Sonali Phogat: 'काहीतरी ठीक नाहीय, अस्वस्थ वाटतंय'; सोनालीने आईला रात्री सांगितलं अन् सकाळी मृत्यू झाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 10:43 AM2022-08-24T10:43:40+5:302022-08-24T10:52:05+5:30

Sonali Phogat: सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

भाजपाच्या हरयाणामधील नेत्या सोनाली फोगाट यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. सोनाली फोगाट यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंग आणि अँकरिंग पासून केली होती. नंतर त्या टिकटॉकवरही प्रसिद्ध झाल्या होत्या. दरम्यान, त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून पक्षात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं बिग बॉस १४ मध्येही त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.

सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी त्यांच्या कुटुंबीयांसह राज्यातील विरोधी पक्षांनी देखील केली आहे. फोगाट यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या आकस्मिक मृत्यूबाबत घातापाताची शंका व्यक्त केली आहे.

सोनालीने आईला दूरध्वनी करुन जेवण घेतल्यानंतर आपल्याला बरे वाटत नसल्याचे सांगितले होते, असे फोगाट यांच्या बहिणीने पत्रकारांना सांगितले. ती म्हणाली की, तिला अस्वस्थ वाटत आहे. काहीतरी ठीक नसल्यासारखं, जणू काही तिच्याविरुद्ध कट रचला जात आहे, असं वाटत असल्याचं तिनं आईल सांगितलं होतं. नंतर सकाळी आम्हाला तिच्या निधनाचीच वार्ता समजली, असं त्या म्हणाल्या.

सदर मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदय भान यांनी केली. आप नेते अनुराग धांडा यांनीही याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. फोगाट यांच्या गावातील नागरिकांनाही मृत्यूबाबत संशय आहे.

सोनाली फोगाट यांनी २०१९ मध्ये हरयाणा विधानसभा निवडणुकीत आदमपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र तिला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. सोनाली फोगाट यांचे सोशल मीडियावर काही फोटो प्रसिद्ध झाले होते. ते फोटो मॉडेलिंगच्या दिवसातील आहेत. सोनाली यांनी २००६ मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात हिसार दूरदर्शनमध्ये अँकर म्हणून केली होती.

फोगाट आणि वाद हे ठरलेले समीकरण होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एका निवडणूक रॅलीदरम्यान एक गट 'भारत माता की जय'च्या घोषणा देत नव्हता. तेव्हा फोगाट यांनी त्यांना तुम्ही पाकिस्तानचे नागरिक आहात का, असा सवाल केला होता. त्यावरुन वाद झाला होता. बाजार समितीच्या एका अधिकाऱ्याने फोगाट यांच्याविरुद्ध अवमानकारक विधाने केली होती. फोगाट यांनी त्याला चपलेने मारहाण केली होती.