28 वर्षांच्या स्मार्ट तरुणाला भाजपाने दिली उमेदवारी, अल्पावधीत घेतली राजकारणात मोठी झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 04:02 PM2019-03-27T16:02:47+5:302019-03-27T16:14:32+5:30

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून, प्रत्येक मतदारसंघात पक्षाकडून पारखून निरखून उमेदवारी दिली जात आहे. दरम्यान दक्षिण बंगळुरू मतदारसंघातून भाजपाने तेजस्वी सूर्या या 28 वर्षीय तरुण नेत्याला उमेदवारी दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यावर स्वत: तेजस्वी सूर्या यांनाही क्षणभर विश्वास बसला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा आपल्यावर विश्वास दाखवतील असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दक्षिण बंगळुरू मतदार संघातून भाजपाचे दिवंगत नेते अनंत कुमार सातत्याने निवडून येत होते. त्यांच्या निधनानंतर या जागेवर त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र पक्षाने तरुण चेहरा म्हणून तेजस्वी सूर्या यांच्यावर विश्वास दर्शवला.

बंगळुरू दक्षिण मतदारसंघात तेजस्वी सूर्या यांचा सामना काँग्रेसचे दिग्गज नेते बी. के. हरिप्रसाद यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात तरुण मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने भाजपाने तेजस्वी यांचे नाव पुढे केले आहे.

कर्नाटकमधील भाजपाचे उगवते नेतृत्व म्हणून तेजस्वी सूर्या यांच्याकडे पाहिले जात आहे. पेशाने वकील असलेले तेजस्वी सध्या भाजपाच्या प्रदेश युवा मोर्चाचे सचिव म्हणूनही काम पाहत आहेत.