विरोधकांची एकी तरी...! शरद पवार राष्ट्रपती निवडणुकीसाठी का नको म्हणतायत? राजकारणच कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:19 PM2022-06-16T12:19:16+5:302022-06-16T12:29:25+5:30

Sharad Pawar presidential election: शरद पवार यांनी विरोधी पक्षाचा उमेदवार होण्यास नकार दिल्यानंतर विरोधकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा स्थितीत शरद पवार यांच्या नावावर विरोधकांचे एकमत असेल तर ते स्वतःच माघार का घेत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार म्हणून शरद पवारांचे नाव पुढे आले आणि विरोधकांमध्ये एकी पहायला मिळाली. ममतांनी तर पवारांनी होय म्हटले तर ठीक, नाही तर सर्वानुमते उमेदवार देण्याची घोषणा केली. राष्ट्रपती पद म्हणजे पक्ष, हितसंबंध, महत्वाकांक्षा सारे काही सोडून द्यावे लागते. पवार राष्ट्रपती पदासाठी उभे राहिले आणि जिंकले तर राष्ट्रवादीला ते परवडणारे नाही. हे जरी खरे असले तरी आणखी काही कारणे आहेत, ज्यामुळे पवार राष्ट्रपती पदासाठी उभे राहण्यास तयार नाहीत.

शरद पवार यांनी विरोधी पक्षाचा उमेदवार होण्यास नकार दिल्यानंतर विरोधकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा स्थितीत शरद पवार यांच्या नावावर विरोधकांचे एकमत असेल तर ते स्वतःच माघार का घेत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवार इच्छुक नसल्याची ही कारणे असल्याची चर्चा आहे.

भाजपा प्रणित एनडीए आपल्या ताकदीवर राष्ट्रपती निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत नाहीय. मात्र, त्यांना जिंकण्य़ासाठी हवी असलेली मते आणि त्यांच्याकडे असलेली मते यांच्यात फारसे अंतरही नाहीय. राष्ट्रपती निवडणुकीत एकूण मतदान 10,86,431 आहे. जिंकण्यासाठी 5,43,216 मते हवी आहेत.

अशावेळी एनडीएकडे एकूण 5.26 लाख मते आहेत. तर विरोधक आणि अपक्षांकडे मिळून 5.60 लाख मते आहेत. यामुळे विरोधकांपासून अपक्ष वेगळे केले तर भाजपा आणि विरोधकांकडे असलेल्या मतांमध्ये अधिक अंतर नाहीय.

भाजपाला होत असलेली दुसरा फायदा म्हणजे सर्वच विरोधक एकत्र आलेले नाहीत. त्या बदल्यात एनडीए मजबूत स्थितीत आहे. यामुळे आजपर्यंत एकही निवडणूक न हारलेले शरद पवार कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीत. विरोधक कसे जिंकू शकतात याचा आकडा सांगा, असे स्वत: पवार म्हणाले होते.

पवारांच्या ना मागे आणखी एक कारण म्हणजे सर्वच विरोधक एकत्र आलेले नाहीत. ममता बॅनर्जींनी बोलविलेल्या बैठकीला पाच विरोधी पक्ष आले नव्हते. यामध्ये टीआरएस, आप, बीजेडी, वायएसआर काँग्रेस आणि अकाली दल आहे. आपने उमेदवार कोण असले यावरून आम्ही ठरवू अशी भूमिका घेतली आहे. तर बीजेडी आणि वायएसआर काँग्रेस काहीच मागमूस लागू देत नाहीएत. या दोन पक्षांशिवाय राष्ट्रपती निवडणूक जिंकणे विरोधकांसाठी अशक्यप्राय आहे.

बीजेडी आणि वायएसआर अनेकदा भाजपासोबत गेले आहेत. २०१७ मध्येही त्यांनी एनडीएला साथ दिली होती. याहून महत्वाचे म्हणजे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी नुकतीच पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. यामुळे शरद पवार या दोन्ही पक्षांवरून साशंक आहेत.

शरद पवार यांनी राजकीय महत्वाकांक्षा मोठी आहे. स्वत:चा पक्ष आहे. राष्ट्रपती झाल्यास सक्रीय राजकारणापासून दूर जावे लागेल. ही रिस्क राष्ट्रवादीला परवडणारी नाही. यामुळे ज्या ज्या वेळी राष्ट्रपती पदासाठी पवारांचे नाव आले तेव्हा तेव्हा त्यांनी यास नकार दिला आहे. पवारांनीच काही वर्षांपूर्वी मला राजकारणातून एवढे लवकर निवृत्त व्हायचे नाहीय, असे म्हटले होते.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला आहे. परंतू, असे असले तरी त्यांचा उत्तराधिकारी कोण, यावर अद्याप प्रकाश पडलेला नाही. पुतणे अजित पवार, मुलगी सुप्रिया सुळे यांनाच हा पक्ष सांभाळावा लागणार आहे. राष्ट्रवादीतही गट तट आहेत. यामुळे पवारांनी राजकारणातून लक्ष काढून घेतले तर पक्षामध्ये फूट पडण्याची भीती राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

२०१९ मध्ये महाराष्ट्रात मविआचे सरकार स्थापन झाले. त्यापूर्वी अजित पवारांनी भाजपासोबत जात पहाटेच सरकार स्थापन केले होते. याचे राजकारण सर्वांनीच पाहिले आहे. शरद पवारांनीच पक्षाची शकले वाचविली होती. आता अजित पवार पुन्हा चुकणार नाही असे म्हणत असले तरी २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. यासाठी दोन ते आडीज वर्षेच राहिली आहेत.

मोदींना शह देण्यासाठी विरोधकांची ताकद निर्माण करण्याचे काम पवारच करू शकतात. कारण त्यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध आहेत. इतर पक्षांच्या नेत्यांमध्ये मतभेदच एवढे आहेत की ते एकमेकांना मोठे होऊ न देण्यासाठी झगडत असतात. अशावेळी पवारांचीच गरज लागणार आहे. यामुळे देखील पवार राष्ट्रपती पदासाठी इच्छुक नाहीत.