Corona Vaccination: कोविशील्ड घेतलेल्या कोट्यवधी भारतीयांसाठी मोठी बातमी; ओमायक्रॉन संकटात चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 10:21 AM2021-12-11T10:21:27+5:302021-12-11T10:25:29+5:30

Corona Vaccination: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना कोविशील्डनं वाढवली चिंता

देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढली असताना एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांचं टेन्शन वाढणार आहे. पुढील काही दिवसांत ओमायक्रॉनचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत सर्वाधिक वापर कोविशील्ड लसीचा झाला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं ऍस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्डच्या मदतीनं तयार केलेली लस कोट्यवधी भारतीयांना देण्यात आली आहे. मात्र आता याच कोट्यवधी लोकांची चिंता वाढली आहे.

ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनची दहशत पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारनं बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू केली आहे. ऍस्ट्राझेनेकाची लस काही महिन्यांनंतर ओमायक्रॉन विरोधात निष्प्रभ होत असल्याचं ब्रिटनमध्ये झालेल्या संशोधनातून समोर आलं आहे.

ब्रिटनमध्ये ऍस्ट्राझेनेका नावानं ओळखली जाणारी लस भारतात कोविशील्ड नावानं परिचित आहे. ऍस्ट्राझेनेकाची लस ओमायक्रॉन विरोधात निष्प्रभ ठरल्यानं कोट्यवधी लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. सुदैवानं या लसीचा बूस्टर डोस ओमायक्रॉन विरोधात ७६ टक्के प्रभावी आहे.

ओमायक्रॉन विरोधात ऍस्ट्राझेनेकाची लस निष्प्रभ ठरल्यानं ब्रिटननं बूस्टर डोसवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मात्र भारतात अद्याप बूस्टर डोसबद्दल निर्णय झालेला नाही. त्यामुळे कोविशील्ड लस घेतलेल्या कोट्यवधी लोकांचा जीव टांगणीला लागला आहे.

ब्रिटनमध्येही अनेकांनी ऍस्ट्राझेनेकाची लस घेतली. मात्र या लसीमुळे निर्माण झालेली सुरक्षा ओमायक्रॉननं भेदली. त्यामुळे ओमायक्रॉन वेगानं हातपाय पसरू लागला. या महिन्याच्या अखेरपर्यंत ब्रिटनमधील बाधितांची संख्या १० लाखांच्या घरात जाईल असा तिथल्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेचा अंदाज आहे.

ऍस्ट्राझेनेकाचा बूस्टर डोस ओमायक्रॉन विरोधात प्रभावी ठरला आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांच्या शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडींचं प्रमाण वेगानं घसरल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे ऍस्ट्राझेनेकाची लस घेतलेल्यांसमोर आता बूस्टर डोसचा पर्याय आहे.

फायझरचे २ डोस घेतलेल्या व्यक्तींचं शरीर ओमायक्रॉनचा प्रतिकार करू शकतं. मात्र त्यांना मिळणारी सुरक्षा ३० टक्के आहे. फायझरचा बूस्टर डोस घेतल्यानंतर ओमायक्रॉन विरोधात ७१ टक्के संरक्षण मिळतं.

ब्रिटननं बूस्टर डोसबद्दल निर्णय घेतलेला आहे. मात्र भारतात याविषयी अद्याप तरी निर्णय झालेला नाही. भारतात उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. ओमायक्रॉनचा धोका वाढल्यापासून देशातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

२ डिसेंबरला देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यावेळी देशात दररोज सरासरी ८१ लाख लोकांचं लसीकरण व्हायचं. आता हाच आकडा ७४ लाखांपर्यंत घसरला आहे. गेल्या आठवड्याभरात लसीकरणाचं प्रमाण ८.५ टक्क्यांनी खाली आलं आहे.

Read in English