हातात होते १० रु, चिमुकलीला हवा होता ९० रुपयांचा बर्गर अन् कर्मचाऱ्यानं जे केलं ते पाहून डोळे पाणावतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 05:57 PM2022-10-21T17:57:36+5:302022-10-21T18:01:48+5:30

जगात वाईट लोक आहेत. पण चांगल्या लोकांची देखील कमतरता नाही. आपण नेहमी सकारात्मक राहीलं की आपल्या आजुबाजूच्या सर्व नकारात्मक गोष्टी नष्ट पावतात आणि मार्ग सापडत जातो. माणुसकीचा मार्ग नेहमीच तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातो असं म्हणतात. माणुसकीच्या याच धर्माचं पालन केल्यामुळे आज धीरज कुमार नावाचा एक साधा कर्मचारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक त्याचं कौतुक करताहेत. त्याला खऱ्या आयुष्यातील हिरो म्हणताहेत.

धीरज बर्गर किंगमध्ये काम करतो. त्यानं असं काही करून दाखवलं आहे की ज्यानं लोकांची मनं जिंकली आहेत. सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. फास्ट फूड कंपनीनेही त्यांचा गौरव केला आहे. त्याचं झालं असं की एक चिमुकली मुलगी बर्गर किंगच्या एका आउटलेटवर बर्गर खरेदी करण्यासाठी आली होती.

बर्गरसाठी जेवढे पैसे लागतात तेवढे काही तिच्याकडे नव्हते. पण धीरजनं चिमुकलीची गरज ओळखून स्वत:च्या खिशातून वरचे पैसे भरले आणि चिमुकलाला बर्गर विकत घेऊन दिला. महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व त्या दिवशी घडले जेव्हा संपूर्ण जग जागतिक अन्न दिन साजरा करत होतं.

ही घटना एकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली. मग काय सोशल मीडियावर धीरजच्या माणुसकीचं दर्शन घडलं आणि तो व्हायरल झाला. यासाठी बर्गर किंग कंपनीनेही धीरज कुमारची दखल घेतली आणि त्याचा गौरव केला.

नोएडा बोटॅनिकल गार्डन मेट्रो स्टेशनच्या रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली. याच ठिकाणी धीरज कुमार काम करतो. एक चिमुकली मुलगी बर्गर किंगच्या आउटलेटवर बर्गर खाण्याच्या इच्छेनं पोहोचली. पण तिच्याकडे फक्त १० रुपये होते. तिला ९० रुपयांचा बर्गर हवा होता. जेव्हा धीरजने बिलिंग काउंटरवर पाहिले की मुलीकडे बर्गर घेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत तेव्हा त्याने खिशातून वरचे ८० रुपये दिले आणि चिमुकलीला बर्गर घेऊन दिला.

हातात 10 रुपये घेऊन उभ्या असलेल्या या मुलीचे छायाचित्र त्यावेळी उपस्थित असलेल्या एका ग्राहकानं आपल्या मोबाइल कॅमेरात टिपलं. यानंतर त्यानं हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यानं संपूर्ण घटना सांगितली. सोबत जागतिक अन्न दिनाचीही जोड ट्विटला दिली. त्यानंतर हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं आणि धीरजचं कौतुक होऊ लागलं.

बर्गर किंगने ट्विटरवर धीरजचे कौतुक केले. 'जागतिक अन्न दिन साजरा करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग कोणता? आम्हाला आशा आहे की मुलीने बर्गरचा खूप आनंद घेतला असेल. यासाठी नोएडा बोटॅनिकल गार्डन मेट्रो स्टेशन रेस्टॉरंटच्या धीरज कुमार यांनी दाखवलेलं दातृत्व कौतुकास पात्र आहे. आपण मनापासून लोकांची सेवा कशी करावी याची प्रेरणा त्यांनी दिली आहे", असं बर्गर किंग कंपनीनं म्हटलं आहे. रेस्टॉरंटने धीरज यांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.