एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 02:58 PM2020-04-27T14:58:38+5:302020-04-27T15:03:31+5:30

तज्ज्ञांनुसार गुजरात आणि इंदौरमध्ये कोरोना व्हायरसमुळे वाढत्या मृत्यूंचा आकडा पाहता चीनच्या वुहान शहराशी थेट संबंध असल्याचे दिसत आहे.

देशात सर्वात जास्त कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेश आहेत. मध्य प्रदेशमध्ये इंदौरची हालत सर्वात बेकार झाली आहे.

तज्ज्ञांनुसार गुजरात आणि इंदौरमध्ये कोरोना व्हायरसमुळे वाढत्या मृत्यूंचा आकडा पाहता चीनच्या वुहान शहराशी थेट संबंध असल्याचे दिसत आहे.

गुजरातच्या बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर (जीबीआरसी) चे संचालक जी सी जोशी यांनी सांगितले की, आम्ही कोरोनाच्या संरचनेची डिकोडिंग केली आहे. यामध्ये कोरोनाचे तीन प्रकार आढळले आहेत. याचाच अर्थ देशभरात तीन वेगवेगळ्या प्रकारचे कोरोना व्हायरसचे स्ट्रेन पसरले आहेत.

गुजरातमध्ये पसरलेला व्हायरस हा एल स्ट्रेनचा असू शकतो. याच स्ट्रेन चीनच्या वुहान शहरामध्ये पसरला होता. ज्यामुळे वुहानमध्ये साडेतीन हजारावर बळी गेले होते. अशीच हालत गुजरातची होऊ शकते, अशी भीती जोशी यांनी व्यक्त केली आहे.

एल स्ट्रेन व्हायरसमुळे देशात आतापर्यंत १५० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इंदौरमध्ये ५७ मृत्यू झाले आहेत. येथेही वुहानच्या व्हायरसची लागण झाल्याची शक्यता आहे. यामुळे इंदौरयेथून व्हायरसचे नमुने पुण्याच्या एनआयव्हीला पाठविण्यात येत आहेत.

सध्या देशात सापडलेल्या तीन कोरोना व्हायरसच्या प्रकारापैकी दोन प्रकार घातक आहेत.

एल आणि एस स्ट्रेन सर्वाधिक धोक्याचे आहेत. वुहानमधून आलेला एल स्ट्रेन सर्वात घातकी आहे. याची लागण झालेल्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते.

एस स्ट्रेन व्हायरस एल स्ट्रेनच्या संयोगातून बनलेला आहे. हा एल पेक्षा थोडा कमी धोकादायक आहे. केरळमध्ये जादातर रुग्णांना एस स्ट्रेनची लागण झाली होती. ते दुबईहून आले होते. यामुळे केरळमध्ये कमी मृत्यू झाले.

गुजरातमध्ये अमेरिकेहून आलेल्या लोकांची संख्या जास्त होती. अमेरिकेमध्ये एल स्ट्रेन मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. यामुळे गुजरातमध्येही बळींची संख्या वाढली आहे.

भारतात चीन, युरोप आणि अमेरिकेतून आलेले स्ट्रेन आहेत. युरोपमध्ये पसरलेला व्हायरस अमेरिकेपेक्षा कमी धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे.

तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, कोरोनाचे सर्व प्रकार हे धोकादायक आणि जिवघेणे आहेत. जर कोणाला आधीपासूनच आजार असल्यास तिन्ही वायरसमुळे त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते.