हरयाणातील इंजिनिअर नोकरी सोडून बनवतोय केमिकलमुक्त मातीची भांडी; CM खट्टरही झाले फॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 05:51 PM2023-06-09T17:51:48+5:302023-06-09T17:54:31+5:30

हरयाणातील नीरज या तरूणाने 'माती, तुम्ही आणि मी' या नावाने व्यवसाय सुरू केला आहे.

हरयाणातील नीरज या तरूणाने 'माती, तुम्ही आणि मी' या नावाने व्यवसाय सुरू केला आहे. केमिकलयुक्त मातीची भांडी बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जातात. तसेच आधुनिक पद्धतीने मातीत रसायन मिसळून मातीची भांडी तयार केली जात असल्याचे नीरजचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने केमिकलमुक्त आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या मातीची भांडी बनवण्याचा निर्णय घेतला.

केमिकलमुक्त मातीची भांडी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावीत यासाठी नीरज शर्मा याने गावातील कुंभारांना रोजगार दिला आहे.

प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे आजच्या घडीला मातीच्या भांड्यांची मागणी वाढत आहे. आरोग्यासाठी फायदेशीर असलेली मातीची भांडी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात.

बाजारात मातीच्या भांड्यांची मागणी वाढत आहे. ते बनवण्याचा व्यवसायही तितक्याच वेगाने वाढत आहे. परंतु देशातील बहुतांश ठिकाणी कुंभार नाही, तर यंत्राच्या साहाय्याने मातीची भांडी तयार केली जात आहेत.

डाय मोल्ड आणि रासायनिक कोटिंग्जसह फॅन्सी मातीची भांडी तयार केली जातात, ज्यामुळे लोकांचे मोठे नुकसान होते. या नुकसानीपासून वाचवण्यासाठी हरयाणातील एक तरूण पुढे सरसावला आहे. यासाठी नीरज शर्मा याने 'माती, तुम्ही आणि मी' नावाचा व्यवसाय सुरू केला आहे.

खरं तर नीरज शर्मा हा बीटेक इंजिनिअर असला तरी मागील ३ वर्षांपासून तो त्याच्या गावातून व्यवसाय करत आहे. तो रासायनिक आणि डाय मोल्डशिवाय पारंपारिक पद्धतीने भांडी बनवतो. नीरज बनवत असलेल्या भांड्यामध्ये विशिष्ट खडू वापरला जातो, ज्यामध्ये १८ पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी लाभदायी ठरतात.

नीरज शर्मा सांगतो की, मातीची भांडी सहसा लवकर तुटतात, पण जर कारागीर योग्य असेल आणि योग्य प्रकारे बनवले असेल तर ते खूप दिवस टिकते आणि पुन्हा पुन्हा वापरता येते. लक्षणीय बाब म्हणजे नीरज शर्मा ही भांडी ऑनलाइन विकतो.

घागरी, बाटल्या, जग, वाटी, ताट, झाकण अशा अनेक प्रकारची भांडी बनवत असल्याचे नीरजने सांगितले. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे देखील नीरज शर्माने बनवलेल्या या भांड्यांचे चाहते आहेत. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी देखील नीरज शर्माने बनवलेल्या भांड्यात जेवणाचा आस्वाद घेतला आहे. झज्जर गावचा नीरज शर्मा तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे.