३ महिन्यापूर्वीचा एक कॉल! जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते नितीश कुमारांनी ओळखलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 11:17 AM2022-08-08T11:17:31+5:302022-08-08T11:20:59+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर आता बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. याठिकाणी जेडीयूचे नेते आरसीपी सिंह यांनी राजीनामा देत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीश कुमार सकाळी ११ वाजता ऑफिसला जातात आणि १ वाजता जेवण करून परतात. नितीश कुमार सात जन्म घेतले तरी पंतप्रधान बनणार नाहीत अशी टीका आरसीपी सिंह यांनी केली.

आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्यानंतर जेडीयूत २ गट पडतील असं बोलले जात आहे. त्यात जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी बिहारमध्ये दुसरा चिराग पासवान जन्माला घालण्याची तयारी सुरू आहे. परंतु आम्ही हे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही असं आव्हान ललन सिंह यांनी दिलीय. त्याचसोबत जेडीयू बुडणारं नाही तर धावणारं जहाज आहे. आरसीपीला एबीसीडी माहिती नाही असा टोला जेडीयूने लगावला आहे.

बिहारमधल्या या राजकीय भूकंपाची ३ महिन्यापूर्वीची भनक नितीश कुमार यांना लागली होती. जेडीयूला आरसीपी सिंह यांच्यावर संशय आला होता? जे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी घडवले तसेच बिहारमध्ये आरसीपी सिंह घडवत होते? एकनाथ शिंदे यांना पक्षातच ४० आमदारांनी साथ दिली. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना धक्का बसला. सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला.

बिहारमध्येही नितीश कुमारांचा पक्ष फोडण्याची तयारी सुरू होती. ३ महिन्यापूर्वीपासून हा प्लन तयार होता. मात्र नितीश कुमारांनी वेळीच सावध भूमिका घेत हालचाली सुरू केल्या. सूत्रांच्या माहितीनुसार जेडीयूत 'ऑपरेशन आरसीपी' ३ महिन्यापूर्वीच एक्टिवेट करण्यात आले होते. जूनपूर्वी महाराष्ट्रात जेव्हा उद्धव ठाकरे आरामात सरकार चालवत होते. माझं सरकार पाडून दाखवा असं आव्हान विरोधकांना देत होते. तेव्हा शिंदेंबाबत ज्या हालचाली सुरू होत्या त्याचा धोका ओळखण्यात उद्धव ठाकरे चूकले परंतु नितीश कुमारांनी अशी चूक केली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठीक ३ महिन्यापूर्वी जेडीयूच्या एका नेत्याकडे भाजपा नेत्याचा कॉल आला होता. या कॉलमधूनच जेडीयू सतर्क झाली. या कॉलमध्ये भाजपा नेत्याने जेडीयू नेत्याला कसे आहात असं विचारलं. त्यावर ठीक आहे, तुम्ही सांगा असं जेडीयू नेत्याने म्हटलं. त्यानंतर भाजपा नेत्यांनी असं ऐकायला येतेय की आरसीपी सिंह यांच्याकडे ३२ आमदारांचे पाठबळ आहे. खरे आहे का? त्यावर जेडीयू नेत्यानं असं होऊ शकत नाही. संपूर्ण पार्टी नितीशजींच्या मागे एकजूट आहे. हा संवाद इथेच संपला. परंतु जेडीयूत या संवादामुळे खळबळ माजली होती.

जेडीयूनं माहिती जमा करण्यात सुरुवात केली. जेडीयूनं सर्व गुप्तचर यंत्रणा या कॉलमध्ये मिळालेल्या माहितीमागे लावली. तेव्हा आरसीपी सिंह पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत हे समोर आले. इतकेच नाही तर आरसीपी सिंह ही केवळ रस्सी आहे मात्र त्यांच्या मागे मोठा हात आहे हेदेखील जेडीयूला कळालं. ललन सिंह यांनी म्हटल्याप्रमाणे नितीश कुमार यांच्याविरोधात षडयंत्र रचलं गेले. त्यातून आरसीपी सिंह बाहेर पडले.

बिहारच्या राजकारणात भविष्यात घडणाऱ्या घडामोडी नितीश कुमारांनी चांगल्याच ओळखल्या. आरसीपीचं मिशन ३२ तोडण्यासाठी प्लान RCP सिंह नितीश कुमारांनी आखला. अत्यंत सावधरित्या कुणालाही भनक न लागता नितीश कुमार डाव आखत राहिले. हळूहळू आरसीपी सिंह यांचे अधिकार कमी करण्यास सुरुवात झाली. सर्वात आधी त्यांचे राज्यसभेचे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर पटना येथील बंगला त्यांच्याकडून परत घेतला. शेवटचा डाव म्हणून जेडीयूने आरसीपी सिंह यांची संपत्ती सार्वजनिक करण्याची रणनीती आखली.

महाराष्ट्राच्या राजकारणातही अशीच घडामोड घडली. आम्हीच खरी शिवसेना असा दावा करत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. शिंदे यांच्या बंडाला विधानसभेच्या ५५ पैकी ४० आमदारांनी साथ दिली. इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात आमदार एकवटतील अशी कल्पनाही कुणी केली नाही. राज्यातील राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ऑपरेशन शिवसेना सुरू झालं. एकनाथ शिंदे अचानक नॉट रिचेबल झाले. त्यांच्यासोबत आमदारही एकामागोमाग एक उद्धव ठाकरेंपासून दूर गेले.

राज्यात सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली सुरु असताना याची माहिती गुप्तचर यंत्रणेला कळाली होती. राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी यंत्रणेकडून माहिती देण्यात आली. जवळपास २० आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे मुंबई सोडून सूरतला गेले याची भनक सरकारला लागली कशी नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. परंतु गुप्तचर यंत्रणांनी २ महिन्यापूर्वीच अशाप्रकारे भेटीगाठी सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंना कळवलं होतं अशी माहिती समोर आली.

एकनाथ शिंदे यांचे बंड थंड करण्यासाठी व सरकार वाचविण्यासाठीचा शेवटचा प्रयत्न म्हणून महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री व्हा, अशी ऑफर त्यांना देण्यात आली होती. मात्र, शिंदे यांनी ती धुडकावून लावली. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असेल तर आपण राजीनामा द्यायला तयार आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी म्हटले होते. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत कायम राहून मुख्यमंत्रिपद घेण्यात आपल्याला रस नाही असं शिंदे यांनी सांगितले होते.