'भाजपचं राजकारण फुट पाडण्याचं', भारत जोडो यात्रेत कन्हैय्या कुमारचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 11:52 AM2022-10-23T11:52:20+5:302022-10-23T11:59:22+5:30

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील ११ राज्यांतून भारत जोडो यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प केला असून आजमित्तीस ते तेलंगणात यात्रा करत आहेत. कर्नाटकच्या रायचूरमधील येरागेरा गावातून ते तेलंगणात पोहोचले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील ११ राज्यांतून भारत जोडो यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प केला असून आजमित्तीस ते तेलंगणात यात्रा करत आहेत. कर्नाटकच्या रायचूरमधील येरागेरा गावातून ते तेलंगणात पोहोचले.

तेलंगणानंतर लवकरच महाराष्ट्रातून या यात्रेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या यात्रेला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून दक्षिण भारतातही राहुल गांधींचं ठिकठिकाणी स्वागत झाल्याचं पाहायला मिळालं. भारत जोडो यात्रेत कन्हैय्या कुमारचाही उत्साह दिसून येत आहे.

काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार हेही राहुल गांधींसमवेतच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ते यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओही शेअर करत आहेत.

कन्हैय्या कुमार यांनी गेल्याच महिन्यात यात्रेत सहभाग घेतला. १२ सप्टेंबर रोजी त्यांनी यात्रेतील सहभागाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर, ट्विटर अकाऊंटवरुन ते दररोज अपडेट देत आहेत. तसेच, यात्रेचा आजचा ४६ वा दिवस असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

राहुल गांधींसमवेत ते यात्रेत चालत असल्याचं त्यांनी टाकलेल्या पहिल्या व्हिडिओत दिसून आलं. त्यावेळी, राहुल गांधींसाठी भारत जोडो... अशी नारेबाजीही त्यांनी केली.

कन्हैय्या कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये, त्यांनी भगवाधारी हिंदु व्यक्तीसोबत आणि दुसरीकडे मुस्लीम बांधवासोबत एकत्रितपणे फोटो काढला.

कन्हैय्या कुमारने या फोटोसह कॅप्शनही दिलं होतं. त्यामध्ये, भाजपकडून फूट पाडण्याचं राजकारण केलं जात आहे. फोडा आणि राज्य करा या ब्रिटीशनितीचा वापर भाजपकडून होत आहे. मात्र, आमची एकताच त्यांच्या कटकारस्थानाला पराभूत करेल,असे त्यांनी म्हटले होते.

कन्हैय्या कुमार यांनी यात्रेतील कालच्या दिवसाचे फोटो शेअर केले असून आज यात्रेचा ४६ वा दिवस असल्याचं सांगत त्यांनी हात उंचावलेले काही सहकाऱ्यांसोबतच फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान, राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला महाराष्ट्रात साधारणतः सहा नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या यात्रेचा राज्यातील प्रवास नांदेड जिल्ह्यातील देलगूर तालुक्यातून होणार असल्याचे माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

कन्याकुमारी ते काश्मीर अशा एकूण ३५७० किमीचा प्रवास करणारी ही भारत जोडो यात्रा आहे. ७ सप्टेंबर रोजी राहुल गांधींनी या यात्रेला सुरुवात केली असून आत्तापर्यंत त्यांनी १२१५ किमीचा प्रवास पूर्ण केला आहे.