"तू कलेक्टर आहेस का?" या टोमण्याचं उत्तर देण्यासाठी डॉक्टरने सोडली नोकरी, झाली IAS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 12:26 PM2022-12-18T12:26:21+5:302022-12-18T12:31:29+5:30

IAS Priyanka Shukla : प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य करता येतात.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. एका डॉक्टरला "तू कलेक्टर आहेस का?" असा टोमणा मारण्यात आला. या टोमण्याचं उत्तर देण्यासाठी डॉक्टरने नोकरी सोडली आणि ती IAS अधिकारी झाली आहे.

प्रियंका शुक्ला असं या तरुणीचं नाव असून 2006 मध्ये लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले होते. त्यांनी आयएएस अधिकारी व्हावे, अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती, त्याच्या वडिलांनी सांगितले की, त्याच्या घराबाहेरील नेमप्लेटवर कलेक्टरच्या पदवीसह नाव हवे होते, परंतु प्रियंका यांनी डॉक्टर होण्याचा आग्रह धरला.

एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर प्रियंका यांनी लखनऊमध्येच प्रॅक्टिस सुरू केली. नेहमी गरजूंकडे लक्ष देत, त्यांनी जवळच्या झोपडपट्ट्या आणि गावांना नियमित भेटी दिल्या आणि रहिवाशांना त्यांचे आरोग्य कसे तपासावे याबद्दल सल्ला दिला. तसेच आरोग्याची नीट काळजी कशी घ्यायची हे देखील सांगितले.

एका झोपडपट्टीत चेकअपसाठी गेली असता, तिला एक महिला खराब पाणी पिताना आणि मुलांना ते पाणी देताना दिसली. दुषित पाणी पिऊ नये असा सल्ला दिला. पण महिलेने त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. या उदासीनतेबद्दल विचारले असता महिलेने प्रियंका शुक्ला यांना टोमणा मारला की, "तू काय कलेक्टर आहेस का?"

तो एक टोमणा प्रियंका यांच्या आयुष्याला एक नवीन वळण देऊन गेला. त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. जर लोकांच्या अशा सर्व प्रश्नांना उत्तर द्यायची असतील तर आयएएस अधिकारी बनणे आवश्यक आहे असं त्यांना वाटलं.

एका अयशस्वी प्रयत्नानंतरही, प्रियंका शुक्ला यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि शेवटी 2009 मध्ये त्या उत्तीर्ण झाल्या. डॉक्टरची नोकरी सोडून त्यांनी IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं,

सध्या त्या छत्तीसगड सरकारच्या नागरी प्रशासन आणि विकास संचालकांच्या अतिरिक्त जबाबदारीसह आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे विशेष सचिव म्हणून नियुक्त आहेत. या पोस्टिंगपूर्वी त्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या सहसचिव होत्या.

प्रियंका या आधी छत्तीसगडच्या जशपूर या आदिवासीबहुल जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी होत्या. तिथल्या मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी कधीच क्लार्क पदाच्या पलीकडे करिअरचा मार्ग शोधला नाही, पण शुक्ला यांनी त्यांच्या अधिकाराचा उपयोग करून त्यांना मोठी स्वप्ने पाहायला मदत केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (फोटो - झी न्यूज))