जे पुजारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार राजदंड; त्यांनी २०२४ निवडणुकीबाबत केले मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 11:36 AM2023-05-26T11:36:37+5:302023-05-26T11:43:06+5:30

२८ मे रोजी, जेव्हा पंतप्रधान देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन करतील, तेव्हा इतिहासाची पुनरावृत्ती होईल, जेव्हा पंतप्रधान नवीन संसद भवनात सेंगोल स्थापित करतील. हे तेच सेंगोल आहे जे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १४ ऑगस्टच्या रात्री त्यांच्या निवासस्थानी अनेक नेत्यांच्या उपस्थितीत स्वीकारले होते.

सेंगोलला ऐतिहासिक महत्त्व आहे. चोल वंशाच्या काळात याचा उपयोग सत्ता हस्तांतरणासाठी केला जात असे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांकडून सत्ता घेतली तेव्हा त्यांनी हा ऐतिहासिक राजदंड प्रतीक म्हणून घेतला.

आता सेंगोल मदुराई अधीनामचे पुजारी ते पीएम मोदींना सुपूर्द करतील. ऐतिहासिक राजदंड 'सेंगोल' बनवणाऱ्या वुम्मीदी बंगारू ज्वेलर्सचे चेअरमन वुम्मीदी सुधाकर म्हणाले, "आम्ही हा 'सेंगोल' बनवला आहे, तो बनवायला आम्हाला एक महिना लागला. त्यावर चांदी आणि सोन्याचा मुलामा आहे. जेव्हा मी १४ वर्षांचा होतो. तेव्हा ते बनवले गेले.

सेंगोलचे वर्णन करताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, 'स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही, भारतातील बहुतेक लोकांना या घटनेची माहिती नाही, जी भारतातील सत्ता हस्तांतरणादरम्यान घडली होती, ज्यामध्ये सेंगोल पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सोपवण्यात आले होते.

शाह म्हणाले की, "त्या रात्री जवाहरलाल नेहरूंना तमिळनाडूतील तिरुवदुथुराई अधीनम (मठ) च्या अध्यानमांकडून (पुजारी) 'सेंगोल' मिळाले." पंतप्रधानांनी सेंगोल हे अमृत कालचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे असं केंद्रीय गृहमंत्र्यांनी माहिती दिली.

१९४७ मध्ये मिळालेले हेच सेंगोल पंतप्रधान लोकसभेत बसवतील, जे स्पीकरच्या आसनाजवळ असेल. हे राष्ट्राला पाहण्यासाठी आणि विशेष प्रसंगी बाहेर काढण्यासाठी प्रदर्शित केले जाईल. ऐतिहासिक "सेंगोल" स्थापित करण्यासाठी संसद भवन हे सर्वात योग्य आणि पवित्र ठिकाण आहे असं अमित शाह म्हणाले.

मदुराई अधीनमच्या २९३ वे मुख्य पुजारी श्री हरिहरा देसिका स्वामीगल यांच्या हस्ते २८ मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी 'सेंगोल' हा राजदंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिला जाईल. तत्पूर्वी त्यांनी २०२४ च्या निवडणुकीबाबत मोठं विधान केले आहे.

स्वामीगल यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदींचे जागतिक कौतुक होत आहे आणि देशातील प्रत्येकाला त्यांचा अभिमान आहे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान व्हावे असं विधान त्यांनी केले.

स्वामीगल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे नेते आहेत ज्यांना जागतिक स्तरावर प्रशंसा मिळाली आहे. ते लोकांसाठी चांगल्या गोष्टी करत आहेत. त्यांना २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान बनायचे आहे आणि लोकांना मार्गदर्शन करायचे आहे.

त्याचसोबत आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. कारण जागतिक नेते आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत आहोत. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना 'सेंगोल' भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.