याबाबत ठेकेदाराच्या पर्यवेक्षकाला विचारले असता, मद्याच्या नशेतील पर्यवेक्षकाने, काय करायचं ते करा,’ असे सांगून बेजबाबदारपणे उडवाउडवीची उत्तरे स्थानिकांना दिली.

वाल्हेकरवाडी परिसरात विविध ठिकाणी अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. भोंडवे वस्तीतील शिवतीर्थ कॉलनीत डांबरीकरणाचे काम सुरू होते. ते नियमानुसार न करता केवळ करायचे म्हणून ठेकेदाराने केले. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मला बोलावून घेतले. कामाची पाहणी केली असता कोणत्याही प्रकारच्या नियमाचे पालन न करता निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण केलेले निदर्शनास आले. याबाबत संबंधित ठेकेदार आणि अभियंता यांना रस्ता पुन्हा करण्याचे सांगण्यात आले आहे.
- सचिन चिंचवडे, उपमहापौर

सदर कामाची मी पाहणी केली असता, एका ठिकाणी मारण्यात आलेला पॅच निकृष्ट आढळून आला. संबंधित ठेकेदाराला तो पॅच जेसीबीच्या साह्याने काढून तेथे योग्य पद्धतीने काम करण्याचे आदेश दिले आहेत.
- उमेश मोने, कनिष्ठ अभियंता, ब प्रभाग 

Web Title: Citizen gherao municipal engineer due to contractor's Alcohol Supervisor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.