विजयाचा भावूक क्षण, बावनकुळेंचे आनंदाश्रू फडणवीसांच्या खांद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 03:41 PM2021-12-14T15:41:06+5:302021-12-14T15:48:49+5:30

एकूण ५५४ मतदार असलेल्या या मतदानामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली, तर काँग्रेस समर्थित मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली.

राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेल्या नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये भाजपानं बाजी मारली आहे. भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसने पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव केला.

एकूण ५५४ मतदार असलेल्या या मतदानामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली, तर काँग्रेस समर्थित मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली.

बावनकुळेंच्या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. मी स्वत: विजयी झालो, तेव्हा जितका आनंद मला झाला होता, त्यापेक्षाही जास्त आनंद मला आज झाला आहे, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या.

चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय महाविकास आघाडीसाठी चपराक असल्याचं फडणवीस म्हणाले. तिन्ही पक्ष एकत्र असूनही भाजपचा विजय झाला. राज्यातील जनता भाजपच्या पाठिशी असल्याचं यातून दिसतं.

या विजयानंतर बावनकुळे भावुक झाले. त्यांनी फडणवीसांना मिठी मारली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांना तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे, हा क्षण त्यांच्यासाठी अतिशय भावूक ठरला.

बावनकुळे यांनी फडणवीसांच्या खांद्यावरच आपले आनंदाश्रू ढाळल्याचं चित्र कॅमेऱ्यात कैद झालं. यावेळी, आनंदोत्सवाचा क्षण काही वेळासाठी भावूक झाल्याचं दिसून आलं.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलं नसतानाही चंद्रशेखर बावनकुळेंनी सबुरीनं, संयमानं काम केलं. मनावर दगड ठेऊन बावनकुळे दोन वर्षे काम करत राहिले. चंद्रकांत पाटील यांनी बावनकुळेंच्या या संमयाचं कौतुक करत, त्याचाच फायदा त्यांना झाल्याचे म्हटले.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडीनं गुप्त मतदान पद्धतीनं घेऊन दाखवावी. मग अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होतो आणि सरकारच्या पाठिशी किती आमदार आहेत ते सरकारला कळेल, असं थेट आव्हानही या विजयानंतर पाटील यांनी दिलं

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या विजयी जल्लोषाचे आणि भावनिकतेचे फोटो शेअर केले आहेत