...तर चंद्रयान माघारी फिरणार; वेगावर सारा खेळ, मध्यरात्रीच चंद्राकडे निघाले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 03:27 PM2023-08-01T15:27:16+5:302023-08-01T15:50:01+5:30

चंद्रयान -३ आज मध्यरात्रीच पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राकडे निघाले आहे. यानाची इंजिने सुमारे २० मिनिटे चालू करण्यात आली होती. यासाठी १७९ किलो इंधन जाळण्यात आले.

चंद्रयानाला वेग घेण्यासाठी पृथ्वीला यानाने पाच फेऱ्या मारल्या आहेत. यासाठी देखील जवळपास ५०० ते ६०० किलो इंधन खर्च झाले आहे. अशातच जर काही समस्या आली तर चंद्रयान माघारी फिरण्याची शक्यता आहे.

चंद्रयानामध्ये 1696.39 किलो इंधन भरण्य़ात आले होते. म्हणजेच आता चंद्रयानात १००० ते ११०० किलो इंधन शिल्लक आहे. या इंधनाच्या जोरावर चंद्रयानाला चंद्रापर्यंतचे अंतर कापायचे आहे. पाच ऑगस्टपर्यंत चंद्रयान या मार्गावर राहणार आहे.

पाच ऑगस्टच्या सायंकाळी सात-साडेसात वाजता हे यान चंद्राच्या पहिल्या कक्षेत प्रवेश करणार आहे. यावेळी चंद्राच्या पृष्ठभागापासून ही कक्षा जवळपास ११ हजार किमी असणार आहे. हे यान चंद्राच्या पाचही कक्षांना फेरे घालणार आहे चंद्रापासून १०० किमी एवढ्या अंतरावर येऊन थांबणार आहे.

चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा 6 पट कमी आहे. त्यामुळे चंद्रयान-३ चा वेगही कमी करावा लागणार आहे. अन्यथा चंद्राची कक्षा पकडू शकणार नाही. परंतू, जर असे झाले तर चंद्रयान पुन्हा परतेल व पृथ्वीच्या पाचव्या कक्षेत येईल. याला १० दिवस लागतील.

१०० किमीची कक्षा १७ ऑगस्टला गाठली जाणार आहे. त्याच दिवशी प्रोपल्शन मॉड्युल आणि लँडर मॉड्युल वेगळे होणार आहेत. लँडर मॉड्यूल 18 आणि 20 ऑगस्ट रोजी डिऑर्बिटिंग होईल. म्हणजेच, चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल हळूहळू चंद्राच्या 100x30 किमीच्या कक्षेत जाईल. यानंतर, 23 ऑगस्ट रोजी सुमारे सव्वा सहा वाजता लँडिंग होईल.

इस्रोच्या सूत्रांनी सांगितले की, चांद्रयान-3 सध्या ताशी 38,520 किलोमीटर वेगाने चंद्राच्या दिशेने जात आहे. हा वेग थोडा थोडा कमी केला जाणार आहे. चंद्राच्य़ा पृष्ठभागापासून सुमारे 11 हजार किलोमीटर दूरवर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण शून्य असेल व चंद्रही शून्याच्या जवळ असेल. याला L1 पॉइंट म्हणतात. तिथे जाऊन चंद्रयान स्थिरावणार आहे.