काँग्रेसचा 'बिग प्लॅन'! १३ जूनला दिल्लीत या, सर्व खासदारांना हायकमांडचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 11:12 PM2022-06-08T23:12:08+5:302022-06-08T23:16:49+5:30

नॅशनल हेराल्ड(National Herald Case) प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी १३ जून रोजी अंमलबजावणी संचालनालयासमोर(ED office) हजर होणार आहेत. यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

या काळात काँग्रेस जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी पक्षाचा मेगाप्लॅन बनवण्यात आला आहे. काँग्रेस खासदारांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. इतकंच नाही तर गुरुवारी डिजिटल बैठक बोलावण्यात आल्याचं वृत्त आहे.

त्यात पक्षाचे सरचिटणीस, प्रभारी आणि प्रदेश काँग्रेस समित्यांचे अध्यक्ष यांचा समावेश असेल. या बैठकीत राहुल आणि सोनिया गांधी यांच्या ईडी कार्यालयात हजर राहण्यावर चर्चा होऊ शकते. सोनिया आणि राहुल यांना ईडीच्या नोटिसीवर काँग्रेसने लपवण्यासारखे काहीही नसल्याचे म्हटले आहे.

नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सोनिया गांधींना ८ जूनला हजर राहण्याची नोटीस दिली होती. मात्र काँग्रेस अध्यक्षांनी हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला, कारण त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अद्याप त्या बऱ्या झालेल्या नाहीत.

सूत्रांनी सांगितले की, ताज्या चाचणी अहवालानुसार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अजूनही कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यांची कोविड चाचणी योग्य कालावधीत पुन्हा केली जाईल. मात्र, डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

हे पाहता सोनिया गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात हजर राहण्यासाठी ईडीकडे तीन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. या प्रकरणी ईडीने १३ जून रोजी राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने यापूर्वी राहुल गांधींना २ जूनला हजर राहण्यास सांगितले होते.

मात्र, काँग्रेस नेत्याने हजेरी लावण्यासाठी वेगळी तारीख मागितली होती. तेव्हा ते देशाबाहेर होते. राहुल गांधी गेल्या आठवड्याच्या शेवटी देशात परतले. काँग्रेसने १३ जून रोजी राहुल यांच्या ईडी कार्यालयात जाण्याआधी शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे.

यासाठी पक्षाच्या खासदारांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की, पक्षाने गुरुवारी पक्षाचे सरचिटणीस, प्रभारी आणि प्रदेश काँग्रेस समित्यांच्या अध्यक्षांची ऑनलाईन बैठकही बोलावली आहे. यामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी ईडीसमोर हजर होण्याबाबत चर्चा होऊ शकते.

ही बैठक सायंकाळी होणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये संघटनेशी संबंधित इतर काही मुद्द्यांवरही चर्चा होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने आपल्या खासदारांना १३ जून रोजी सकाळी दिल्लीत उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

राहुल गांधी यांच्या ईडीसमोर हजेरी लावण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते, खासदार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी ईडीसमोर हजर होतील, असे काँग्रेसने बुधवारी सांगितले. त्यांच्याकडे लपवण्यासारखे काही नाही असं पक्ष म्हणाला.

पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, आम्ही कायद्याचे पालन करणारे आहोत. आम्ही नियमांचे पालन करतो. त्यांनी बोलावले तर ते नक्की जाईल. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही. आम्ही भाजपसारखे नाही. २००२ ते २०१३ या काळात अमित शहा फरार होते असा टोला त्यांनी लगावला आहे.