आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणात झाला बाळाचा जन्म; जाणून घ्या कुठल्या देशाचं मिळणार नागरिकत्व?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 12:31 PM2021-10-07T12:31:27+5:302021-10-07T12:37:22+5:30

Baby born mid-air on Air India's London-Cochin flight: मंगळवारी एअर इंडियाच्या विमानात महिलेने बाळाला जन्म दिला. त्यानंतर सोशल मीडियात या मुलाला कुठल्या देशाचं नागरिकत्व मिळणार अशी चर्चा सुरू झाली.

गर्भवती महिलेने रेल्वेत बाळाला जन्म दिला, रस्त्यावरुन जाताना गाडीत बाळ जन्मलं अशा बातम्या अनेकदा तुम्ही ऐकल्या असतील. पण विमानात बाळाचा जन्म झाल्याची घटना दुर्मिळच म्हणावी लागेल. लंडन ते कोच्ची येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात मंगळवारी एका महिलेने चिमुकल्याला जन्म दिला.

त्यामुळे आता लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की, विमानात जन्मलेल्या मुलाला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळतं. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल ना. सुरुवातीला भारतात ७ महिने अथवा त्याहून अधिक गर्भवती असलेल्या महिलेला विमान प्रवास करण्याची परवानगी नाही हे स्पष्ट आहे.

परंतु काही विशेष प्रकरणात प्रवासाची परवानगी दिली जाते. मग अशावेळी भारत ते अमेरिका उड्डाण घेणाऱ्या विमानात महिलेने चिमुकल्याला जन्म दिला तर त्या मुलाच्या जन्म प्रमाणपत्रावर जन्मस्थान काय असेल आणि त्याचे नागरिकत्व काय असेल? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

एखादं बाळ विमानात जन्मलं तर त्याचं नागरिकत्व कुठलं असेल? अशा घटनेत बाळ जन्मतेवेळी कुठल्या देशाच्या सीमेवर विमान उड्डाण घेत आहे ते पाहिलं जातं. लँडिंगनंतर बाळाचं जन्म प्रमाणपत्र संबंधित कागदपत्रं त्या देशाच्या एअरपोर्ट अथॉरिटीकडून प्राप्त करण्यात येते.

परंतु बाळाला त्याच्या आई-वडिलांचं राष्ट्रीयत्व प्राप्त करण्याचा अधिकार आहे. भारतात दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नाही उदाहरण घ्यायचं झालं तर समजा, जर पाकिस्तानातून अमेरिकेला जाणारं विमान भारतीय सीमेच्या हद्दीवरुन जात आहे. त्याचवेळी विमानात महिलेने बाळाला जन्म दिला तर मुलाचं जन्मस्थान भारत मानलं जाईल.

त्या मुलाला भारताचं नागरिकत्व मिळू शकतं. आई-वडिलांचा देश आणि त्याचसोबत भारताचं नागरिकत्व. परंतु भारतात दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नाही.काही वर्षापूर्वी अमेरिकेत असेच एक प्रकरण आलं होतं. एक विमान एम्सटर्डम ते अमेरिकेसाठी जायला निघालं होतं. जेव्हा विमान अटलांटिक महासागरावरुन जात होतं तेव्हा महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या.

त्यावेळी तिने बाळाला जन्म दिला. त्यानंतर आई आणि बाळाला अमेरिकेतील मॅसाचुसेट्स जनरल हॉस्पिटलला नेण्यात आलं. मुलीचा जन्म यूएस बोर्डरवर झाला होता. त्यासाठी तिला यूएस आणि नेदरलँड दोन्ही देशाचं नागरिकत्व मिळालं. विमानात जन्मलेल्या मुलांच्या नागरिकत्वाबाबत प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम असतात.

टॅग्स :विमानairplane