Omicron: ‘ओमायक्रॉन’चा शोध घेणाऱ्या TATA च्या Omisure पहिल्या किटला मंजुरी; ICMR चा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 10:47 AM2022-01-04T10:47:54+5:302022-01-04T10:53:38+5:30

Coronavirus New Variant: दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या तिसरी लाट धडकण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा नवा ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याने अनेक देशांची चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील २४ तासांत भारतात ३३ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाच्या ओमायक्रॉन संकट काळात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(ICMR) ने मोठा निर्णय घेतला आहे. ओमायक्रॉनचा शोध घेणाऱ्या पहिल्या किटला आयसीएमआरनं मंजुरी दिली आहे. टाटा मेडिकलने ही किट बनवली असून त्याला Omisure असं नाव देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मेडिकल मुंबई(Tata Medical & Diagnostics) च्या किटला ३० डिसेंबरला मंजुरी मिळाली होती त्याची माहिती आता समोर आली आहे. सध्या देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या परदेशी किटचा वापर केला जातो.

ती मल्टिप्लेक्स किट अमेरिकेच्या Thermo Fisher द्वारे मार्केटिंग केली जाते. ही किट एस जीन टार्गेट फेलियर स्ट्रॅटर्जीने ओमायक्रॉनचा शोध घेते. आता टाटाच्या ज्या किटला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचे नाव TATA MD Check RTPCR Omisure असं आहे.

कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेतून आता इतर देशांमध्ये पसरला आहे. भारतातही या व्हेरिएंटचे १ हजाराहून जास्त रुग्ण आढळले आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिएंट घातक नसला तरी तो वेगाने पसरत असल्याने चिंता वाढली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १ हजार ८९२ इतकी झाली आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ५६८ तर दिल्ली ३८२ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनचे १,८९२ रुग्णांपैकी ७६६ रुग्ण रिकवर झाले आहेत.

ओमायक्रॉनमुळे देशात कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ सुरु आहे. मागील २४ तासांत भारतात कोरोनाचे ३७ हजार ३७९ रुग्ण आढळले. तर ११ हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर १२४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात ३ जानेवारीपासून १५ वर्षावरील मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे.

ओमायक्रॉनचा संसर्ग लक्षात घेऊन भारतात १५ ते १८ वर्षे वयाच्या मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ४० लाखांहून अधिक मुलांना लस देण्यात आली. राज्यात १ लाख ८० हजार मुलांना लस देण्यात आली.

जर दिल्लीत कोरोना संक्रमण दर ५ टक्क्याहून जास्त झाल्यास GRAP रेड अलर्ट लागू होईल असं स्पष्ट करण्यात आले आहे. जर संक्रमण दर ५ टक्क्यांहून अधिक गेले किंवा दिवसाला १६ हजार रुग्ण आढळले किंवा हॉस्पिटलमध्ये ३ हजार बेड भरले तर त्या स्थितीत रेड अलर्ट लागू होऊ शकतो

भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असून येत्या काही दिवसांत रुग्णवाढीचा दर वेगाने वाढणार आहे, असा इशारा केंब्रिज विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाची अल्प काळातील लाट येऊन अधिकाधिक नागरिकांना ओमायक्रॉनची लागण होण्याची भीतीही व्यक्त केली आहे.