भरधाव वाहनांमुळे अपघातांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 03:05 AM2018-10-29T03:05:24+5:302018-10-29T03:05:44+5:30

पिंपळे गुरवच्या कल्पतरू चौकात ग्रेड सेपरेटर, वाहतूक पोलिसांच्या नियुक्तीची मागणी

Accidental Increase in Accidental Deaths by Vehicles | भरधाव वाहनांमुळे अपघातांत वाढ

भरधाव वाहनांमुळे अपघातांत वाढ

Next

पिंपळे गुरव : नाशिक फाटा ते वाकडदरम्यान नागरिकांसाठी जलद वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला बीआरटीएस मार्ग वाहनांच्या अतिवेगामुळे पादचाऱ्यांच्या मुळावर उठला आहे. पिंपळे गुरवमधील जवळकरनगर ते काशिद पार्कदरम्यान असलेल्या जवळकरनगर, कल्पतरू चौकात रस्ता ओलांडताना अनेकदा अपघात घडत आहेत. परिणामी नागरिकांना कायमचे अपंगत्व, तसेच जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जवळकरनगर, कल्पतरू चौकात ग्रेड सेपरेटर तयार करण्यात यावा, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील हा महत्त्वाचा बीआरटीएस रस्ता पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर येथून जातो. या परिसरात नागरिकांच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जवळकरनगरकडून काशिद पार्ककडे जाताना जवळकरनगर, कल्पतरू चौकातून शाळकरी मुले, महिला, वृद्ध तसेच चारचाकी, दुचाकीस्वारांना हा बीआरटीएस रस्ता ओलांडून जावे लागते. या ठिकाणी सिग्नल आहे. मात्र, अनेक वाहनचालक सिग्नलकडे लक्ष देत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे अनेकदा अपघात घडत आहेत. गेल्या आठवड्यात सुदर्शनगर चौक ते जवळकरनगर, कल्पतरू चौकादरम्यान राहुल जाधव हे तीन लहान मुलांसह दुचाकीवरून चौक पार करीत होते. दरम्यान, पिंपळे सौदागरकडून भरधाव वेगात येणाºया मर्सिडिज बेंझ गाडीने त्यांच्या दुचाकीला मागील बाजूने धडक दिल्याने राहुल जाधव यांना जीव गमवावा लागला. तर तसेच तीन लहान मुले या अपघातात गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षभरात अनेकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे. पुढच्या वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागील वाहने एकावर एक आदळल्याचीही उदाहरणे आहेत. अनेक वाहनचालक सिग्नल असूनही बेदरकारपणे वाहने दामटताना दिसतात.
कल्पतरू चौकात अनेक अपघात घडत असूनही महापालिका प्रशासन गंभीर नसलेले दिसते. या चौकातील सिग्नल अनेकदा बंद अवस्थेतच असतात. तर वाहतूक पोलिसांचा पत्ताच नसतो. आणि ज्यांची नेमणूक केलेली आहे, असे वाहतूक पोलीस बाजूला पावत्या फाडत उभे असल्याचे चित्र असते. त्यामुळे वाहतूक पोलीस असून नसल्यासारखे आहेत.

वाढती लोकसंख्या आणि वाढती रहदारी लक्षात घेता जवळकरनगर, कल्पतरु चौकात ग्रेड सेपरेटरची अत्यंत आवश्यकता आहे. शाळकरी मुलांना तर जीव मुठीत धरूनच रस्ता ओलांडावा लागत आहे अन्यथा भविष्यात नागरिकांना रस्ता ओलांडणे शक्य होणार नाही.
वाहनांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे पादचाºयांचीही वर्दळ वाढली आहे. त्यामुळे जवळकरनगरमधील कल्पतरू चौकात उपाययोजना करणे आवश्यक आहे. वाहने भरधाव असल्याने बहुतांश अपघात होत आहेत. त्यामुळे या चौकात ग्रेड सेपरेटर उभारण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेविका वैशाली जवळकर यांनी केली आहे.

कल्पतरू चौकातील अपघात रोखण्यासाठी ग्रेड सेपरेटर उभारणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाकडे त्याबाबत मागणी करण्यात येणार आहे. वाहतूक नियमनासाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याचीही मागणी सांगवी वाहतूक विभागाकडे करणार आहे. वाहनचालकांनीही आपल्या वाहनांवर वेग नियंत्रण ठेवावे.
- सागर अंगोळकर, नगरसेवक

चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे पोलीस कर्मचारी मागणी केली आहे. सकाळी व सायंकाळी चौकामध्ये वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल. वाहनचालकांनी आपल्या जिवाची काळजी घेऊन वाहने चालवावीत.
- चंदा लोखंडे, नगरसेविका

पिंपळे सौदागर व नाशिक फाट्याकडून वाहने वेगात येतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. चौकात पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. लवकरच त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
- उषा मुंडे, नगरसेविका

जवळकरनगर आणि काशिद वस्तीदरम्यान बीआरटीएस मार्गावर मोठी वर्दळ असते. वाहनचालकांनीही वेगावर नियंत्रण ठेवत वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. सिग्नलवर न थांबता भरधाव निघून जातात. अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात.
- शशिकांत कदम, नगरसेवक

Web Title: Accidental Increase in Accidental Deaths by Vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.