Unique Wedding In Bihar: अनोखं लग्न! वरमाला मोठ्या बहिणीच्या गळ्यात अन् फेरे घेतले छोट्या बहिणीसोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 02:18 PM2023-05-04T14:18:28+5:302023-05-04T14:27:34+5:30

या लग्नाची चर्चा संपूर्ण परिसरात होत आहे. संबंधित वर जेव्हा लग्नाचे वऱ्हाड घेऊन पोहोचला, तेव्हा नवरीची लहान बहीण लग्नाचा हट्ट धरून बसली अन्...

बिहारमधील छपरा जिल्ह्यात एक अनोखा विवाह बघायला मिळाला आहे. लग्नासाठी आलेल्या वराने मोठ्या बहिणीच्या गळ्यात वरमाला टाकून छोट्या बहिणीसोबत सात फेरे घेतले आहेत.

या लग्नाची चर्चा संपूर्ण परिसरात होत आहे. संबंधित वर जेव्हा लग्नाचे वऱ्हाड घेऊन पोहोचला, तेव्हा नवरीची लहान बहीण लग्नाचा हट्ट धरून बसली. यानंतर, घरच्यांनी तिला बराच समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ती छतावरून उडी मारण्याची धमकी देऊ लागली.

मोठ्या बहिणीच्या गळात टाकली वरमाला - छपरा येथील मुबारकपूर येथे नवरदेव ठरलेल्या वेळी सायंकाळी वऱ्हाड घेऊन पोहोचला. वऱ्हाडींचा चहा-नाश्ता झाल्यानंतर, शेकडो लोकांच्या उपस्थितीत मोठ्या बहिणीसोबतची वरमाला घालण्याचा कार्यक्रम पार पडला.

वरमाला कार्यक्रमानंतर सुरू केला गोंधळ - वरमाला कार्यक्रम पार पडल्यानंतर, वऱ्हाडींचे भोजन सुरू झाले आणि वधू पक्षाकडील लोकांनी लग्नाची पुढील प्रक्रिया सुरू केली. याच दरम्यान नवरीच्या छोट्या बहिणीने लग्नाचा हट्ट धरून गोंधळ सुरू केला.

घरच्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला तर, छतावरून उडी मारण्याची धमकी - हा संपूर्ण गोंधळ पाहून घरच्यांनी संबंधित छोट्या बहिणीला समजावण्याचा बराच प्रयत्न केला. हे तुझ्या मोठ्या बहिणीचे लग्न आहे. त्यामुळे उगाचच गोंधळ घालू नकोस. लवकरच तुझेही लग्न करून दिले जाईल, असे घरच्यांनी तिला सांगितले. पण तिची काहीही ऐकण्याची तयारी नव्हती. ती थेट छतावर गेली आणि लग्न न लाऊन न दिल्यास आपण उडी मारून जीव देऊ, अशी धमकी देऊ लागली.

बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्नाचा हट्टा - यावेळी नवरीच्या छोट्या बहिणीने होणाऱ्या बहिणीच्या नवऱ्याला फोन करून जर आपल्यासोबत लग्न केले नाही, तर आपण जीव देऊ अशी धमकी दिली. यानंतर नवरदेवाने आपल्या कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार सांगितला. यामुळे दोन्ही बाजूचे लोक टेन्शनमध्ये आले. यावर दोन्ही पक्षाच्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. पण प्रकरण अधिकच चिघळत गेले.

नवरदेव आणि वऱ्हाडी कैद - प्रकरण अधिकच चिघळल्याने नवरदेव आणि वऱ्हाडींना कैद करण्यात आले. त्यांना मारहाणही करण्यात आली. अखेर मांझी पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणला.

यात नवरदेव लहाण बहिणीसोबत लग्न करेल हे निश्चित झाले. अशा प्रकारे नवरदेवाने मोठ्या बहिणीच्या गळ्यात वरमाला घातली, तर छोट्या बहिणीसोबत लग्न केले.