युक्रेनच्या सैन्यानं भारतीय विद्यार्थिनीचे केस पकडून मागे खेचलं अन्...; जयेशने सांगितला भयावह अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 03:12 PM2022-03-01T15:12:38+5:302022-03-01T15:26:11+5:30

युक्रेनच्या पोलिसांनी काही भारतीयांवर केलेल्या हल्ल्याच्या वाढत्या धोक्यानंतर आणि हल्ल्याच्या घटनेनंतर रशियानेही भारतीय विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हायजरी जारी केली होती.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशिया अधिकच आक्रमक होत आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह काल रात्रीपासून क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. धोका लक्षात घेऊन भारतीय दूतावासाने सर्व भारतीयांसाठी एक सूचना जारी केली आहे. अॅडव्हायझरीमध्ये सर्व भारतीयांना आज कीव्हमधून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याला जे काही मिळेल ते वापरून कीव्ह सोडण्यास सांगितले आहे.

कीव्हमध्ये रशियन सैनिक सोमवारी रात्रीपासून सतत बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहेत. कीव्ह ताब्यात घेण्यासाठी रशिया चांगलाच आक्रमक झाला आहे. सततच्या हल्ल्यांमुळे धोका वाढला आहे. त्यामुळेच भारतीय दूतावासाने घाईघाईत अॅडव्हायझरी जारी केली आहे.

युक्रेनच्या पोलिसांनी काही भारतीयांवर केलेल्या हल्ल्याच्या वाढत्या धोक्यानंतर आणि हल्ल्याच्या घटनेनंतर रशियानेही भारतीय विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हायजरी जारी केली होती. यामध्ये युक्रेनमध्ये जे भारतीय अडकले आहेत, त्यांनी रशियन सैनिकाशी संपर्क साधावा, असे म्हटले होते.

रशियन सैन्य त्यांना शक्य ती सर्व मदत करतील आणि युक्रेनमधून सुरक्षितपणे बाहेर पडण्यास मदत करतील. रशियाने जारी केलेल्या अॅडव्हायझरीत आणखी काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी युक्रेनमध्ये अडकलेला भारतीय विद्यार्थी जयेश सरमळकरने बीबीसी मराठीशी बोलताना त्याचा हा भयावह अनुभव सांगितला होता.आम्ही युक्रेन-पोलंड सीमेजवळ पोहोचलो होतो पण आम्हाला युक्रेन गार्ड्सने सीमा ओलांडू दिली नाही. याउलट युक्रेन गार्ड्सने आम्हाला मारहाण केली, धक्काबुक्की केली, हवेत गोळीबार केला, गाडी आमच्यावर क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. मी हे सुद्धा पाहिलं की, एक भारतीय विद्यार्थिनी खाली पडली तेव्हा तिचे केच पकडून तिला मागे खेचलं, असं जयेश सरमळकरने यावेळी सांगितलं.

दरम्यान, युक्रेनियन आणि रशियन सैनिक भारताचा तिरंगी ध्वज असलेले वाहन पाहून गोळीबार थांबवत आहेत. एवढेच नाही तर भारतीय विद्यार्थ्यांनाही रस्ता दाखवला जात आहे. भारताच्या तिरंगा ध्वजामुळे सुखरूप परत येऊ शकलो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.