Omicron Variant : ओमायक्रॉनच्या संकटात बूस्टर डोसची गरज आहे का, तो कधी द्यावा?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 12:23 PM2021-12-13T12:23:01+5:302021-12-13T12:54:58+5:30

Omicron Variant Vaccine Booster Dose : ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटने शिरकाव केल्याने भारतात लसीचा बूस्टर डोस देण्यासंबंधी जोरदार चर्चा होत आहे.

देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत आता वाढ होत आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटने शिरकाव केल्याने भारतात लसीचा बूस्टर डोस देण्यासंबंधी जोरदार चर्चा होत आहे.

बूस्टर डोसची गरज आहे का, तो कधी द्यावा आणि सरकारची काय भूमिका आहे, हे प्रश्न उपस्थित होत आहेत. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे की, तांत्रिक- वैज्ञानिक अध्ययन आणि शिफारशींच्या आधारांवर बूस्टर डोसचा निर्णय होईल.

डॉ. पॉल यांनी सांगितले की, आतापर्यंत देशातील काही भागात एस जीन ड्रॉप रुग्णांत ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे प्राथमिक संकेत दिसतात. एस जीन प्रोटीनच्या पृष्ठभागाला संकेतन करण्यासंबंधी आहे. हा या संसर्ग प्रवेशाचे ठिकाण आहे.

"आढळलेले ओमायक्रॉनचे रुग्ण अधिक गंभीर नाहीत; परंतु, आम्ही माहिती जमा करीत आहोत. आम्ही जनुकीय क्रमवारी करूनच ओमायक्रॉनची खात्री करीत आहोत" असं डॉ. पॉल यांनी म्हटलं आहे.

"बूस्टर डोसची गरज आहे का? नवीन विषाणूचा काय परिणाम आहे, याबाबत अध्ययन केले जात आहे. शास्त्रज्ञांची भूमिका पारखली जात आहे. वैज्ञानिक आणि तांत्रिक पातळीवरही विचारविनिमय केला आहे. सर्व पैलूंवर लक्ष दिले जात आहे."

"बूस्टर डोसबाबत वैज्ञानिक तथ्य आणि शिफारशींच्या आधारावर निर्णय घेतला जाईल. जागतिक आरोग्य संघटनेनेही पहिल्यांदा प्राथमिक लसीकरण कार्यक्रम पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याची सूचना केली आहे."

"ओमायक्रॉनबाबत अनेक मार्गाने मिळालेल्या माहितीवर अध्ययन केले जात आहे. एनटीएजीआयच्या बैठकीतही यावर विचार केला जातो. मुलांच्या लसीकरणाबाबत अद्याप कोणतीही शिफारस नाही."

"एनटीएजीआय याबाबत लसीच्या अन्य पैलूंचा विचार करीत आहे. आजही मास्क आणि लस महत्त्वाची आहे. मास्ककडे दुर्लक्ष करू नये" असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

ओमायक्रॉनच्या आल्यानंतर तिसऱ्या लाटेची भीती आणखी वाढत चालली आहे. ओमायक्रॉन विषाणू अत्यंत संक्रमक समजला जातो व तो सध्या 59 देशांत पसरला आहे. ओमायक्रॉनने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) दक्षिण पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल यांनी नवीन प्रकारच्या व्हेरिएंटचा अर्थ असा नाही की परिस्थिती आणखी वाईट होईल, परंतु, निश्चितच ती अधिक अनिश्चित होईल असं म्हटलं आहे.

डॉ. खेत्रपाल एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, महामारीचा धोका अजूनही कायम आहे. नवीन व्हेरिएंट येणे आणि जगाच्या इतर भागांमध्ये वाढत्या रुग्णांमुळे जागतिक स्तरावर कोविड-१९ चा धोका कायम आहे.

दक्षिण आशिया क्षेत्रामध्ये, आपण शस्त्रे ठेवू नयेत. आपण सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाययोजना मजबूत करणे आणि लसीकरणाची व्याप्ती वाढवणे सुरू ठेवले पाहिजे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनची 33 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 5 राज्यांना त्याचा फटका बसला आहे.

डॉ खेत्रपाल य़ांनी ओमायक्रॉनचा जगात झालेला प्रसार आणि मोठ्या प्रमाणात म्युटेशनसह काही वैशिष्ट्यांचा महामारी प्रणालीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. त्याचा नेमका काय परिणाम होईल हे जाणून घेणे थोडे कठीण आहे असं म्हटलं आहे.

मास्कचा वापर टाळणे आणि लसीकरणास होणारा विलंब याकडे सरकारने लक्ष वेधले आहे. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी जगातील देश नवीन निर्बंध आणत आहेत. खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

Read in English