Assam Flood : आसाममध्ये पावसाचा हाहाकार! 25 जिल्ह्यांतील 11 लाख लोकांना फटका, पुराची भीषणता दाखवणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 10:07 AM2022-06-17T10:07:46+5:302022-06-17T10:25:38+5:30

Assam Flood : पूर आणि भूस्खलनामुळे 25 जिल्ह्यांतील सुमारे 11.09 लाख लोक बाधित झाले आहेत.

आसाममध्ये (Assam Flood) सध्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. पावसाचा हाहाकार पाहायला मिळत असून 25 जिल्ह्यांतील तब्बल 11 लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे.

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्य सरकारने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, पूर आणि भूस्खलनामुळे 25 जिल्ह्यांतील सुमारे 11.09 लाख लोक बाधित झाले आहेत.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत पूर आणि भूस्खलनामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. मानस, पगलाडिया, पुथिमारी, कोपिली, गौरांग आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.

ग्वालपारा जिल्ह्यातील आझाद नगर भागात भूस्खलनामुळे घर कोसळून दोन मुलांचा चिरडून मृत्यू झाला असून, आसाममध्ये या वर्षी पूर आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या 44 झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 11 वर्षीय हुसेन अली आणि आठ वर्षांची अस्मा खातून अशी मृत मुलांची नावे आहेत.

गुवाहाटीमध्ये नूनमती परिसरात दिवसभर भूस्खलनात तीन जण गंभीर जखमी झाले. जॉयपूर, बोंडा कॉलनी, दक्षिण सरनिया, गीतानगरचा अमायापूर, खरगुली परिसरातील 12 मैल यासह अनेक भागात ढिगाऱ्यांमुळे रस्ते ठप्प झाले होते.

भारतरत्न डॉ भूपेन हजारिका यांचे घर असलेल्या निजारापारकडे जाणारा रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राजभवनाजवळील मुसळधार पावसामुळे दोन विद्युत खांबांचेही नुकसान झाले.

ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याची पातळी वाढत आहे, तर काही ठिकाणी मानस नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. गुवाहाटीमध्ये अनिल नगर, नबीन नगाए, जू रोड, नूनमती, भूतनाथ, मालीगाव आदी भागात सलग तिसऱ्या दिवशी पाणी साचल्याने जनजीवन ठप्प झाले आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, गीतानगर, सोनापूर, कालापहार आणि निजारापार भागात भूस्खलनामुळे ढिगारा साचल्याने रस्ते बंद झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते जलमय झाले आहेत. अनिल नगर, नवीन नगर, राजगड लिंक रोड, रुक्मिणीगाव, हाटीगाव आणि कृष्णा नगर या भागांना सर्वाधिक फटका बसला आहे. या भागात NDRF आणि SDRF कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटींचा वापर केला जात आहे. पुरात अडकलेल्या लोकांची सुटका आणि त्यांना मदत साहित्य पुरवण्याचं काम सुरू आहे. आसाम वीज वितरण कंपनी लिमिटेड (APDCL) मंगळवारपासून वीज नसलेल्या शहरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी चोवीस तास काम करत आहे.

पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवण्यात आले आहेत. अत्यावश्यक गरज असेल तेव्हाच लोकांनी घराबाहेर पडावे, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवण्यात आले आहेत. अत्यावश्यक गरज असेल तेव्हाच लोकांनी घराबाहेर पडावे, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.