राफेलचं आगमन होताच नेटीझन्स भावूक, मनोहर पर्रीकरांची झाली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 04:37 PM2020-07-29T16:37:59+5:302020-07-29T16:49:41+5:30

भारताच्या सामर्थ्यात मोलाची भर घालणारी, शत्रूंनी धडकी भरवणारी राफेल विमानं (Rafale Fighter Jets In India) हरयाणाच्या अंबालात दाखल झाली आहेत. तब्बल सात हजार किलोमीटरचं अंतर कापून राफेल विमानं भारतात आली आहेत.

चीनच्या सीमेवरील वाढता तणाव पाहता भारतानं फ्रान्सकडे राफेल विमानं लवकर पाठवण्याची मागणी केली. भारताच्या मागणीला फ्रान्सनं कोविड 19 च्या संकटातही सकारात्मक प्रतिसाद दिला.

अखेर आज पाच राफेल विमानं भारतात दाखल झाली आहेत. हवाई दलाच्या अंबाला तळावर राफेल विमानांनी शानदार लँडिंग केलं आहे. त्यानंतर, सोशल मीडियावर राफेल विमानाचीच चर्चा आहे.

राफेलसोबतच सोशल मीडियावर आणखी एका नावाची चर्चा असून माजी संरक्षणमंत्री दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांच्या आठवणीही नेटीझन्सकडून सांगण्यात येत आहेत.

भारत-फ्रान्स दरम्यान ३६ राफेल लढाऊ विमानांसाठी ७.८८ अब्ज युरोचा (सुमारे ५८,८५३ कोटी रुपये) करार झाला. राजधानी दिल्लीत भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि फ्रान्सचे संरक्षणमंत्री ड्रियान यांनी करारावर सह्या केल्या होत्या.

मनोहर पर्रीकरांच्या या करारनाम्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर होत आहेत. भारतीयांकडून राफेल कराराचा हिरो, मनोहर परीकर्रांनाच राफेल समर्पित असे कॅप्शन देण्यात येत आहेत.

ट्विटरवर मनोहर पर्रीकर यांचे फोटो राफेल विमानसोबत शेअर करुन त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.

तब्बल २० वर्षांनंतर भारताने लढाऊ विमानांसाठी एक मोठा आंतरराष्ट्रीय करार केला होता. पंतप्रधान मोदी यांनी युपीए सरकारच्या काळात झालेला राफेल खरेदीचा करार रद्द करुन नवा करार केला आहे.

या करारामुळे सुमारे ५,६०१ कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नव्या करारानुसार भारतीय कंपन्यांना राफेल खरेदी व्यवहारात सुमारे २२,४०६ कोटी रुपयांची विमान निर्मितीची कामं मिळणार आहेत.

राफेलच्या करारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता, त्यामुळे राफेल करार हा भारतात चांगलाच चर्चेचा आणि वादग्रस्त ठरला.

करारानुसार 29 जुलै 2020 रोजी फ्रान्सकडून भारताला 5 राफेल विमानांचा पुरवठा करण्यात आला. तर, पुढील २-३ वर्षात ३६ विमानांची मागणी पूर्ण केली जाईल.

सर्व राफेल विमानांना भारताच्या मागणीनुसार आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज करण्यात आले आहे. विमानांमध्ये हवेतून हवेत १५० किमी. पर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र, तसेच इतर आधुनिक शस्त्रांनी सज्ज करण्यात आलंय.

भारतात राफेलचं आगमन होताच, संरक्षणमंत्र्यांनी व्हिडिओ शेअर करत अत्यानंद व्यक्त केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धाडसी निर्णयाबद्दल आभरही मानले.