चंद्रयान 3 मोहिमेला १० दिवस बाकी! शक्य तितके रोव्हर चालवण्याचा प्रयत्न; शास्त्रज्ञ दिवसरात्र करतायत कष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 02:00 PM2023-08-29T14:00:56+5:302023-08-29T14:18:17+5:30

भारताची चंद्रयान 3 यशस्वी होत आहे, रोव्हरने यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले आहे.

भारताचे चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग झाले, आता इस्त्रोचे शास्त्रज्ञ दिवस रात्र एक करुन चंद्रावरील पृष्ठभागाचा अभ्यास करत आहेत. यासाठी रोव्हर जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न सुरू आहे. चंद्रावर संशोधासाठी आता इस्त्रोकडे फक्त १० दिवस आहेत.

चंद्रयान मोहिमेबाबत स्पेस अॅप्लिकेशन सेंटर अहमदाबादचे संचालक नीलेश एम देसाई यांनी माहिती दिली. देसाई म्हणाले, चंद्रयान-३ मोहिमेचे ३ भाग आहेत. वाहनाचे सॉफ्ट लँडिंग, चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर विक्रमवरून प्रज्ञान रोव्हरचे प्रक्षेपण आणि मोहिमेमध्ये सामील असलेल्या सात उपकरणांचे ऑपरेशन.

आता तिसऱ्या भागांतर्गत खरे काम सुरू आहे. यामध्ये उपकरणांच्या सहाय्याने विविध प्रयोग केले जात असून, विश्लेषण व डेटा गोळा केला जात आहे. म्हणूनच रोव्हरला चंद्राच्या पृष्ठभागावर शक्य तितके फिरवावे लागेल, जेणेकरून आपण जास्तीत जास्त प्रयोग करून मौल्यवान डेटा गोळा करू शकू.

मिशनच्या शेवटच्या १० दिवसांमध्ये अधिक काम करण्यासाठी शास्त्रज्ञ देखील जास्त काम करत आहेत. पृथ्वीवरील १४ दिवसांनंतर, चंद्रावर पुढील १४ पृथ्वी दिवसांइतकी रात्र असेल. या कालावधीत, वाहनातील अनेक उपकरणे स्लीप मोडमध्ये जातील, पण तापमान उणे १८० ते उणे २५० अंशांपर्यंत खाली येऊ शकते.

वाहन सौर ऊर्जा देखील घेऊ शकणार नाही. या कठीण परिस्थितीतही, नशिबाने साथ दिल्यास, चंद्रयान-3 ची उपकरणे दीर्घ रात्रीनंतर पुन्हा सुरू होऊ शकतात. असे झाल्यास, आम्हाला दक्षिण ध्रुवाचा अधिक डेटा मिळू शकेल, असंही देसाई म्हणाले.

देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडरच्या माध्यमातून सर्व उपकरणे आणि प्रयोगांचा डेटा पृथ्वीवर पाठवण्याबरोबरच या प्रयोगांची पुनरावृत्तीही होणार आहे.

दरम्यान, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे तापमान मानवाकडून पहिल्यांदाच शुद्ध उपकरणाने मोजले जात आहे, तर ILSA उपकरण चंद्र-कंपांची नोंद करत आहे. पृथ्वीप्रमाणेच चंद्रावरही भूकंप होतात. चंद्रयान-३ च्या उपकरणांकडून मिळालेल्या माहितीमुळे अशी अनेक रहस्ये उकलण्यास मदत होणार आहे.

या मिशनमध्ये भारताला अमेरिकेच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या गोल्डस्टोन डीप स्पेस लायझन स्टेशनची सेवा मिळू शकली नाही, असा खुलासा देसाई यांनी केला.

यामुळे, रोव्हरच्या संपर्कात आणि हालचालीदरम्यान सुरुवातीला दृश्यमानतेच्या काही समस्या आल्या. या कारणास्तव, रोव्हर दररोज ३० मीटर चालवण्याऐवजी, १२ मीटरची हालचाल झाली.

चंद्रावर आपले रोव्हर उतरवल्यानंतर, भारत आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी २ सप्टेंबर रोजी सकाळी ११:५० वाजता आदित्य एल1 मिशन पाठवेल. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने सोमवारी याची घोषणा केली. तसेच श्री हरिकोटा येथून या प्रक्षेपणासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती दिली.