‘द्रुतगती’वरील दरडी हटविण्याची मोहीम; खंडाळा एक्झिट ते बोगद्यादरम्यानच्या कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 06:15 AM2017-12-16T06:15:52+5:302017-12-16T06:16:31+5:30

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील दरडप्रवण क्षेत्र असलेल्या खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्याजवळील एक किलोमीटर अंतरामध्ये डोंगरावरील धोकादायक व सैल झालेले दगड व माती हटवून त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचा मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे.

A campaign to eradicate the 'rapid acceleration'; Beginning work between Khandala exit and tunnel | ‘द्रुतगती’वरील दरडी हटविण्याची मोहीम; खंडाळा एक्झिट ते बोगद्यादरम्यानच्या कामास सुरुवात

‘द्रुतगती’वरील दरडी हटविण्याची मोहीम; खंडाळा एक्झिट ते बोगद्यादरम्यानच्या कामास सुरुवात

googlenewsNext

लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील दरडप्रवण क्षेत्र असलेल्या खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्याजवळील एक किलोमीटर अंतरामध्ये डोंगरावरील धोकादायक व सैल झालेले दगड व माती हटवून त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचा मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे.
या कामाकरिता खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्यापर्यंत मुंबईकडे जाणारी एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. एक्सप्रेस वेवरील दरडप्रवण क्षेत्रातील खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगदा, अमृतांजन पूल, आडोशी बोगदा, भातन बोगदा येथील एकूण दोन किलोमीटर अंतरावरील धोकादायक सैल दरडी हटविणे व संरक्षकजाळ्या बसविण्यात येणार आहेत. या मोहिमेचा कालावधी दीड वर्षाचा आहे. या कामासाठी अंदाजे ६५ कोटी खर्च अपेक्षित असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले.
एक्सप्रेस वेवरील घाटमाथा परिसरातील दरडप्रवण क्षेत्रातील धोकादायक सैल दरडी हटविणे व संरक्षक जाळ्या बसविण्याच्या मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे. या मोहिमेत खंडाळा एक्झिट ते भातन बोगद्यापर्यंत चार ठिकाणी मोहीम राबविण्यात येणार आहे. खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगदा (किलोमीटर क्रमांक ४७.९१० ते ४६.९१०) एक किलोमीटर अंतर, अमृतांजन पूल परिसरातील १९० मीटर अंतर, आडोशी बोगद्याजवळील २१५ मीटर अंतर, तसेच भातन बोगदा परिसरातील १५९ मीटर असे १५६५ मीटर अंतरावर नव्याने व मागील मोहिमेतील अपूर्ण राहिलेल्या ४६५ मीटर असे २०३० मीटर अंतरावरील सैल झालेल्या दरडी हटवून त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ६५ कोटी रुपये खर्च होणार असून, हे काम पायोनिअर फाउंडेशन इंजिनिअर प्रा. लिमिटेड या कंपनीला दिले आहे. यापूर्वी या कंपनीने माळशेज घाटातील दरडी हटविण्याचे काम केले आहे.

आठ किमीवर आठ ठिकाणे धोक्याची
दोन वर्षांपूर्वी २२ जून व १९ जुलै २०१५ रोजी एक्सप्रेस वे वरील खंडाळा (बोरघाट) घाटातील खंडाळा व आडोशी बोगद्याच्या तोंडाजवळ मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. या नैसर्गिक दुर्घटनेत आडोशी बोगदा येथे तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. पाच प्रवासी गंभीर जखमी झाले होते. आडोशी बोगद्याच्या दरडीच्या अगोदर २२ जूनला खंडाळा बोगद्याजवळही मोठी दरड कोसळली होती. या घटनेत दोन वाहनांचे नुकसान वगळता जीवितहानी झाली नव्हती. दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. या दोन्ही घटनांसह अवघ्या दीड महिन्यात घाटातील खंडाळा एक्झिट ते आडोशी बोगद्यापर्यंतच्या आठ किलोमीटर अंतरावर पाचवेळा दरडीच्या घटना घडल्या होत्या. यामुळे घाटमाथा परिसरात एक्सप्रेस वेवरून प्रवास करणे धोकादायक बनले होते.
खंडाळा घाटातील आठ किलोमीटर अंतरावरील दरडप्रवण क्षेत्रात कोणत्याही क्षणी दरड कोसळेल अशी भीती प्रवाशांमध्ये पसरल्याने या मार्गावरून प्रवास करणे असुरक्षित बनले होते. सातत्याने कोसळणाºया दरडीमुळे एक्सप्रेस वेवरील वाहतूक अनेक दिवस विस्कळीत झाली होती. घाटमाथा परिसरातील डोंगर पठारावरील अत्यंत धोकादायक दरडीच्या ठिकाणांची भूवैज्ञानिक तज्ज्ञाच्या मार्फत पाहणी केली होती. त्यांच्या पाहणी अहवालानुसार खंडाळा एक्झिट ते आडोशी बोगद्यापर्यंतच्या आठ किलोमीटर अंतरावरील एकूण आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली होती.
या आठ ठिकाणी सैल झालेल्या दरडी व त्या ठिकाणी पुन्हा दरडी कोसळू नये यासाठी डोंगर पठारावर संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला गतवर्षी २७ जुलैला सुरुवात करण्यात आली होती. या कामाला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागला आहे. त्या कामासाठी सुमारे ५२ कोटी खर्च करण्यात आला आहे. हे काम मेकाफेरी कंपनीने स्पॅनिश व इटलीच्या तज्ज्ञ कामगारांच्या मदतीने पूर्ण केले आहे. मात्र, तज्ज्ञांनी निश्चित केलेल्या ठिकाणाशिवाय इतर ठिकाणी दरडीचा धोका निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत उपाययोजना राबविण्यासंदर्भात संबंधितांनी सूचित केले होते.

कामादरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावे
एक्सप्रेस वेवरील दरडप्रवण क्षेत्रात धोकादायक दरडी हटविणे व संरक्षक जाळ्या बसविण्याच्या कामाला रस्तेविकास महामंडळाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. कामादरम्यान सुरक्षेसाठी कामाच्या ठिकाणची एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. जसजसे काम होईल, तशी बंद करण्यात आलेली लेन पुन्हा वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल. कामाच्या वेळी होणाºया गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी यांनी केले आहे.

Web Title: A campaign to eradicate the 'rapid acceleration'; Beginning work between Khandala exit and tunnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.