ड्रॅगनचा नवा डाव! लडाख सीमेवर चीनची मोठी हालचाल; भारतीय लष्करही झालं सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 08:56 PM2022-06-10T20:56:24+5:302022-06-10T20:59:10+5:30

अमेरिकेच्या एका लष्करी अधिकाऱ्याने नुकतेच पूर्व लडाख सेक्टरमधील वातावरण तापत असल्याचे विधान केले होते. या वक्तव्यानंतर चीनने सीमेपलीकडे आपल्या लढाऊ विमानांची संख्या वाढवल्याची बातमी समोर आली आहे.

भारतीय हद्दीजवळील मुख्य लष्करी तळावरील लढाऊ विमानांची संख्या दुप्पट केली आहे. सीमा विवादादरम्यान, चीन आपल्या लष्करी तळ होतानमधून हवाई ऑपरेशन करत होता. आता या तळावर २५ लढाऊ विमाने तैनात केल्याची बातमी आली आहे

उच्च सरकारी सूत्रांनी ही माहिती इंडिया टुडेला दिली आहे. लढाऊ विमानांची संख्या पूर्वीच्या तैनातीपेक्षा कितीतरी जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय संरक्षण यंत्रणा सीमेपलीकडील हालचालींवर सतत लक्ष ठेवून असतात.

लष्कर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. चीन सध्या शाक्चेमध्ये नवीन लढाऊ विमानतळ बांधत आहे. जेणेकरून LAC जवळ चिनी हवाई दलाची ताकद वाढवता येईल. संघर्षाच्या वेळी भारतीय हवाई दल अधिक सक्रिय होऊ शकते असे चिनी लोकांना वाटले असावे म्हणून ते नवीन एअरबेस बांधत आहेत, असे भारतीय बाजूचे मत आहे. लढाऊ विमानांची तैनाती वाढवली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सने नुकतेच अशा एअरबेसला अपग्रेड करण्याचे काम केले आहे. विमानांसाठी शेल्टर बांधण्यात आले आहेत. धावपट्टीची लांबी वाढवण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणात चिनी सैनिक तैनात करण्यात आले आहेत. भारतीय सैन्य चीनच्या तीन एअरबेसवर सतत लक्ष ठेवून आहे. हे काशगर, होतन आणि नागरी गुंसा आहेत. याशिवाय, शिगत्से, ल्हासा गोंकर, निंगची सार आणि चामदो पंगता या एअरबेसचे निरीक्षण केले जाणार आहे.

लडाखच्या सीमेजवळ चीनने सुरू केलेल्या हालचाली डोळ्यांत अंजन घालणाऱ्या आहेत. त्या भागात चीन पायाभूत सुविधा उभारत असून, त्यामुळे अतिशय सतर्क राहाण्याची गरज आहे, असा सावधगिरीचा इशारा अमेरिकी लष्कराचे पॅसिफिक भागाचे कमांडिंग जनरल चार्ल्स फ्लिन यांनी भारताचे नाव न घेता दिला आहे.

हिमालय पर्वतराजीतील सीमा प्रदेशात चीनने पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे. या हालचाली कशासाठी सुरू आहेत, याचा जाब कोणीतरी चीनला विचारायला हवा. एखाद्याला अस्थिर करण्याचा हेतू चीनच्या या कारवायांमागे असू शकतो.

लडाखच्या सीमेनजीक चीनने चालविलेल्या हालचालींबद्दलही फ्लिन यांची तीव्र चिंता व्यक्त केली. पेगाँग तलावाजवळ चीन एक पूल बांधत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी गेल्या जानेवारीमध्ये दिले होते. चीनने चालविलेल्या या हालचालींची अतिशय गंभीर दखल भारताने घेतली होती.

यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात भारत व अमेरिकी लष्कर हिमालयातील डोंगराळ भागात सुमारे ९ ते १० हजार फूट उंचीवर युद्ध सराव करणार आहेत. मात्र, त्याची जागा अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही