Earn Money From Toll collection: सरकार टोल वसुली करणार, तुम्ही पैसे कमविणार; गडकरी पुढील महिन्यात जबरदस्त योजना आणणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 12:42 PM2022-08-03T12:42:57+5:302022-08-03T12:49:02+5:30

Investment idea by Nitin Gadkari: सुरुवातीला पूर्ण झालेल्या रस्ते प्रकल्पांमध्ये पैसे गुंतविण्याची संधी छोट्या गुंतवणूकदारांना दिली जाईल.

केंद्रीय रस्ते परिवाहन आणि महामार्ग मंत्रालय मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. रस्ते बांधणीसाठी पैसा जमविण्यासाठी केंद्रीय मंत्री मोठा प्लॅन आखत आहेत. यामध्ये १० पब्लिक इंफ्रा इनवेस्‍टमेंट ट्रस्‍ट (InvITs) जारी केल्या जाणार आहेत. एनएचएआय या ईन्व्हीट्सद्वारे सामान्य गुंतवणूकदारांना पैसा गुंतवण्याची संधी देणार आहे. याद्वारे गुंतवणूकदार व्याजातून कमाई करू शकणार आहेत. फक्त या प्रस्तावाला सेबीची मंजुरी लागणार आहे.

रस्ते बांधणीसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात. यासाठी कंपन्या बँकांकडून कर्ज घेतात. ते फेडण्यात अनेक वर्षे लागतात. याऐवजी लोकांकडून पैसे गोळा करून त्या बदल्यात त्यांना त्यावर व्याज देण्याची कल्पना गडकरी यांनी मांडली आहे. मिंटला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी याबाबत भाष्य केले आहे. मनीकंट्रोलने याबाबतचे वृत्त दिले आहे.

विविध क्षेत्रातील सुमारे 10 पब्लिक इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvITs) विविध श्रेणीतील रस्ते प्रकल्पांसाठी जारी केले जातील. पहिला प्रोजेक्ट येत्या 1 महिन्यात सुरू होऊ शकतो. या माध्यमातून भारताच्या महामार्ग विकास कार्यक्रमासाठी सर्वसामान्यांकडून पैसा उभा केला जाईल, असे गडकरी म्हणाले.

सुरुवातीला पूर्ण झालेल्या रस्ते प्रकल्पांमध्ये पैसे गुंतविण्याची संधी छोट्या गुंतवणूकदारांना दिला जाईल. हे InvITs द्वारे होईल. यामध्ये किमान 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 8 टक्के निश्चित परतावा देण्याची तरतूद केली जाईल. तसेच या गुंतवणुकीवर हमी देखील सरकार देईल. यामुळे हा पैसा सुरक्षित राहणार असल्याचेही गडकरी म्हणाले.

टोल-ऑपरेट-हस्तांतरण (TOT) प्रकल्पांमध्ये InvITs द्वारे भांडवल उभारण्याची योजना आहे. NHAI, केंद्र सरकार आणि SEBI देखील किरकोळ या योजनेवर काम करत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. InvITs मध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदाराला InvIT चे युनिट्स 3 वर्षांच्या आत विकल्यास, कमावलेल्या नफ्यावर अल्पकालीन भांडवली नफा कर भरावा लागतो. त्यावर सूट देण्याचा विचार देखील करण्यात येत आहे.

इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvITs) हे म्युच्युअल फंडासारखे असतात, ज्याद्वारे पायाभूत सुविधांमध्ये संभाव्य वैयक्तिक/संस्थात्मक गुंतवणूकदार परताव्याच्या रूपात उत्पन्नाचा एक छोटासा भाग मिळवण्यासाठी थेट लहान रकमेची गुंतवणूक करू शकतात. InvITs म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेट गुंतवणूक ट्रस्ट सारखे कार्य करतात.