DRDO ची कमाल, अवघ्या ४५ दिवसांत ७ मजली इमारत उभारली; घातक शस्त्र बनवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 01:53 PM2022-03-17T13:53:03+5:302022-03-17T13:57:07+5:30

डिफेन्स रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन(DRDO) सातत्याने यशस्वी कामगिरी करताना दिसून येत आहे. आता डीआरडीओनं अवघ्या ४५ दिवसांत ७ मजली इमारत उभारली आहे. या इमारतीचं उद्धाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे.

या इमारतीचा वापर पाचव्या पिढीच्या प्रगत मध्यम लढाऊ विमानासाठी (AMCA) संशोधन आणि विकास सुविधा म्हणून केला जाईल. AMCA ला लढाऊ विमान उड्डाण नियंत्रण प्रणालीसाठी एव्हियोनिक्सच्या विकासासाठी इमारतीचा वापर केला जाईल.

जे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, बंगळुरूवरून केले जाईल. इमारतीच्या आतील प्रकल्पांबाबत संरक्षणमंत्र्यांना सादरीकरण केले जाईल, अशी शक्यता आहे. DRDO ने बेंगळुरू येथे उड्डाण नियंत्रण प्रणालीसाठी हायब्रीड तंत्रज्ञानाद्वारे बहुमजली पायाभूत सुविधांचे बांधकाम विक्रमी ४५ दिवसांत पूर्ण केले असं एका अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकारी म्हणाले की, अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) प्रकल्पांतर्गत लढाऊ विमाने आणि फ्लाइट कंट्रोल सिस्टम (FCS) साठी वैमानिक विकसित करण्याची सुविधा या कॉम्प्लेक्समध्ये असेल असंही त्यांनी सांगितले आहे.

भारत आपली हवाई ताकद क्षमता वाढविण्यासाठी प्रगत स्टेल्थ वैशिष्ट्यांसह पाचव्या पिढीचे मध्यम-वजन, खोल-श्रेणीचे लढाऊ विमान विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी AMCA प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पाचा प्रारंभिक विकास खर्च अंदाजे १५ हजार कोटी रुपये आहे.

संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सांगितले की AMCA च्या डिझाईन आणि प्रोटोटाइप विकासासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे लवकरच त्याला मान्यता मिळेल.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, AMCA प्रकल्प आणि संबंधित कार्यवाहीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने केवळ ४५ दिवसांच्या 'किमान कालावधीत' संपूर्ण बांधकाम तंत्र वापरून इमारत बांधण्यात आली आहे.

प्रकल्पाची पायाभरणी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी झाली आणि १ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. या प्रकल्पाशी निगडित एका अधिकाऱ्याने सांगितले की, "हायब्रीड बांधकाम तंत्रज्ञानासह कायमस्वरूपी आणि संपूर्णपणे कार्यान्वित असलेल्या सात मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचा हा एक अनोखा विक्रम आहे आणि हे देशात प्रथमच घडले आहे.

देशाची ताकद त्यांच्या सैन्य आणि तंत्रज्ञानावर मोजली जाते. DRDO ही संस्था लष्कर आणि संरक्षण मंत्रालयासाठी काम करते. भारताच्या संरक्षणाशी संबंधित संशोधन कार्य आणि संरक्षण शक्ती मजबूत करण्यासाठी DRDO चं मोठं योगदान आहे. भारताची लष्करी शक्ती मजबूत करण्यासाठी याची स्थापना केली गेली.

ही भारताच्या संरक्षण प्रणालीच्या डिझाइन आणि विकासासाठी सतत कार्यरत असलेली संस्था आहे. ते नौदल, लष्कर आणि वायू सैन्याच्या संरक्षण गरजेनुसार जागतिक दर्जाची शस्त्रे आणि उपकरणे तयार करते. डीआरडीओ लष्करी तंत्रज्ञानाच्या अनेक क्षेत्रात काम करते.

टॅग्स :डीआरडीओDRDO