Ganga Vilas Cruise: गंगेच्या पाण्यात आज इतिहास रचला जाणार; ५१ दिवसांच्या प्रवासाला क्रूझ निघणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 10:44 AM2023-01-13T10:44:08+5:302023-01-13T10:49:48+5:30

जगातील सर्वात मोठी रिव्हर क्रूझ वाराणसीहून बांग्लादेशच्या दौऱ्यावर निघणार आहे.

भारत आज एक मोठा इतिहास रचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगा विलास क्रूझला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. जगातील सर्वात मोठी रिव्हर क्रूझ वाराणसीहून बांग्लादेशच्या दौऱ्यावर निघणार आहे. या क्रूझमध्ये फाईव्ह स्टार सुविधा मिळणार आहेत. या काळात सांस्कृतिक वारसा पाहण्याची संधी मिळेल आणि मनोरंजनाची पूर्ण काळजी घेतली जाणार आहेत.

काशीहून प्रवास सुरू करणारी ही क्रूझ पाटणा, कलकत्ता, ढाका आणि दिब्रुगडपर्यंत जाईल. एकूण 3200 किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. बांगलादेशातील 27 नद्यांमधून ही क्रूझ जाणार आहे. ती ५० हून अधिक ठिकाणी थांबेल आणि सुंदरबन डेल्टा आणि काझीरंगा नॅशनल पार्क सारख्या ठिकाणांनाही भेट देईल.

या क्रूझच्या पहिल्या प्रवासादरम्यान 40 क्रू मेंबर्ससह स्वित्झर्लंडमधील 31 पर्यटकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन तर होईलच, पण यासोबतच बांगलादेशशी संपर्कही चांगला होईल आणि जलमार्गही विकसित होईल.

प्रवास कंटाळवाणा होऊ नये, म्हणून क्रूझवर संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, जिम आदी सुविधा असतील. गंगा विलास क्रूझ आधुनिक सुविधांनी सुसज्ज आणि पूर्णपणे सुरक्षित असेल. एका नदीवरील जहाजाने केलेला हा सर्वात लांबचा प्रवास असेल.

गंगा विलास क्रूझ ही भारतातील पहिले नदीतील जहाज असणार आहे. काशी ते बोगीबील (डिब्रूगढ) पर्यंतचा सर्वात लांब क्रूझ प्रवास करणारी पहिली ठरणार आहे.

क्रूझचे संचालक राज सिंह यांनी सांगितले की, क्रूझमध्ये सर्व लक्झरी सुविधा आहेत, एकूण 31 स्विस प्रवासी क्रूझमध्ये चढतील आणि 40 क्रू सदस्यांसह एकूण 71 लोक क्रूझवर प्रवास करतील.

आज पंतप्रधान मोदी गंगा विलास क्रूझच्या या ५१ दिवसांच्या प्रवासाला हिरवा कंदिल दाखवतील.