भारतीय वायूसेनेची मोठी तयारी; पाकिस्तान बॉर्डरवर 'Attack' हेलिकॉप्टर तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 04:15 PM2022-08-30T16:15:52+5:302022-08-30T16:22:02+5:30

भारतीय हवाई दल(Indian Air Force) भारताच्या पश्चिम सीमेजवळ आपल्या स्वदेशी अ‍ॅटॅक हेलिकॉप्टरचे पहिले स्क्वॉड्रन तयार करणार आहे. लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची एक स्क्वॉड्रन (एलसीएच) जोधपूर एअरबेसवर तैनात केली जाणार आहे. त्यामुळे सीमेवर लक्ष ठेवण्याचे काम सोपे होईल. घुसखोरी थांबेल. दहशतवादी कारवायांना आळा घालणे सोपे होईल.

भारतीय लष्कराने १ जून २०२२ रोजी बंगळुरूमध्ये लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची पहिली स्क्वॉड्रन तयार केली आहे. हे स्क्वाड्रन ईस्टर्न कमांडच्या अखत्यारीत जाणार आहे. पुढील वर्षापर्यंत ती वाढवण्यात येणार आहे. वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (LAC) चीनच्या करकुतींवर चाप बसवण्यासाठी मदत मिळेल. लष्कर आता आणखी 95 LCH खरेदी करण्याची योजना आखत आहे. याचे सात युनिट बनवले जाणार आहेत. त्यापैकी सात डोंगराळ भागात तैनात करण्यात येणार आहेत.

लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीनं उत्पादन केले आहे. आतापर्यंत ९ हेलिकॉप्टर बनवण्यात आले असून आणखी १५ ऑर्डर देण्यात आल्या आहेत. त्यात दोन लोक बसू शकतात. हे ५१.१० फूट लांब, १५.५ फूट उंच आहे. सर्व सामानांसह त्याचे वजन ५८०० किलो आहे. त्यात ७०० किलो वजनाची शस्त्रे घेता येतील.

LCH चा कमाल वेग २६८ kmph आहे. ५५० किमी रेंज आहे. ३ तास १० मिनिटे सतत उड्डाण घेता येते. कमाल ६५०० फूट उंचीपर्यंत जाऊ शकते. त्यात २० मिमीची एक तोफ आहे. रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब लावले जाऊ शकतात असे चार हार्डपॉइंट्स आहेत.

ध्रुव हेलिकॉप्टरमधूनच लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर विकसित करण्यात आले आहेत. १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान या हेलिकॉप्टरची गरज भासू लागली होती. तेव्हापासून त्याचा प्रकल्प सुरू होता. चाचण्यांदरम्यान, सियाचीन असो की १३ हजार ते १५ हजार फूट उंच हिमालय पर्वत किंवा वाळवंट किंवा जंगल. त्याने भारतातील सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये उड्डाण करण्याची क्षमता दाखवली होती.

लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) मध्ये २० mm M621 Canon किंवा Nexter THL-20 Turret गन बसवता येते. रॉकेट, क्षेपणास्त्र किंवा बॉम्ब चार हार्ड पॉइंट्समध्ये बसवता येतात. उदाहरणार्थ, 4x12 FZ275 LGR म्हणजेच Laser Guided Rockets यामध्ये तैनात केले जाऊ शकतात. हे रॉकेट हवेतून पृष्ठभागावर आणि हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम आहेत.

याशिवाय लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरवर एअर टू एअर 4x2 मिस्ट्रल क्षेपणास्त्र डागू शकते किंवा 4x4 ध्रुवस्त्र अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्र देखील डागले जाऊ शकते. या क्षेपणास्त्रांशिवाय या हेलिकॉप्टरवर क्लस्टर युद्धसामग्री, अनगाइडेड बॉम्ब आणि ग्रेनेड लाँचर बसवून शत्रूवर वर्चस्व निर्माण करू शकतो.

या हेलिकॉप्टरमध्ये बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक एव्हियोनिक्स सिस्टिमने शत्रूला लपण्याचीही संधी देत नाही. शत्रू यावर हल्लाही करू शकत नाही कारण ही यंत्रणा क्षेपणास्त्रानं हेलिकॉप्टरला टार्गेट केल्याची सूचना आधीच देते. याशिवाय रडार आणि लेझर वॉर्निंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. शेफ आणि फ्लेअर डिस्पेंसर देखील आहेत, ज्यामुळे शत्रूची क्षेपणास्त्रे आणि रॉकेट हवेत नष्ट करता येतात.

लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) हे भारतीय लष्कराचे पहिले हल्ला चढवणारं हेलिकॉप्टर आहे. यापूर्वी ७५ रुद्र हेलिकॉप्टरचा वापर यासाठी करण्यात आला होता. परंतु ते एलसीएचसारखे शक्तिशाली, वेगवान आणि प्राणघातक नाहीत.

LCH हेलिकॉप्टरचे युनिट जोधपूरमध्ये तयार केले जात आहे जेणेकरून जुनी Mi-35 आणि Mi-25 हेलिकॉप्टर हटवता येतील. ही दोन्ही हेलिकॉप्टर रशियाने बनवली आहेत. हवाई दल दीर्घकाळापासून त्यांचा वापर करत आहे. त्यांची एक तुकडी बरखास्त करण्यात आली आहे. कारण त्यांच्या जागी बोईंग कंपनीची AH-64E अपाचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत.