'हा' किल्ला मानला जातो भारतातील सर्वात प्राचीन किल्ला, जाणून घ्या काय आहे याची खासियत?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 03:09 PM2022-12-15T15:09:27+5:302022-12-15T15:16:58+5:30

Oldest fort India : या आलिशान आणि भव्य किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे 'किल्ला मुबारक' आहे.

भारत देश तसा तर आपल्या संस्कृतीसाठी आणि इतिहासासाठी ओळखला जातो. देशात कितीतरी प्राचीन स्मारकं आहेत. आजही भारताच्या वेगवेगळ्या भागात ऐतिहासिक किल्ले मजबूत स्थितीत उभे आहेत. या आलिशान आणि भव्य किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे 'किल्ला मुबारक' आहे.

पंजाबच्या भठिंडा शहरात असलेला हा किल्ला भारतातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक मानला जातो. ६व्या शतकात तयार करण्यात आलेल्या या किल्ल्यात कुषाण काळातील विटांचा वापर करण्यात आला आहे. त्यावेळी सम्राट कनिष्क यांचं भारत आणि मध्य आशियातील अनेक भागांवर राज्य होतं.

या ऐतिहासिक किल्ल्याचं निर्माण सम्राट कनिष्क आणि राजा दाब यांनी केलं होतं. इतकेच नाही तर याचा उल्लेख ऋग्वेद आणि महाभारतातही आढळतो.

या किल्ल्याबाबत सांगितले जाते की, १२०५ ते १२४० दरम्यान रझिया सुल्तानाला पराभूत केल्यावर याच किल्ल्यात बंदी बनवून ठेवलं होतं. रझिया सुल्तानाने या किल्ल्याच्या बाल्कनीतून खाली उडी मारली होती. जेणेकरून ती तिच्या सैनिकांना एकत्र आणू शकेल आणि शत्रूंसोबत पुन्हा लढू शकेल.

१७०५ मध्ये १०वे शिख गुरू श्री गुरू गोविंद सिंह यांनी या किल्ल्याचा दौरा केला होता. या दौऱ्याच्या स्मरण करण्यासाठी १८३५ मध्ये महाराजा करम सिंह यांनी या किल्ल्याच्या एक गुरूद्वारा बनवला होता. त्याला आज सगळे गुरूद्वारा श्री किला मुबारक साहिब नावाने ओळखतात.

या किल्ल्याचा वापर पटियाला राजवंशातील शासकांनी निवासासाठीही केला होता. १७व्या शतकाच्या मध्यात या किल्ल्यावर महाराजा अला सिंह यांनी कब्जा मिळवला होता आणि त्यांनी या किल्ल्याचं नाव फोर्ट गोबिंदगढ असं ठेवलं होतं.

ऐतिहासिक किल्ला मुबारकचा आकार एका नावेप्रमाणे आहे. हा किल्ला वाळूत असलेल्या एका जहाजाप्रमाणे दिसतो. या किल्ल्याचं प्रवेश द्वार फारच आकर्षक आहे. किल्ल्याच्या आतील भागाला 'किला एंडरून' असं म्हटलं जातं. या किल्ल्यात मोती पॅलेस, राजमाता पॅलेस, शीश महाल आणि पॅलेस ऑफ मून नावाचे वेगवेगळे निवासी स्थान आहेत.

असे म्हणतात की, ११८९ मध्ये या किल्ल्यावर मोहम्मद घोरीने कब्जा केला होता.

१२४० मध्ये या किल्ल्यावर रझिया सुल्तानाला कैद करण्यात आलं होतं.

१५१५ मध्ये गुरू नानक देव यांनी या किल्ल्यावर दौरा केला होता.

१६६५ मध्ये गुरू तेग बहादुर सिंह यांनी या किल्ल्याचा दौरा केला होता.

तर शेवटी १७०५ मध्ये गुरू गोबिंद सिंह यांनी या किल्ल्याचा दौरा केला होता.